“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” २००७ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१, २. (क) मोशेने इस्राएलांना एकत्र येण्याद्वारे आध्यात्मिक लाभ मिळवण्याचे कशाप्रकारे प्रोत्साहन दिले? (ख) आतापासूनच आपण कोणत्या तयारीला लागले पाहिजे?
१ मोशेने सर्व इस्राएलांना व इस्राएलात राहणाऱ्या परदेशीयांना दर सात वर्षांनंतर नियमशास्त्राचे जाहीर पठन ऐकण्याकरता एकत्र येण्याची आज्ञा दिली. याचा काय उद्देश होता? “म्हणजे ते ऐकून शिकतील.” (अनु.३१:१०-१२) आपल्या लोकांनी मोठ्या समूहात एकत्र यावे अशी यहोवाची इच्छा होती. लवकरच, यहोवाचे लोक पुन्हा एकदा “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” प्रांतीय अधिवेशनांच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
२ तुम्ही याकरता तयारी करण्यास सुरुवात केली आहे का? तुम्हाला तुमच्या मालकाकडून रजेची विनंती करावी लागेल का? तुम्ही आपल्या बायबल विद्यार्थ्यांना किंवा विश्वासात नसणाऱ्या कुटुंबीयांना आपल्यासोबत या अधिवेशनाला येण्याकरता साहाय्य करू शकता का? मंडळीतील काही व्यक्तींना या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता तुमच्या मदतीची गरज असू शकते का? तुमच्या मंडळीला जेथे नियुक्त करण्यात आले आहे त्या ठिकाणी अधिवेशनाला न जाता तुम्ही दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जाण्याची योजना करत आहात का? तुम्हाला हॉटेलमध्ये खोलीचे आरक्षण करावे लागेल का? तर मग खालील माहिती तुम्हाला तयारी करण्यास मदत करू शकेल.
३. (क) यशया २५:६ यातील भाकिताची आज कशाप्रकारे पूर्णता होत आहे? (ख) अधिवेशनात शुक्रवारच्या उपस्थितीविषयी काय पाहण्यात आले आहे आणि व्यक्तिशः आपण काय केले पाहिजे?
३ तिन्ही दिवस उपस्थित राहा: यहोवा आपल्या लोकांकरता विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवतो. (यश. २५:६) आपल्या वार्षिक अधिवेशनांत सादर केल्या जाणाऱ्या आध्यात्मिक मेजवानीचाही यात समावेश आहे. असे पाहण्यात आले आहे की इतर दिवसांच्या तुलनेत, शुक्रवारी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या बरीच कमी असते. यहोवाच्या संस्थेने आपल्याकरता तयार केलेल्या उत्साहवर्धक कार्यक्रमाच्या तिन्ही दिवसांना उपस्थित राहून त्याचा आनंद घेण्याचे ध्येय ठेवा! जर तुम्हाला नोकरीवरून रजा मिळण्याकरता विनंती करावी लागणार असेल तर ही गोष्ट आपल्या प्रार्थनेत यहोवासमोर ठेवा. मग, अधिवेशनाच्या तारखा घोषित होताच, “धैर्य” एकवटून आपल्या मालकाशी याविषयी बोला. (१ थेस्सलनी. २:२; नहे. २:४, ५) ही वार्षिक अधिवेशने तुमच्या उपासनेचा एक भाग आहे असे जर तुम्ही त्यांना समजावून सांगितले तर कदाचित ते तुम्हाला रजा देण्यास तयार होतील. तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या मालकाशी बोलल्यास त्यांनाही तुमच्या अनुपस्थितीमुळे आवश्यक झालेले फेरबदल करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
४. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आणि कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांना अधिवेशनाला येण्याचे कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?
४ आपल्या बायबल विद्यार्थ्यांना व कुटुंबाला साहाय्य करणे: आपले बायबल विद्यार्थी जेव्हा आपल्यासोबत अधिवेशनाला उपस्थित राहतात आणि “महामंडळात” अर्थता मोठ्या समूहात ख्रिस्ती बंधुभाव प्रत्यक्ष अनुभवतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! (स्तो. २२:२५) त्यांना अधिवेशाबद्दल आधीपासूनच सांगा म्हणजे त्यांना येण्याची योजना करता येईल. तुम्हाला स्वतःला अधिवेशनांना गेल्यामुळे कोणते फायदे मिळतात याविषयी त्यांना सांगा. अधिवेशनात काय काय होणार आहे याविषयी त्यांना पूर्वझलक देण्याकरता तुम्ही त्यांना अधिवेशनाची दृश्ये दाखवणारे व्हिडिओ दाखवू शकता, विशेषतः युनायटेड बाय डिव्हाईन टीचिंग नावाचा व्हिडिओ. तुमच्या कुटुंबात जर काही सदस्य यहोवाचे साक्षीदार नसतील तर त्यांनाही तुमच्या योजनांविषयी सांगा. कदाचित ते देखील नाटक पाहायला येण्याची किंवा निदान एक दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची व्यवस्था करू शकतील.
