प्रचार कार्य धीर धरण्यास मदत करते
१ “नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे,” असे प्रोत्साहन देवाचे वचन आपल्याला देते. (इब्री १२:१) स्पर्धेत यशस्वी होण्याकरता ज्याप्रकारे एका धावकाला धीराची गरज असते त्याचप्रकारे सार्वकालिक जीवनाचे फल प्राप्त करण्याकरता आपल्यालाही धीराची गरज आहे. (इब्री १०:३६) ख्रिस्ती सेवाकार्य आपल्याला शेवटपर्यंत विश्वासूपणे धीर धरण्यास कसे मदत करू शकते?—मत्त. २४:१३.
२ आध्यात्मिक बळ मिळते: नीतिमान नव्या जगाच्या अद्भूत प्रतिज्ञेविषयी आपण इतरांना सांगतो तेव्हा आपली स्वतःची आशा आपल्या डोळ्यांपुढे ज्वलंत राहते. (१ थेस्सलनी. ५:८) क्षेत्र सेवाकार्यात आपण नियमित भाग घेतल्यास बायबलमधून आपण जी सत्ये शिकलो ती इतरांना सांगण्याची आपल्याला संधी मिळते. आपल्याला आपल्या विश्वासाचे समर्थन करण्याची संधी मिळते आणि यामुळे आपण आध्यात्मिकरित्या बळकट होतो.
३ इतरांना परिणामकारक पद्धतीने शिकवण्याकरता बायबलची सत्ये आपण स्वतः नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. याकरता संशोधन व मनन करावे लागेल. पण आपण यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करतो तेव्हा आपले ज्ञान वाढते, आपला विश्वास मजबूत होतो आणि आपल्याला आध्यात्मिक उत्साह मिळतो. (नीति. २:३-५) अशारितीने इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते.—१ तीम. ४:१५, १६.
४ दियाबलाचा व त्याच्या दुरात्म्यांचा प्रतिकार करण्याकरता आवश्यक असलेल्या ‘देवाच्या शस्त्रसामग्रीमधील’ एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेणे. (इफिस. ६:१०-१३, १५) पवित्र सेवेत व्यग्र राहिल्याने आपल्याला उभारणीकारक गोष्टींबद्दल नेहमी विचार करत राहण्यास मदत मिळते आणि अशारितीने आपण सैतानाच्या जगाकरवी भ्रष्ट होण्याचे टाळतो. (कलस्सै. ३:२) आपण जेव्हा इतरांना यहोवाचे मार्ग शिकवतो तेव्हा आपली स्वतःची वागणूक पवित्र राखणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला जाणीव होते.—१ पेत्र २:१२.
५ देव सामर्थ्य देतो: शेवटले म्हणजे, प्रचार कार्यात सहभागी झाल्याने आपण यहोवावर विसंबून राहण्यास शिकतो. (२ करिंथ. ४:१, ७) हा किती मोठा आशीर्वाद आहे! देवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकल्यामुळे आपण केवळ आपले सेवाकार्यच पूर्ण करायला नव्हे, तर जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ होतो. (फिलिप्पै. ४:११-१३) खरे पाहिल्यास, यहोवावर पूर्णपणे विसंबून राहायला शिकणे हीच धीर धरण्याकरता सर्वात आवश्यक गोष्ट आहे. (स्तो. ५५:२२) तर अशारितीने प्रचार कार्य हे अनेक मार्गांनी आपल्याला धीर धरण्यास मदत करते.