मी ऐकणारी व्यक्ती कशी मिळवू शकतो?
१ फिलिप्पैच्या शहरात, “लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती, ती . . . जांभळी वस्त्रे विकीत असे . . . तिने आमचे . . . ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने [यहोवा, NW] असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.” (तिरपे वळण आमचे.) (प्रे. कृत्ये १६:१४) हा अहवाल आपल्याला काय शिकवतो? ऐकल्यानेच एखाद्या व्यक्तीचा सत्य शिकण्याचा मार्ग मोकळा होता. राज्य संदेशाची सहभागिता, घरमालकाच्या ऐकण्याच्या इच्छेवर प्रामुख्याने अवलंबून असते. एकदा आपल्याला ऐकणारी व्यक्ती मिळाल्यास, आपला संदेश प्रस्तुत करणे तुलनात्मकरित्या सोपे बनते. परंतु, ऐकण्यासाठी कोणाचे तरी लक्ष वेधणे एक आव्हान असू शकते. आपण काय करू शकतो?
२ सेवेत सहभाग घेण्याआधी, आपल्या पेहरावाकडे आणि वापरणार असलेल्या साधनांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. का बरे? स्वतःला माननीयतेने सादर करणाऱ्याचे ऐकण्यास लोकांची अधिक इच्छा असते. आपला पेहराव सद्अभिरुचीचा तरीही सभ्य असा आहे का? जगामध्ये गबाळा पेहराव लोकप्रिय असला, तरी आपण असा निष्काळजीपणा टाळतो कारण आपण देवाच्या राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे सेवक आहोत. आपला स्वच्छ व नीटनेटका पेहराव आपण प्रचार करत असलेल्या राज्याच्या संदेशाला अनुकूलतेने पुष्टी देतो.
३ मैत्रिपूर्ण आणि आदरभाव दाखवणारे असा: आजच्या मनोवृत्ती बदलत असल्या, तरी अनेक लोकांना बायबलविषयी आदर आहे आणि बायबलमध्ये काय आहे याबद्दलच्या आदरणीय व मैत्रिपूर्ण संभाषणाला ते अनुकूलतेने प्रतिसाद देतील. एक स्नेहपूर्ण, मनःपूर्वक स्मित घरमालकास शांत करू शकते आणि सुखावह चर्चेसाठी मार्ग खुला करू शकते. आपल्या भाषेत आणि वर्तनात, आपला प्रांजळपणा आणि शिष्टाचारही दिसून आला पाहिजे, ज्यामध्ये घरमालकाच्या निरीक्षणांना आदराने ऐकणे देखील समाविष्ट आहे.
४ इतरांना बायबलची आशा सांगणे हा आपला उद्देश आहे. हे लक्षात ठेवून, आपले संभाषण अपीलकारक आणि चातुर्याचे असून प्रतिकूल किंवा आव्हानात्मक नसल्याची आपण खात्री केली पाहिजे. स्पष्टरित्या विरोध करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालण्यात वेळ खर्च करण्याची काही गरज नाही. वादविवाद करण्यात विजय मिळवण्याचे किंवा ज्यांना आपले कार्य आवडत नाही अशांवर आपले विश्वास लादण्याचे आपले ध्येय नाही. (२ तीम. २:२३-२५) आमची राज्य सेवा आणि युक्तिवाद पुस्तकात आपल्यासाठी पुरवलेल्या निरनिराळ्या उत्तेजनदायक आणि समयोचित सादरतांमधून आपण निवड करू शकतो. अर्थात, त्यांची चांगली तयारी करण्याची आपल्याला गरज आहे जेणेकरून आपण स्नेहपूर्ण आणि खात्रीदायक पद्धतीने बोलू शकतो.—१ पेत्र ३:१५.
५ आपल्या भेटीनंतर, आपण काय म्हटले होते ते फारच कमी घरमालकांच्या आठवणीत राहते. तथापि, ज्या पद्धतीने ते सांगण्यात आले होते ते प्रत्यक्षात सर्वांच्या आठवणीत राहते. चांगुलपणा आणि दया यांच्या शक्तीला आपण कधीच कमी लेखू नये. लुदियाने पहिल्या शतकात केले त्याप्रमाणे, आपल्या क्षेत्रात असे अनेक मेंढरासमान लोक आहेत जे सत्य ऐकतील. आपला पेहराव आणि बोलण्याची पद्धत याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवल्याने प्रामाणिक लोकांना देवाचे वचन ऐकण्यास आणि अनुकूलरित्या त्याचा स्वीकार करण्यास उत्तेजन मिळेल.—मार्क ४:२०.