“मला अनुसरत राहावे”
१ पुष्कळ लोक स्वतःला खूष करण्यातच आपले आयुष्य घालवतात आणि तरीपण बहुतेकदा ते आनंदी नसतात. याउलट येशूने निःस्वार्थ जीवनशैलीबद्दल सांगितले की ज्यात आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो. (प्रे. कृत्ये २०:३५) त्याने म्हटले: “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, . . . व मला अनुसरत राहावे.” (मार्क ८:३४) यांत, स्वतःला केवळ काही सुखांपासून अधूनमधून वंचित ठेवणे समाविष्ट नाही. तर, स्वतःला नव्हे तर यहोवाला दररोज आनंदित करणारे जीवन जगणे समाविष्ट आहे.—रोम. १४:८; १५:३.
२ प्रेषित पौलाच्या उदाहरणाचा विचार करा. ‘ख्रिस्त येशूविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे’ पौलाने व्यक्तिगत ध्येयांचा पाठलाग सोडून राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात आपले बहुतेक आयुष्य वेचले. (फिलिप्पै. ३:७, ८) त्याने म्हटले: “मी [इतरांच्या] जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन.” (२ करिंथ. १२:१५) तेव्हा, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे: ‘मी माझा वेळ, माझी शक्ती, माझ्या क्षमता आणि माझ्या संपत्तीचा उपयोग कसा करत आहे? माझं लक्ष, माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यावरच केंद्रित आहे की यहोवाला संतुष्ट करणारी जीवनशैली व्यतीत करण्यावर आहे?’
३ देण्यासाठी संधी: दर वर्षी, देवाचे लोक जीवन वाचवण्याच्या अर्थात राज्य प्रचाराच्या कार्यात १०० कोटीपेक्षा अधिक तास खर्च करतात. मंडळीत, तरुण आणि वृद्ध असे सर्वजण इतरांचे भले करणाऱ्या विविध नेमणुका पार पाडतात. शिवाय, संमेलने, अधिवेशने यांच्यासंबंधाने तसेच खऱ्या उपासनेच्या वृद्धीकरता वापरल्या जाणाऱ्या इमारतींच्या बांधकामाच्या व त्यांना सुस्थितीत ठेवण्याच्या संबंधाने देखील बरीच कामे केली जातात. तसेच, इस्पितळ सहकार्य समितीत व रुग्ण भेट गटात सेवा करणाऱ्या बांधवांकडून मिळणाऱ्या प्रेमळ साहाय्याबद्दलही विचार करा. या बांधवांचे हे निःस्वार्थ प्रयत्न आपल्या ख्रिस्ती बंधूसमाजाला जणू एक वरदान आहेत!—स्तो. ११०:३.
४ एखादे संकट किंवा आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा, विविध मार्गांनी साहाय्य देण्याच्या आपल्यासमोर अनेक संधी येऊ शकतात. पण, बहुतेक बाबतीत आपल्याला जाणवेल, की एखाद्या सहख्रिश्चन बंधू अथवा भगिनीला साहाय्याची किंवा उत्तेजनाची गरज आहे. (नीति. १७:१७) आपण इतरांची सेवा करण्याकरता आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आनंदाने पुढाकार घेतो तेव्हा आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करत असतो. (फिलिप्पै. २:५-८) असे आपण सतत करत राहण्याचा प्रयत्न करीत राहू या.