बायबल काय शिकवते पुस्तक —बायबल अभ्यासाचे आपले मुख्य साधन
१ “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशनात बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले तो किती आनंदाचा क्षण होता! शनिवारचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांना एक वैयक्तिक प्रत देण्यात आली तेव्हाही सर्वांना खूप आनंद झाला. या नव्या अभ्यास साधनाचा कशाप्रकारे उपयोग केला जाईल? बायबल अभ्यास चालवण्याकरता प्रामुख्याने या प्रकाशनाची रचना करण्यात आली आहे. साहित्य सादरता म्हणून आपण हे पुस्तक मार्च महिन्यात वापरणार असलो तरी, प्रचारकांना प्रोत्साहन दिले जाते की त्यांनी आतापासूनच या पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करण्यास व चालवण्यास सुरुवात करावी.
२ सध्या सुरू असलेले बायबल अभ्यास: जे प्रचारक सध्या ज्ञान पुस्तकातून अथवा अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास चालवत आहेत, त्यांनी तारतम्य वापरून, अभ्यासात नवे प्रकाशन केव्हा व कसे वापरण्यास सुरू करता येईल हे ठरवावे. जर अभ्यास अलीकडेच सुरू करण्यात आला असेल, तर तुम्ही नव्या पुस्तकाचा सुरूवातीपासून अभ्यास सुरू करू शकता. जर ज्ञान पुस्तकाचा बराचसा भाग तुम्ही संपवला असेल तर मग बायबल काय शिकवते या पुस्तकातून संबंधित अध्यायापासून तुम्ही अभ्यास पुढे चालवू शकता. ज्ञान पुस्तक संपत आले असेल तर ते पुस्तक पूर्ण करण्याचे तुम्ही ठरवू शकता.
३ बायबल काय शिकवते या पुस्तकाचा अभ्यास केल्यामुळे ज्यांना फायदा होईल अशा बऱ्याच व्यक्ती आपल्या सर्वांच्याच मनात असतील. तेव्हा, या क्रमवार अभ्यास साधनाच्या साहाय्याने बायबल अभ्यास करण्याचा प्रस्ताव त्या प्रत्येक व्यक्तीसमोर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता का? उदाहरणार्थ, ज्यांनी अपेक्षा माहितीपत्रकाचा किंवा ज्ञान पुस्तकाचा अभ्यास केला आहे पण समर्पण व बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती केलेली नाही, ते कदाचित या नव्या पुस्तकाच्या साहाय्याने अभ्यास करण्याची तयारी दर्शवतील. आईवडील आपल्या मुलांना देवाच्या इच्छेविषयी अचूक ज्ञान देण्याकरता या प्रकाशनाचा उपयोग करण्याचे ठरवू शकतात.—कलस्सै. १:९, १०.
४ दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास: बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर बायबल विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या पुस्तकातून अभ्यास चालवण्याची तरतूद आहे का? हो. जर हा विद्यार्थी, हळूहळू का होईना, पण प्रगती करत आहे आणि शिकलेल्या माहितीचा कृतज्ञतेने स्वीकार करत आहे असे दिसल्यास एकाच खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) या पुस्तकातून अभ्यास पुढे चालवला जाऊ शकतो. आम्हाला खातरी आहे की आपल्यावर सोपवलेले शिष्य बनवण्याचे कार्य पार पाडताना बायबल काय शिकवते हे पुस्तक अतिशय प्रभावी साधन ठरेल.—मत्त. २८:१९, २०.