५, ६. (क) १ तीमथ्य ६:१८ यात सांगितल्यानुसार आपण परोपकारी वृत्ती कशाप्रकारे दाखवू शकतो? (ख) ज्यांना मुक्कामाची व्यवस्था करण्यासंबंधी साहाय्याची गरज असेल अशा व्यक्तींना मदत करण्याकरता कोणती तरतूद आहे?
५ आपल्या बंधूभगिनींना मदत करणे: आर्थिकरित्या सुस्थितीत असणाऱ्यांना प्रेषित पौलाने असा सल्ला दिला की त्यांनी “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे.” (१ तीम. ६:१७, १८) अधिवेशनाची तयारी करताना, वयस्क व अपंग, पूर्ण वेळेचे सेवक, एक पालक कुटुंबे किंवा इतर ज्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता मदतीची गरज आहे अशा इतर बांधवांचा विचार करण्याद्वारे आपण पौलाच्या या सल्ल्याचे पालन करू शकतो. अशा व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पहिल्याने, सत्यात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांची आहे; पण आवश्यकतेनुसार वडील व इतरजण विचारशीलता दाखवून अशा व्यक्तींना दयाळूपणे साहाय्य पुरवू शकतात.—गलती. ६:१०; १ तीम. ५:४.
६ मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीला जर अधिवेशनाच्या शहरात मुक्कामाच्या संबंधाने साहाय्याची आवश्यकता असेल तर ही व्यक्ती स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट नावाचा अर्ज भरण्यास योग्य आहे का हे मंडळीच्या सेवा समितीने ठरवावे. हा अर्ज अधिवेशनाच्या रूमिंग डिपार्टमेंटला पाठवण्याआधी अर्जावर दिलेल्या सूचना आणि सर्व वडिलांना पाठवण्यात आलेल्या डिसेंबर १४, २००६ तारखेच्या पत्रातील माहितीचे परीक्षण करावे.
७. (क) आपल्या मंडळीला नेमलेल्या अधिवेशनालाच आपण उपस्थित का राहिले पाहिजे? (ख) परंतु तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाला जावे लागणार असेल तर तुम्ही काय काय केले पाहिजे?
७ दुसऱ्या ठिकाणी अधिवेशनाला जायचे असल्यास: या लेखात, भारतात होणाऱ्या अधिवेशनांची तूर्त यादी देण्यात आली आहे. पुरेशी आसने, साहित्य, राहण्याकरता खोल्या वगैरे, आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी तुम्हाला, तुमच्या मंडळीला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी नेमण्यात आले आहे त्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे उत्तेजन दिले जाते. पण तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहावे लागत असेल तर अधिक माहितीकरता कृपया आपल्या मंडळीच्या सचिवांशी संपर्क साधून सोबत एक रिकामे पाकीट पाठवा ज्यावर पोस्टाचे तिकिट लावले आहे आणि तुमचा पत्ता लिहिला आहे. शहरात एकापेक्षा अधिक अधिवेशने होणार असतील तर तुम्ही कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात त्याची तारीख स्पष्ट लिहा.
८. हॉटेल्समध्ये आरक्षण करताना कोणत्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत? (“हॉटेल्सच्या आरक्षणासंबंधी सूचना” या चौकोनातील माहिती पाहावी.)
८ हॉटेलचे आरक्षण: उपलब्ध हॉटेल्सची यादी मंडळीला पाठवण्यात आल्यावर अधिवेशनाच्या खूप आधी ती राज्य सभागृहातील सूचना फलकावर लावली जाईल. “हॉटेलच्या आरक्षणासंबंधी सूचना” या चौकोनातील सूचनांचे पालन करावे. जर या यादीतील सर्व हॉटेल्सशी संपर्क साधूनही तुम्हाला खोली मिळू शकली नाही, किंवा विशिष्ट हॉटेलमध्ये आरक्षण करण्यासंबंधी तुम्हाला काही समस्या आल्यास मंडळीच्या सचिवांना याविषयी कळवावे. ते यादीच्या वरती दिलेल्या माहितीच्या आधारावर अधिवेशनाच्या रुमिंग डिपार्टमेंटशी संपर्क साधतील. कृपया शाखा दफ्तराला फोन करू नये. जर यादीतील हॉटेल्समध्ये सांगितलेल्या दराने आणखी खोल्या उपलब्ध नसल्यास, यादीत समावेश नसलेल्या हॉटेलशी संपर्क साधण्याऐवजी, मंडळीला हॉटेल्सची नवी यादी येईपर्यंत थांबावे.
