आपली पहिली प्रीति सोडू नका
१ स्वर्गीय गौरव मिळालेल्या येशूने, पहिल्या शतकातील इफिसस येथील मंडळीला असे म्हटले: “तू आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” (प्रक. २:४) त्याने असे म्हटले कारण अनेकांनी यहोवाबद्दल त्यांना आधी वाटणारी प्रीती सोडून दिली होती. आपण सत्याविषयीचे ज्ञान घेत होतो तेव्हा देवाबद्दल व सहमानवांबद्दल आपल्या मनात उत्कट प्रीती निर्माण झाली आणि यामुळे आपल्याला नव्यानेच मिळालेली आशा आवेशाने इतरांना सांगण्यास आपण प्रवृत्त झालो. पण सुरुवातीला असलेली ही प्रीती न सोडण्यास आणि सेवाकार्यात आपला आवेश मंदावू न देण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
२ वैयक्तिक अभ्यास व सभांना उपस्थित राहणे: आपण सत्याविषयीचे प्रथमच ज्ञान घेतले तेव्हा, कोणत्या गोष्टीमुळे आपल्या मनात देवाबद्दल व सहमानवांबद्दल प्रीती निर्माण झाली? आपण बायबलच्या अभ्यासातून यहोवाबद्दल जे काही शिकलो त्यामुळेच ही प्रीती निर्माण झाली नाही का? (१ योहा. ४:१६, १९) तेव्हा, ही प्रीती “उत्तरोत्तर अतिशय वाढावी” म्हणून आपण सातत्याने अचूक ज्ञान घेत राहिले पाहिजे आणि ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेत राहिले पाहिजे.—फिलिप्पै. १:९-११; १ करिंथ. २:१०.
३ या शेवटल्या काळात आपल्या जीवनात अनेक चिंता आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असतात. अशा परिस्थितीत नियमित स्वरूपाने वैयक्तिक अभ्यास करणे अतिशय कठीण वाटू शकते. (२ तीम. ३:१) आध्यात्मिक अन्न ग्रहण करण्याकरता आपल्या नित्यक्रमातून काही वेळ आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. मंडळीच्या सभांना उपस्थित राहणेही अतिशय महत्त्वाचे आहे. आणि विशेषतः ‘तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे दिसते’ तसतसे आपण हे आणखीनच केले पाहिजे.—इब्री १०:२४, २५.
४ सेवाकार्य: सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेतल्याने आपल्याला देवाबद्दल सुरुवातीला जे प्रेम होते ते टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. आपण सुवार्तेचा प्रचार करतो तेव्हा यहोवाच्या प्रेमळ अभिवचनांची आपण स्वतःला आठवण करून देत असतो आणि असे केल्यामुळे आपली आशा सतत डोळ्यासमोर ठेवण्यास व आपली प्रीती पूर्वीइतकीच उत्कट राखण्यास मदत होईल. बायबलमधील सत्य इतरांना शिकवण्याकरता आधी स्वतः ते स्पष्टपणे समजून घेण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपोआपच आपला विश्वास बळकट होतो.—१ तीम. ४:१५, १६.
५ यहोवा आपल्याकडून सर्व काही मिळवण्यास योग्य आहे, अर्थात, आपली प्रीतीसुद्धा. (प्रक. ४:११) तेव्हा तुमची प्रीती कधीही मंदावू देऊ नका. मनःपूर्वक वैयक्तिक बायबल अभ्यास करण्याद्वारे, नियमित सभांना उपस्थित राहण्याद्वारे आणि आपल्याला सर्वात प्रिय असणाऱ्या आशेविषयी इतरांना सांगण्याद्वारे आपली पहिली प्रीती उत्तरोत्तर वाढू द्या.—रोम. १०:१०.