तुमच्या मुलांना सेवाकार्यात प्रगती करण्यास मदत करा
१ ख्रिस्ती पालकांवर एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. ती म्हणजे, आपल्या मुलांना अगदी लहान वयापासूनच सेवाकार्याचा प्रशिक्षण देणे. हे अनेक मार्गांनी साध्य करता येते. काही मुले वाचायला शिकण्याआधीच बायबलमधील एखादे योग्य वचन तोंडपाठ म्हणायला शिकतात. याचा ऐकणाऱ्यांवर अतिशय चांगला प्रभाव पडू शकतो. लहान मुले थोडी मोठी झाल्यावर, ते सेवाकार्यात आणखी जास्त सहभाग घेऊ शकतात. पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना साक्ष देण्यास कशी मदत करू शकता? कदाचित येथे सुचवलेले काही मुद्दे तुम्हाला याबाबतीत उपयोगी ठरतील.
२ घरमालकाला नमस्कार केल्यावर तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “माझा मुलगा [त्याचे नाव] याला एक अर्थपूर्ण शास्त्रवचन तुम्हाला सांगायचेय.” तुमचा मुलगा असे म्हणू शकतो: “स्तोत्रसंहितेतील या वचनातून मला देवाचे नाव कळले. [मुलाने मग स्तोत्र ८३:१८ वाचून दाखवावे अथवा म्हणून दाखवावे.] यहोवा देव आपल्यासाठी काय करणार आहे हे या मासिकांत सांगितले आहे. तुम्हाला ही मासिके वाचायला आवडेल का?” मग तुम्ही, आपल्या जागतिक कार्याला कशाप्रकारे आर्थिक हातभार लावला जातो हे स्पष्ट करून संभाषण संपवू शकता.
३ किंवा तुम्ही ही वेगळी पद्धत वापरू शकता:
▪ “नमस्कार. ही माझी मुलगी [तिचे नाव] आहे, आणि आज मी तिला आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांबद्दल काळजी कशी व्यक्त करायची हे शिकवतेय. तिला बायबलमधून एक लहानसा संदेश तुम्हाला सांगायचा आहे.” मग ती असे म्हणू शकते: “लोकांना मदत करण्यासाठी, बायबलमध्ये भविष्याबद्दल जी आशा दिलीय त्याविषयी त्यांना सांगायला मला आवडते. [मुलीने प्रकटीकरण २१:४ वाचावे अथवा म्हणून दाखवावे.] देवाचे राज्य आपल्याकरता काय काय करेल हे या मासिकांत सांगितले आहे. तुम्हाला ही नक्कीच आवडतील.”
४ साधीशी सादरता वापरून सातत्याने मुलांना सहभाग घेण्यास शिकवल्यामुळे इतरांना राज्य संदेश सांगण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. स्पष्टपणे व किती मोठ्याने बोलायचे याचा सराव केल्यास त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत कसे बोलायचे याचे प्रशिक्षण मिळेल. चांगली पूर्वतयारी आणि प्रामाणिकपणे प्रशंसा केल्यामुळे या चिमुकल्यांना आपला विश्वास व्यक्त करण्यास साहाय्य मिळेल.
५ अशाप्रकारे प्रोत्साहन दिल्यामुळे अनेक लहान मुलांनी बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनण्याइतकी प्रगती केली आहे. या कोवळ्या मुलांना ख्रिस्ती सेवाकार्यात प्रगती करताना पाहून खरोखर किती आनंद वाटतो!—स्तो. १४८:१२, १३.