थोडीशीही आवड दाखवतात, अशा सर्वांची पुन्हा भेट घ्या
१ आपल्यापैकी बहुतेकजण आज सत्यात का आहोत? कारण राज्याच्या संदेशाला आपण दिलेल्या अनुकूल प्रतिसादाची कोणीतरी दखल घेतली आणि आपली आस्था वाढवण्याकरता आपली पुन्हा भेट घेण्याची, कदाचित धीराने अनेकदा भेट घेण्याची तसदी घेतली. त्याचप्रकारे आपणही राज्याच्या संदेशाविषयी आवड दाखवणाऱ्या सर्वांची प्रामाणिकपणे पुन्हा भेट घेतली पाहिजे. खरे पाहता पुनर्भेट दिल्याशिवाय, ‘शिष्य बनवण्याची’ जी आज्ञा देण्यात आलेली आहे ती आपल्याला पूर्ण करताच येणार नाही.—मत्त. २८:१९, २०.
२ आवड आहे हे कसे ओळखायचे? एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून पुस्तके किंवा मासिके स्वीकारली नाहीत तरीसुद्धा, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, तिची आपल्याशी बोलण्याची पद्धत, किंवा तिने वापरलेले विशिष्ट शब्द आपल्याला हे दाखवू शकतात की या व्यक्तीला राज्याच्या संदेशाविषयी निदान थोडीतरी आस्था आहे किंवा नाही. त्या आधारावर आपण या व्यक्तीची पुन्हा भेट घेऊ शकतो. एक बंधू सलग पाच आठवडे एका व्यक्तीकडे जात राहिले पण त्या व्यक्तीने त्यांच्याकडून कोणतेही साहित्य स्वीकारले नाही. सहाव्या भेटीत मात्र त्या व्यक्तीने साहित्य स्वीकारले आणि तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.
३ एखाद्या व्यक्तीला थोडीही आस्था असल्याचे तुम्हाला जाणवल्यास, तिची लगेच पुन्हा भेट घ्या. पहिल्या भेटीच्या दोनतीन दिवसांनंतरही तुम्ही गेल्यास हरकत नाही. या व्यक्तीच्या हृदयात पेरलेले बी हिरावून घेण्यास ‘दुष्टाला’ अर्थात सैतानाला संधी देऊ नका. (मत्त. १३:१९) अमुक अमुक दिवशी, इतक्या वाजता आपण येऊ असे कोणाला सांगितले असल्यास, त्या ठरलेल्या वेळी त्यांची भेट घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.—मत्त. ५:३७.
४ रस्त्यावरील सेवाकार्यात: रस्त्यावरील साक्षकार्य अथवा अनौपचारिक साक्षकार्य करताना आवड दाखवणारी एखादी व्यक्ती भेटल्यास तुम्ही तिची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न करता का? संभाषणाच्या शेवटी तुम्ही त्या व्यक्तीला असे म्हणू शकता, की “आपली ही चर्चा खरंच छान झाली. तुमच्याशी पुन्हा संपर्क साधायचा झाल्यास, तुमचा नंबर किंवा पत्ता मला मिळू शकेल का?” योग्य वाटल्यास, काही प्रचारक आवड दाखवणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक देतात किंवा एकमेकांचा दूरध्वनी क्रमांक घेण्याचे सुचवतात. जर लोक तुम्हाला नियमितपणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी साक्षकार्य करताना पाहात असतील तर तुम्हाला आपला दूरध्वनी क्रमांक किंवा पत्ता देण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांनी पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक देण्यास नकार दिला तरीसुद्धा तुम्ही पुन्हा त्यांना रस्त्यावर भेटाल तेव्हा त्यांची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करू शकता.
५ आपण झाडांना पाणी घालतो, त्यांची मशागत करतो आणि कालांतराने ही झाडे बहरतात, फुलतात तेव्हा आपल्याला मनापासून आनंद होतो. त्याचप्रकारे, आवड दाखवणाऱ्या व्यक्तींची पुन्हा भेट घेऊन त्यांना आध्यात्मिकरित्या प्रगती करण्यास आपण मदत करतो तेव्हा आपल्याला अशाचप्रकारचा आनंद मिळू शकतो. (१ करिंथ. ३:६) तर मग, जे थोडीशीही आवड दाखवतात अशा सर्व व्यक्तींची पुन्हा भेट घेण्याचे ध्येय ठेवा.