तुम्ही देवाच्या वचनाचे पुरस्कर्ते आहात का?
१ जगात बायबलचा लौकिक सहसा कमी केला जातो पण खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आवेशाने पुरस्कार करतात. ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित’ आहे अशी आपली खात्री पटल्यामुळे आपण येशू ख्रिस्ताशी सहमत होतो. येशूने यहोवाला केलेल्या प्रार्थनेत अशी ग्वाही दिली: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (२ तीम. ३:१६; योहा. १७:१७) पण आपण देवाच्या वचनाचा प्रभावीपणे पुरस्कार कसा करू शकतो?
२ शास्त्रवचनांचा अभ्यास करा: येशूने देवाच्या वचनाचा अगदी बारकाईने अभ्यास केला. यामुळे आपल्या संपूर्ण सेवेदरम्यान तो शास्त्रवचनातून शिकवू शकला. (लूक ४:१६-२१; २४:४४-४६) आपल्या आठवणींच्या भांडारात आपण अधिकाधिक शास्त्रवचने कशी साठवू शकतो? बायबलचे दररोज वाचन करण्याद्वारे आणि मग आपल्याला उत्तेजनकारक वाटलेल्या किंवा सेवेमध्ये उपयोगी पडेल अशा एखाद्या वचनावर मनन करण्याद्वारे आपण असे करू शकतो. सभांची तयारी करताना आपण साहित्यात दिलेली वचने बायबलमधून उघडून पाहिली पाहिजेत आणि कदाचित त्यावर एखादे उत्तर आपण तयार करू शकतो. सभांमध्ये वक्ता जेव्हा शास्त्रवचन वाचतो तेव्हा आपण ते वचन आपल्या बायबलमधून उघडून त्यांच्याबरोबर वाचले पाहिजे. बायबलची वचने शिकल्यामुळे आपण ‘सत्याचे वचन नीट सांगण्यास’ तयार होतो.—२ तीम. २:१५.
३ बायबलला बोलू द्या: सेवेत भाग घेत असताना आपण बायबलला बोलू दिले पाहिजे. उदाहरणार्थ, परिस्थिती उचित असते तेव्हा आपण घरमालकाला बायबलमधून एखादे वचन वाचून दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. तो जेव्हा प्रश्न विचारतो किंवा आक्षेप घेतो तेव्हा उत्तर देताना बायबलचा उपयोग करणे उत्तम आहे. घरमालक कामात व्यस्त असतात तेव्हाही आपण बायबलमधील विचार त्यांच्यापुढे मांडू शकतो. आपण काहीसे असे म्हणू शकतो: “जाण्याआधी मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवू इच्छितो.” शक्य असते तेव्हा तेव्हा थेट बायबलमधून वचन वाचून दाखवा. तुम्ही कोणते वचन वाचताय ते घरमालकालाही दिसू द्या. पण कधीकधी काही प्रसंगी आपण आपल्या बॅगेतून बायबल बाहेर काढून त्यातून वचन वाचू शकत नाही. अशावेळी आपल्याला आठवत असलेले एखादे वचन आपण बोलून दाखवू शकतो.
४ त्रैक्याची शिकवण चुकीची आहे हे शास्त्रवचनांतून दाखवले जात असताना एका घरमालकाने असे म्हटले: “मी आयुष्यभर चर्चला जात होतो पण बायबल असं म्हणतं, हे मला खरंच माहीत नव्हतं!” तो लगेच बायबल अभ्यास करण्यास राजी झाली. येशूने म्हटले, की त्याची मेंढरे त्याचा आवाज ऐकतील. (योहा. १०:१६, २७) प्रामाणिक लोकांना सत्य शोधण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे थेट शास्त्रवचनांतून तो पाहणे. यास्तव आपण देवाच्या वचनाचे पुरस्कर्ते होऊया.