सार्वजनिक ठिकाणी परिणामकारकरित्या साक्ष देणे
१. पहिल्या शतकातील शिष्यांप्रमाणे आजही ख्रिस्ती सार्वजनिक ठिकाणी कशाप्रकारे साक्ष देत आहेत आणि यामुळे कोणता परिणाम दिसून आला आहे?
१ येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांसारखेच आजच्या काळातले ख्रिस्ती देखील, जेथे कोठे लोक सापडतील तेथे त्यांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतात. (प्रे. कृत्ये १६:१३; १७:१७; २०:२०, २१) सार्वजनिक ठिकाणी साक्ष देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना असे अनेक आस्थेवाईक लोक भेटत आहेत की ज्यांच्याशी घरोघरच्या सेवाकार्याद्वारे संपर्क साधणे अशक्य होते.
२. सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना समजदारीने काम करणे का महत्त्वाचे आहे आणि सुनियोजित पद्धतीने कार्य पार पडावे म्हणून आपण कसा हातभार लावू शकतो?
२ सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना समजदारीने वागणे महत्त्वाचे आहे. सहसा, लोकांचे आपल्याकडे लक्ष आकर्षित होणार नाही अशारितीने आपण कार्य केले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एकाच परिसरात किंवा एकाच दुकानात बरेच प्रचारक गेले तर विनाकारण लोकांचे आपल्याकडे लक्ष जाईल आणि काहीजण चिडण्याचीही शक्यता आहे. यामुळे लोकांना आपल्या कार्याबद्दल आदर वाटणार नाही आणि आपल्याला आपल्या कार्यातून चांगले परिणाम मिळणार नाहीत. मग असे घडू नये म्हणून काय करता येईल? ज्या मंडळ्यांकडे सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करता येईल असे बरेच क्षेत्र आहे, त्यांच्यापैकी बऱ्याच मंडळ्यांनी या क्षेत्राचे पद्धतशीर विभाजन केले आहे. (१ करिंथ. १४:४०) याशिवाय, सुनियोजित पद्धतीने कार्य केले जावे म्हणून आपणही व्यक्तीशः हातभार लावू शकतो. कसा? तर फक्त आपल्या मंडळीला नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रातच कार्य करण्याद्वारे. अर्थात, जर दुसऱ्या मंडळीला मदत करण्यासाठी मंडळीच्या सेवा समितीमार्फत काही निश्चित व्यवस्था करण्यात आल्या असतील तर गोष्ट वेगळी आहे.—आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर १९९८ अंकातील पृ. ६, परि. १८-१९ कृपया पाहा.
३. सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना काहींना कशाप्रकारे संभाषणास सुरुवात करणे परिणामकारक असल्याचे आढळले आहे?
३ संभाषण कसे सुरू करावे?: येशूने विहिरीजवळ एका स्त्रीशी संभाषण केले तेव्हा त्याने सुरुवातीला एक संक्षिप्त विधान केले आणि मग तिला आस्था आहे हे दिसून आल्यावर हळूहळू इतर गोष्टी सांगितल्या. (योहा. ४:७-२६) आजही काही ठिकाणी हीच पद्धत परिणामकारक ठरू शकते. काही प्रचारकांना असे दिसून आले आहे की सार्वजनिक साक्षकार्यात परिणामकारक ठरण्याकरता, सरळ राज्याचा संदेश सांगण्यास सुरुवात करण्याऐवजी, प्रथम अभिवादन करणे, लोकांची विचारपूस करणे महत्त्वाचे आहे. यानंतर ते लोकांच्या आस्थेच्या एखाद्या विषयाचा उल्लेख करतात आणि एखादे संक्षिप्त विधान करतात. यामुळे सहसा आपोआपच संभाषणाला सुरुवात होते. लोक आपली मते, काळजी व्यक्त करतात तेव्हा ते लक्षपूर्वक ऐकतात. आणि अशारितीने अगदी सहजपणे त्यांनी देवाच्या वचनातून सांत्वनदायक वचने दाखवण्यास सुरुवात केलेली असते.—रोम. १५:४.
४. आस्थेवाईक व्यक्ती भेटल्यावर आपण तिची आस्था कशी वाढवू शकतो?
४ आस्था वाढवणे: जेव्हा जेव्हा आपली एखाद्या व्यक्तीशी चांगली चर्चा होते तेव्हा तेव्हा आपण, त्या व्यक्तीची आस्था वाढवण्याकरता परत तिची भेट घेण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपण हे कसे करू शकतो? चर्चा संपत आल्यावर तुम्ही आपले नोटबुक काढून असे म्हणू शकता: “आपली ही चर्चा फारच छान झाली. पुन्हा तुम्हाला भेटून ही चर्चा सुरू ठेवता येईल का?” किंवा: “माझ्याकडे एक लेख आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. मी तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये तो आणून देऊ का?” काही प्रचारक फक्त एवढेच विचारतात: “तुमचा फोननंबर मला मिळू शकेल का?” सहसा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.
५. सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना आपण कोणते ध्येय बाळगले पाहिजे?
५ ज्यांच्याशी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी भेट झाली होती अशा अनेकांनी बायबल अभ्यास स्वीकारला. अभ्यास, या व्यक्तीच्या घरी, नोकरीच्या ठिकाणी, एखाद्या सोयीस्कर सार्वजनिक ठिकाणी किंवा टेलिफोनने केला जाऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी परिणामकारक रितीने साक्षकार्य करताना बायबल अभ्यास सुरू करण्याचे आपण ध्येय ठेवू या.