विचारशील व विनम्र असण्याद्वारे वैयक्तिक आस्था व्यक्त करा
१ यहोवा विश्वाचा सार्वभौम प्रभू असला तरीसुद्धा तो दयाळु, विचारशील आहे व अपरिपूर्ण मानवांबरोबर सौजन्यपूर्ण व्यवहार करतो. (उत्प. १९:१८-२१, २९) आपल्या विचारशील व विनम्र देवाचे अनुकरण करून आपणही सुवार्ता सादर करण्याच्या आपल्या पद्धतीची गुणवत्ता वाढवू शकतो. (कलस्सै. ४:६) यासाठी, केवळ आपल्या बोलण्यात आदरशील असणे पुरेसे नाही, तर आणखी पुष्कळ समाविष्ट आहे.
२ दारोदारी: समजा आपण प्रचाराला जातो तेव्हा घरमालकासाठी तो उचित समय नसतो किंवा आपल्याबरोबर बोलायला त्याला वेळ नसतो, तेव्हा आपण काय केले पाहिजे? आपण खरोखरच एका अनुचित समयी आलो आहोत हे आपण समजून घेतले पाहिजे आणि आपण मोजकेच बोलले पाहिजे किंवा आम्ही दुसऱ्या वेळी येऊ, असे त्यांना सांगितले पाहिजे. लोक जर आपली प्रकाशने घेऊ इच्छित नसतील तर आपण कसेही करून ती त्यांच्या गळ्यात घालायचा प्रयत्न करणार नाही. आपण जर इतरांचा विचार करणारे असू तर आपण त्यांच्या संपत्तीचा आदर करू. आपण लोकांच्या घरी जातो तेव्हा फाटक बंद करू आणि आपल्या मुलांनाही असे करण्यास आपण शिकवू. कुलूप असलेल्या दाराजवळ आपण कोणतीही प्रकाशने ठेवणार असू तर लोकांचे विनाकारण लक्ष आकर्षित होणार नाही अशा ठिकाणी आपण ती प्रकाशने ठेवण्याच्या बाबतीत दक्षता घेऊ. होय, विचारशीलता व विनम्रता या गुणांमुळे आपण, इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली इच्छा असते तसे त्यांच्याशी वागण्यास प्रवृत्त होऊ.—लूक ६:३१.
३ रस्त्यावरील साक्षकार्यात: रस्त्यावर साक्षकार्य करताना आपण लोकांच्या मार्गात अडथळा न बनण्याद्वारे व दुकानांसमोर गर्दी न करण्याद्वारे सौजन्य दाखवू शकतो. आपण इतरांची परिस्थिती समजून घेऊ. जे लोक खरोखरच घाईत आहेत अशा लोकांपेक्षा जे इतके घाईत नाहीत व जे आपल्याबरोबर काही मिनिटे बोलण्यास थांबू शकतात अशा लोकांबरोबर बोलण्याचा आपण प्रयत्न करू. कधीकधी, रस्त्यावर साक्षकार्य करताना आपल्याला मोठ्या आवाजात बोलावे लागेल. तरीपण आपण स्वतःकडे विनाकारण लोकांचे लक्ष आकर्षित न करता लोकांबरोबर आदरपूर्वक बोलले पाहिजे.—मत्त. १२:१९.
४ टेलिफोनवरून साक्षकार्य करताना: शांत ठिकाणाहून टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याद्वारे आपण इतरांबद्दल विचारशीलता दाखवू. आपण लगेच आपली ओळख देऊन फोन करण्यामागचे कारण सांगण्याद्वारे उत्तम शिष्टाचार दाखवतो. फोनचे रिसिव्हर योग्यप्रकारे धरून माफक आवाजात स्पष्टपणे बोलल्यास आपण इतरांना एका उभारणीकारक शास्त्रवचनीय संभाषणात गुंतवून ठेवू शकतो. (१ करिंथ. १४:८, ९) या अशा विविध मार्गात दयाळु, विचारी आणि सौजन्यपूर्ण असण्याद्वारे आपण आपला कृपाळू देव यहोवा याचे अनुकरण करतो.