९, १०. (क) आपण अधिवेशनाच्या ठिकाणी पोचण्याआधीच आपल्या सोयीकरता कोणती तयारी केली जाते? (ख) आपल्याकरता केल्या जाणाऱ्या सर्व कार्याबद्दल आपण आपली कृतज्ञता व कदर कशी व्यक्त करू शकतो? (इब्री लोकांस १३:१७ वाचावे.)
९ सर्व व्यवस्थांना सहकार्य द्यावे: आपण अधिवेशनाच्या ठिकाणी येतो तेव्हा सगळी व्यवस्था पाहून आपल्याला लगेच कळते की आपले स्वागत करण्याकरता बांधवांनी आधीच पुष्कळ मेहनत घेतली आहे. परिचारक म्हणून सेवा करणारे प्रेमळ बांधव आपले हसून स्वागत करतात आणि जागा शोधण्याकरता आपल्याला मदत करतात. बंधूभगिनींनी मिळून सर्व परिसर स्वच्छ केलेला असतो आणि स्टेज सुरेखरित्या सजवलेले असते. पडद्यामागेही अनेकांनी बरीच मेहनत घेतलेली असते, उदाहरणार्थ कार्यक्रमातील भाग सादर करण्याकरता तयारी करणे, हॉटेल्सच्या व्यवस्थापकांशी वाटाघाटी करणे, आणि इतर अनेक लहानमोठ्या गोष्टींची व्यवस्था करणे.
१० प्रत्येक अधिवेशनाकरता आवश्यक व्यवस्था करण्याकरता अनेक महिन्यांपासून बऱ्याच व्यक्तींनी हातभार लावलेला असतो आणि यात त्यांच्या कुटुंबांचेही योगदान असते; कारण कुटुंबाच्या सहकार्याशिवाय या बांधवांना अधिवेशनाशी संबंधित महत्त्वाच्या कामांकरता वेळ काढताच आला नसता. आपल्या सोयीसाठी या सर्व बांधवांनी जी मेहनत घेतली आणि त्यासाठी जे त्याग केले त्यांबद्दल आपण कृतज्ञ नाही का? तर मग, या लेखात तसेच अधिवेशनाआधी आपल्याला देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शनाचे पालन करण्याद्वारे आपण आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. (इब्री १३:१७) सर्वांनी आनंदाने सहकार्य केल्यास, अधिवेशातील सर्व कारभार “शिस्तवार व व्यवस्थितपणे” पार पडतील.—१ करिंथ. १४:४०.
११. अधिवेशनाच्या ठिकाणी ख्रिस्ती शिष्टाचारात आपण शास्त्रवचनातील कोणत्या तत्त्वाचे पालन केले पाहिजे?
११ ख्रिस्ती शिष्टाचार, प्रेमाचे एक लक्षण: अधिवेशनाला आलेल्या काही बंधूभगिनींनी परिचारक म्हणून काम करणाऱ्या बांधवांना सहकार्य देण्यास नकार दिल्याचे, त्यांच्याबरोबर ख्रिश्चनांना शोभत नाही असे उर्मटपणे बोलल्याचे पाहण्यात आले आहे. जे चांगले करू पाहतात ते, सर्वांच्या आधी जाण्याची अशी मनोवृत्ती नक्कीच दाखवणार नाहीत; शिवाय, यामुळे यहोवा देवाची स्तुती देखील होत नाही. यास्तव आपण सर्वांनी प्रेमळ, सहनशील व सहकार्य देणारे असले पाहिजे. (गलती. ५:२२, २३, २५) तसेच, जागा धरण्याची समस्या देखील अजूनही बांधवांमध्ये दिसून येते. अधिवेशन सभागृहाचे दार सकाळी ८ वाजता उघडले जाते तेव्हा काही बंधूभगिनी पळताना, एकमेकांना ढकलताना व सर्वात “चांगल्या” जागा धरताना दिसतात. या अशा वागण्यामुळे पुष्कळ बंधूभगिनींना इजा झाली. काही बंधूभगिनींनी म्हटले, की ते आपल्या कुटुंबाबरोबर सकाळी लवकर अधिवेशन सभागृहात येतात परंतु बहुतेक जागा आधीच कोणीतरी धरल्याचे त्यांना दिसून येते. बहुतेकदा, असे पाहण्यात आले आहे की घरातील एक व्यक्ती अधिवेशन सभागृहात लवकर येऊन आदल्या रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर