प्रश्न विचारून व लक्षपूर्वक ऐकून —वैयक्तिक आस्था व्यक्त करा
१ बहुतेक जणांना आपले विचार व्यक्त करायला आवडते पण दुसरी व्यक्ती लांबलचक भाषण देऊ लागते किंवा आपल्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागते तेव्हा त्यांना सहसा ते आवडत नाही. तेव्हा, ख्रिस्ती सेवक या नात्याने आपण प्रश्नांच्या साहाय्याने लोकांच्या मनातले विचार जाणून घेण्याची कला आत्मसात केली पाहिजे.—नीति. २०:५.
२ आपल्या प्रश्नांनी समोरच्या व्यक्तीवर दडपण आणू नये, तर तिला बोलके करावे. घरोघरच्या प्रचार कार्यात एक बंधू घरमालकाला असे विचारतात: “सर्व लोक एकमेकांशी आदरानं व सन्मानानं वागतील असा काळ कधी येईल असं तुम्हाला वाटतं का?” घरमालक कसा प्रतिसाद देतो त्यानुसार मग ते पुढे असे विचारतात, “तुम्हाला काय वाटतं हे कसं घडवून आणता येईल?” किंवा “असं का वाटतं तुम्हाला?” एक बंधू अनौपचारिक साक्षकार्य अथवा सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना, ज्यांना मुले आहेत अशा व्यक्तींना असे विचारतात, “तुमच्या मते आईवडील म्हणून मुलांना वाढवण्याचा सर्वात समाधानदायक पैलू कोणता?” मग ते विचारतात, “मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या समस्यांपैकी, तुम्हाला कोणत्या समस्या सर्वात जास्त चिंताजनक वाटतात?” या प्रश्नांचे परीक्षण केल्यास, तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न लोकांच्या मनावर दडपण न आणता त्यांना आपली मते व्यक्त करण्याची संधी देतात. अर्थात, परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्यामुळे आपल्या क्षेत्रानुसार कदाचित आपल्याला चर्चेचा विषय आणि आपली प्रश्न विचारण्याची शैली बदलावी लागेल.
३ लोकांना बोलके करणे: जर लोक आपले विचार व्यक्त करण्यास उत्सुक असतील, तर शांतपणे त्यांचे ऐकून घ्या. त्यांना मध्येच अडवू नका. (याको. १:१९) त्यांच्या अभिप्रायांविषयी आदरपूर्वक संमती दर्शवा. (कलस्सै. ४:६) तुम्ही फक्त इतकेही म्हणू शकता: “आपला अभिप्राय व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे.” शक्य असल्यास त्यांची प्रशंसा करा, पण तुमची प्रशंसा कृत्रिम वाटणार नाही याची काळजी घ्या. त्यांचे विचार आणि ते असा विचार का करतात हे जाणून घेण्याकरता विनम्रपणे आणखी काही प्रश्न विचारा. चर्चेकरता काहीतरी समान आधार तयार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखाद्या शास्त्रवचनाकडे त्यांचे लक्ष वेधायचे असल्यास तुम्ही असे म्हणू शकता, “याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?” आपलेच म्हणणे खरे आहे या आविर्भावात बोलू नका, व वाद घालण्याचा प्रयत्न करू नका.—२ तीम. २:२४, २५.
४ समोरची व्यक्ती आपल्या प्रश्नांना कसा प्रतिसाद देते हे बऱ्याच अंशी आपण तिची उत्तरे कितपत लक्ष देऊन ऐकतो यावर अवलंबून आहे. आपण मनापासून ऐकत आहोत किंवा नाही हे लोकांना चटकन ओळखता येते. एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे निरीक्षण केले, “एखाद्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेणे हा, त्या व्यक्तीशी मैत्री करण्याचा अतिशय प्रभावी मार्ग आहे. तसेच त्या व्यक्तीबद्दल प्रेमळ वैयक्तिक आस्था व्यक्त करण्याचाही हा एक उत्तम मार्ग आहे.” आपण दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घेतो तेव्हा त्यांच्याबद्दल आपण आदर व्यक्त करतो आणि यामुळे कदाचित आपण जी सुवार्ता त्यांना सांगू इच्छितो ती ऐकून घेण्याची त्यांना प्रेरणा मिळू शकते.—रोम. १२:१०.