प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
१ “ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.” (प्रकटी. १:३) हे शब्द प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे महत्त्व पटवून देतात. विशेषतः आजच्या काळात हे पुस्तक अत्यंत अर्थपूर्ण आहे कारण त्यातील बऱ्याच भविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या काळात आपण आज जगत आहोत. म्हणूनच आपण जानेवारी ८, २००७ रोजी सुरू होणाऱ्या सप्ताहापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत.
२ मागच्या वेळी आपण प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा अभ्यास केला होता तेव्हापासून आतापर्यंत जागतिक दृश्यपटलावर अनेक बदल घडून आले आहेत. (१ करिंथ. ७:३१) शिवाय, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणाऱ्यांच्या संख्येत बऱ्याच नव्या लोकांची भर पडली आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना प्रकटीकरणाच्या प्रत्येक वचनाच्या अभ्यासात सहभागी होण्याची कधीही संधी मिळालेली नाही. प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाच्या अभ्यासामुळे आपल्या सर्वांनाच भविष्यात घडणार असलेल्या घटनांकरता जागृत राहण्यास मदत मिळेल.—प्रक. १६:१५.
३ दर आठवडी या अभ्यासाला उपस्थित राहण्याचा निर्धार करा. या पुस्तकातील माहिती आपल्याला जागृत राहण्यास मदत तर करेलच, पण येशूने सात मंडळ्यांना दिलेल्या संदेशांतून आपल्याला अशा सर्व गोष्टी टाळण्यास साहाय्य मिळेल, की ज्या आपल्या आध्यात्मिक आरोग्याला हानीकारक ठरतील आणि सेवाकार्यात मंदावण्यास कारणीभूत ठरतील.—प्रक. १:११, १९.
४ उत्तम तयारी करा: प्रत्येक पुस्तक अभ्यासाआधी प्रकटीकरणाच्या पुस्तकातील ज्या वचनांचा अभ्यास केला जाणार आहे ती वाचून काढा. या वचनांचे शास्त्रवचनांच्या आधारावर कशाप्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे त्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनाला प्रेरणादायी ठरतील असे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करा. (नहे. ८:८, १२) वाचलेल्या साहित्यावर काहीवेळ मनन करा. स्वतःला विचारा: ‘यातून यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेबद्दल मला काय शिकायला मिळाले? मी यहोवाच्या उद्देशानुसार कशाप्रकारे वागावे आणि इतरांना कशाप्रकारे मदत करावी?’
५ ‘प्रभूचा दिवस’ १९१४ साली सुरू झाल्यापासून आता ९२ वर्षे उलटली आहेत. (प्रकटी. १:१०) प्रकटीकरणाच्या पुस्तकात भाकीत करण्यात आलेल्या, पृथ्वीला हादरवून सोडणाऱ्या घटना लवकरच घडणार आहेत. प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाच्या अभ्यासामुळे आपले मन व हृदय पुन्हा प्रेरित होईल आणि ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ आणि नवे जग अगदी जवळ आले आहे याविषयीचा आपला विश्वास आणखी बळकट होईल.—प्रकटी. १६:१४; २१:४, ५.