न उठणाऱ्या आपल्या घरच्यांसाठी व मित्रांसाठी जागा धरते. काही ठिकाणी तर असेही पाहण्यात आले आहे, की काही बंधूभगिनी जास्तीत जास्त जागा धरू शकले नाहीत कारण त्यांच्याजवळ जागा धरून ठेवण्यासाठी पुरेशा वस्तु नव्हत्या. प्रेमाची व्याख्या अशी आहे: निःस्वार्थीपणाची परिपूर्ण अभिव्यक्ती. येशू ख्रिस्ताने हेही सांगितले, की आपल्या शिष्यांचे प्रमुख ओळख चिन्ह निःस्वार्थ प्रेम हे असेल. (योहा. १३:३५) पुष्कळ जागा धरून ठेवण्याची ही मनोवृत्ती, देवासारखे प्रेम आपण आचरणात दाखवत असल्याचे चांगले उदाहरण आहे का? ख्रिस्ती प्रेम दाखवणाऱ्यांनी, ख्रिस्ताने जे म्हटले ते आचरले पाहिजे. त्याने म्हटले: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्त. ७:१२.
१२. (क) यहोवाच्या लोकांची संमेलने आपल्या या काळात इतकी महत्त्वाची का आहेत? (ख) आपल्यापैकी प्रत्येकजण आतापासूनच काय करू शकतो?
१२ “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते” तसतसे देवाच्या लोकांनी एकत्र येणे अतिशय महत्त्वाचे आहे. (इब्री १०:२५) आपल्या ख्रिस्ती संमेलनांत विश्वासू व बुद्धिमान दास आपल्याला यहोवाची ‘सर्व वचने काळजीपूर्वक पाळण्याकरता’ आवश्यक असलेले मार्गदर्शन पुरवतात. (अनु. ३१:१२) तेव्हा, “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तेथे मिळणाऱ्या सर्व आध्यात्मिक मार्गदर्शनापासून व ख्रिस्ती बांधवांच्या सहवासातून लाभ मिळवण्यासाठी आतापासूनच योजना आखण्यास सुरुवात करा!
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाच्या वेळा
शुक्रवार व शनिवार
सका. ९:२० ते संध्या. ५:०५
रविवार
सका. ९:२० - संध्या. ४:१०
[४ पानांवरील चौकट]
हॉटेलमध्ये आरक्षण करण्यासंबंधी सूचना
१. सुचवलेल्या लॉजेसच्या यादीतील फोन नंबरवर कामाच्या वेळादरम्यान फोन करा.
२. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहात हे हॉटेलमालकांना सांगा.
३. तुम्ही हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या तारखेला येणार व कोणत्या तारखेला खोली सोडणार ते स्पष्ट सांगा.
४. एका हॉटेलमधल्या सर्व खोल्या आरक्षित झाल्या असतील तर यादीत सांगितलेल्या दुसऱ्या हॉटेलला फोन करा.
५. यादीत दाखवलेल्या खोल्यांच्या दरापेक्षा जास्त दर असलेली खोली स्वीकारू नका.
६. खोली आरक्षित करा आणि कन्फरमेशन मागा.
७. खोलीच्या डिपॉझिटचे पैसे दहा दिवसांच्या आत क्रेडिट कार्ड, चेक किंवा मनी ऑर्डरने पाठवा. रोख रक्कम कधीही पाठवू नका. चेक किंवा मनी ऑर्डरने डिपॉझिटचे पैसे पाठवले असतील तर त्यावर कन्फरमेशनची माहिती लिहा.
कृपया
▪ यादीत दिलेल्या दरानेच खोली आरक्षित करा.
▪ जी व्यक्ती खोलीत राहणार आहे त्याच व्यक्तीच्या नावाने प्रत्येक खोली आरक्षित करावी.
▪ खोल्या उपलब्ध नसल्यास, यादीतील सर्व हॉटेल्सशी संपर्क साधून पाहा आणि मगच मंडळीच्या सचिवांना खोल्या उपलब्ध नसल्याचे कळवा.
▪ एकदा आरक्षण केल्यावर ते बदलू नका.—मत्त. ५:३७.
▪ आरक्षण रद्द करायचेच झाल्यास ते लवकरात लवकर करा. रद्द केल्याची माहिती हॉटेलकडून मिळवा.