जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करणे
१. जास्तीत जास्त लोकांना सुवार्ता ऐकायला मिळावी म्हणून सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी काय केले?
१ येशूचे सुरुवातीचे अनुयायी, राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्याकरता खूप झटले. जास्तीत जास्त लोकांना सुवार्ता ऐकायला मिळावी म्हणून त्यांनी अनेक परिणामकारक पद्धतींचा वापर केला. ख्रिस्ती बायबल लेखकांनी आपली देवप्रेरित लिखाणे सर्वसामान्य ग्रीक भाषेत लिहिली, जी रोमी साम्राज्याची आंतरराष्ट्रीय भाषा होती. शिवाय, सा.यु. दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील आवेशी प्रचारकच कदाचित, प्राचीन लिखाणांचा ग्रंथांच्या रूपात (कोडेक्स) वापर करणारे पहिले असावेत. गुंडाळीच्या तुलनेत हे ग्रंथ संदर्भ पडताळून पाहण्याकरता अतिशय सोयीस्कर होते.
२, ३. (क) आधुनिक काळात यशया ६०:१६ कशाप्रकारे पूर्ण होत आहे? (ख) शुद्ध उपासनेचा प्रसार करण्याकरता तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग केला जात आहे?
२ तंत्रज्ञानाचा वापर: संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने असे भाकीत केले होते: “तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील.” (यश. ६०:१६) या भविष्यवाणीची आधुनिक काळात या अर्थाने पूर्णता होत आहे, की यहोवाचे सेवक आज राष्ट्रांतून अनेक उपयुक्त साधनांचा उपयोग करून प्रचार कार्य पुढे नेत आहेत. उदाहरणार्थ १९१४ मध्ये, ध्वनीसहित चलचित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होण्याच्या कित्येक वर्षांआधीच बायबल विद्यार्थी “फोटोड्रामा ऑफ क्रिएशन” दाखवू लागले. या आठ तासांच्या रंगीत व ध्वनिसहित चलचित्रपट व स्लाईड खेळाने लाखो लोकांना प्रभावशाली साक्ष दिली.
३ आज देवाचे लोक अतिवेगवान मुद्रणयंत्रांचा आणि संगणकचलित साधनांचा उपयोग करून शेकडो भाषांत बायबल व बायबल आधारित साहित्य प्रकाशित करत आहेत. जलद वाहतुकीच्या माध्यमांद्वारे बायबलचे साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यांत, म्हणजे २३५ देशांतील लोकांपर्यंत पोचते केले जाते. यहोवाने आपल्या आत्म्याद्वारे आपल्या सेवकांना अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास प्रेरित केले आहे जेणेकरून बायबलचे सत्य इतिहासात कधी नव्हे इतक्या जास्त लोकांना उपलब्ध झाले आहे.
४. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता नेण्याकरता काहींनी आपल्या जीवनात कोणत्या तडजोडी केल्या आहेत?
४ वैयक्तिक तडजोडी: जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता नेण्याकरता अनेक खरे उपासक आपल्या वैयक्तिक जीवनात तडजोडी करण्यास प्रवृत्त झाले आहेत. कित्येकांनी प्रचार कार्यात अधिक सहभाग घेण्याकरता आपले राहणीमान साधे केले आहे. काहीजण राज्य उद्घोषकांची जेथे जास्त गरज आहे अशा भागांत राहायला गेले आहेत. इतरांनी नवी भाषा शिकून घेण्याद्वारे आपले सेवाकार्य वाढवले आहे.
५, ६. आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याकरता काय केले जाऊ शकते?
५ याशिवाय, लोक जेव्हा घरी असतात तेव्हा, आणि लोक ज्या ठिकाणी असतात तेथे प्रचार करण्याद्वारेही आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवू शकतो. जर तुमच्या क्षेत्रात दिवसा बरेचसे लोक घरी सापडत नसतील, तर तुम्ही आपल्या दिनक्रमात थोडाफार बदल करून संध्याकाळी अंधार पडण्याआधी काही तास साक्षकार्य करण्याची व्यवस्था करू शकता का? साक्षकार्य करता येईल अशी काही सार्वजनिक ठिकाणे आहेत का? तुम्ही टेलिफोनने साक्षकार्य करण्याचा अथवा व्यापार क्षेत्रात साक्षकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे का? अनौपचारिक रित्या साक्षकार्य करण्याच्या संधी तुम्ही शोधत असता का?
६ यहोवाच्या नावाबद्दल व त्याच्या राज्याबद्दल आज जी महान साक्ष दिली जात आहे त्यात सहभाग घेण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! म्हणूनच, देवाच्या वचनातील जीवनदायक सत्य जास्तीत जास्त लोकांना आपण सांगत राहू या.—मत्त. २८:१९, २०.