एखाद्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यास तुम्ही तयार आहात का?
१. नैसर्गिक संकटांकरता तयार असणे सुज्ञतेचे का आहे?
१ दर वर्षी जगभरातील लाखो लोकांना, आणि आपल्या बांधवांपैकीही अनेक जणांना भूकंप, सुनामी, मुसळधार पाऊस, वादळे, झंझावात व पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. ही नैसर्गिक संकटे अचानक घडू शकतात आणि आपल्यापैकी कोणावरही कोसळू शकतात. तेव्हा, त्यांकरता तयार राहणे सुज्ञतेचे आहे.—नीति. २१:५.
२. स्वतःचा अचूक पत्ता आणि फोन नंबर वडिलांना सांगणे का महत्त्वाचे आहे?
२ पूर्वतयारी: कधीकधी सरकारी अधिकारी एखादे संकट येण्याआधीच धोक्याची सूचना देतात. या सूचनांकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. (नीति. २२:३) अशा परिस्थितीत, मंडळीचे वडील मंडळीतल्या सर्वांना आवश्यक तयारी करण्यास मदत करण्याकरता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. विपत्तीनंतरही वडील मंडळीशी संबंधित असलेल्या सर्वांसोबत संपर्क साधण्याचा आणि ते सुरक्षित आहेत किंवा नाही व त्यांना कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करतील. जर वडिलांजवळ मंडळीच्या सदस्यांशी संपर्क साधण्याकरता आवश्यक असलेली अचूक माहिती नसेल तर ऐन वेळी मौल्यवान वेळेचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे, प्रचारकांनी मंडळीच्या सचिवांना व आपल्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना स्वतःचा अचूक पत्ता आणि फोन नंबर दिला पाहिजे आणि यात काहीही बदल झाल्यास त्यांना कळवले पाहिजे.
३. जर आपण विपत्ती येण्याचा धोका असलेल्या क्षेत्रात राहात असू तर आपण वडिलांशी कशाप्रकारे सहकार्य करू शकतो?
३ जेथे नैसर्गिक विपत्ती येण्याचा धोका आहे अशा परिसरात जर एखादी मंडळी असेल तर वडील प्रचारकांना दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाचे अथवा मित्राचे नाव व फोननंबर देण्याची विनंती करू शकतात, जेणेकरून आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. यामुळे ज्यांना धोक्याच्या क्षेत्रातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे त्यांना शोधणे सोपे जाईल. तसेच, अशा क्षेत्रातल्या मंडळीत वडील संभाव्य धोक्याला तोंड देण्याकरता आगाऊ उपाययोजना करू शकतात. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्तीने कोणत्या अत्यावश्यक वस्तू तयार ठेवाव्यात याची एक यादी तयार केली जाऊ शकते, लोकांना दुसऱ्या ठिकाणी कसे हलवले जाईल आणि ज्यांना खास मदतीची गरज आहे त्यांना कशाप्रकारे साहाय्य पुरवले जाईल हे आधीपासून ठरवले जाऊ शकते. या प्रेमळ व्यवस्थांना सर्वांनी सहयोग देणे महत्त्वाचे आहे.—इब्री १३:१७.
४. आपल्या क्षेत्रात एखादी विपत्ती आल्यास आपण काय केले पाहिजे?
४ विपत्ती आल्यानंतर: जर तुमच्या राहत्या परिसरात विपत्ती आलीच तर तुम्ही काय करू शकता? आपल्या कुटुंबाच्या तात्कालिक शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना आवश्यकता आहे अशा इतरांनाही साहाय्य करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करा. लवकरात लवकर तुमच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकाशी किंवा दुसऱ्या एखाद्या वडिलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुरक्षित असाल आणि तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज नसेल तरीसुद्धा तुम्ही वडिलांशी संपर्क साधला पाहिजे. जर तुम्हाला मदतीची गरज असेल, तर तुमचे बांधव तुम्हाला मदत करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत याविषयी खात्री बाळगा. (१ करिंथ. १३:४, ७) यहोवाला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे हे आठवणीत ठेवा आणि या परिस्थितीत टिकून राहायला साहाय्य करण्याकरता त्याच्यावरच विसंबून राहा. (स्तो. ३७:३९; ६२:८) इतरांना आध्यात्मिक व भावनिक आधार पुरवता येईल का याचा विचार करा. (२ करिंथ. १:३, ४) आपला आध्यात्मिक नित्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करा.—मत्त. ६:३३.
५. ख्रिस्ती या नात्याने संभाव्य संकटाविषयी आपला काय दृष्टिकोन आहे?
५ विपत्तींच्या भीतीमुळे जगातले बरेच लोक चिंतातूर आहेत पण आपण भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहू शकतो. लवकरच सर्व संकटे कायमची नाहीशी होतील. (प्रकटी. २१:४) पण, तोपर्यंत इतरांना आवेशाने सुवार्ता सांगण्यासोबतच आपण संभाव्य संकटांना व कठीण प्रसंगांना तोंड देण्याकरता वाजवी प्रमाणात पूर्वतयारी करू शकतो.