प्रश्न पेटी
▪ मंडळीला आर्थिक हातभार लावण्याकरता, पैसा उभा करण्याच्या उद्देशाने सेल किंवा इतर कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे का?
बऱ्याच धार्मिक संस्था पैसा उभा करण्याकरता, सहभोज, सेल किंवा उत्सव यांसारखे कार्यक्रम आयोजित करतात. काहींच्या मते हे कार्यक्रम चांगल्या उद्देशाकरता असल्यामुळे त्यांत काही गैर नाही. पण अशाप्रकारचे कार्यक्रम धनासाठी याचना करण्याचे प्रकार असून यहोवाचे साक्षीदार या मार्गाने आर्थिक मदत मिळवत नाहीत.
टेहळणी बुरूज ऑगस्ट १८७९ च्या अंकात चर्चचे अनुकरण करण्यास व धनाची याचना करण्यास आपला नकार या शब्दांत व्यक्त करण्यात आला होता: “‘झायन्स वॉचटावरला’ खुद्द यहोवाचा पाठिंबा असल्याचे आम्ही मानतो. आणि या कारणास्तव आम्ही साहाय्याकरता कधीही मनुष्यांसमोर हात पसरणार नाही किंवा याचना करणार नाही. ‘पर्वतांवरील सर्व सोने व रुपे माझे आहे’ असे म्हणणारा ज्या दिवशी आवश्यक निधी पुरवण्याचे थांबवेल त्या दिवशी आम्ही समजू की हे प्रकाशन बंद करण्याची वेळ आली आहे.”
आजही आपण बायबलमधील एका तत्त्वाचे पालन करतो: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; . . . कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:७) राज्य सभागृहांत दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत जेणेकरून इच्छा असल्यास कोणीही त्यात देणग्या टाकू शकतात. (२ राजे १२:९) या देणग्यांसाठी आपण याचना करत नाही आणि देणारी व्यक्ती देखील मोबदल्यात काही मिळण्याच्या अपेक्षेने देणगी देत नाही.