प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग १०: विद्यार्थ्यांना घरोघरच्या साक्षकार्याकरता तयार करणे
१ बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्याच्या योग्यतेचा आहे असे वडिलांनी ठरवल्यावर तो विद्यार्थी मंडळीसोबत सार्वजनिक प्रचार कार्यात सहभागी होऊ शकतो. [यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास सुसंघटित, (इंग्रजी) पृष्ठे ७९-८१ कृपया पाहा.] घरोघरचे प्रचार कार्य करण्याचे ध्येय गाठण्यास आपण विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो?
२ सोबत मिळून तयारी करणे: चांगली तयारी करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आमची राज्य सेवा व युक्तिवाद (इंग्रजी) या पुस्तकात सुचवलेल्या सादरता पाहून, स्थानिक क्षेत्रात वापरण्याजोग्या साध्या सादरता निवडण्यास त्याला मदत करा. सुरुवातीपासूनच सेवाकार्यात बायबलचा वापर करण्याचे त्याला प्रोत्साहन द्या.—२ तीम. ४:२.
३ नव्या प्रचारकाकरता सादरतांचा सराव करणे अतिशय फायदेकारक ठरू शकते. सराव करताना, क्षेत्रात सहसा ऐकायला मिळणाऱ्या प्रतिक्रियांना व्यवहारचातुर्याने कसे उत्तर देता येईल हे त्याला दाखवा. (कल. ४:६) त्याला समजावून सांगा की ख्रिस्ती सेवकांना घरमालकाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीत असलेच पाहिजे असे नाही. सहसा, असा प्रश्न विचारण्यात आल्यास आपण आणखी संशोधन करून पुढच्यावेळी येऊन चर्चा करू असे घरमालकाला सांगू शकतो.—नीति. १५:२८.
४ सोबत प्रचाराला जाणे: विद्यार्थी पहिल्यांदा घरोघरच्या सेवाकार्यात सहभागी होतो तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून तयार केलेली सादरता तुम्ही कशाप्रकारे उपयोगात आणता हे पाहण्याची त्याला संधी द्या. मग, घरमालकाशी संभाषण करताना त्यालाही सहभागी करा. कधीकधी, नव्या प्रचारकाला सादरतेचा केवळ काही भाग सादर करायला लावले जाऊ शकते, उदाहरणार्थ शास्त्रवचन वाचणे किंवा त्यावर टिप्पणी करणे. प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व व त्याच्या क्षमता लक्षात घेण्याची गरज आहे. (फिलिप्पै. ४:५) प्रचारकार्याच्या विविध पैलूंचे क्रमवार प्रशिक्षण देतेवेळी विद्यार्थ्याची वेळोवेळी मनःपूर्वक प्रशंसा करण्यास विसरू नका.
५ नव्या प्रचारकाला सेवाकार्यात नियमित स्वरूपाने, शक्यतो दर आठवडी सहभागी होता येईल अशारितीने त्याला वेळेचे नियोजन करण्यास मदत करण्याची गरज आहे. (फिलिप्पै. ३:१६) सोबत मिळून सेवा करण्याकरता त्याच्यासोबत निश्चित व्यवस्था करा आणि मंडळीतल्या इतर आवेशी प्रचारकांसोबतही काम करण्याचे त्याला प्रोत्साहन द्या. त्यांच्या उदाहरणामुळे व संगतीमुळे विद्यार्थ्याला आनंदाने घरोघरचे प्रचार करण्याकरता आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करता येईल.