नेटाने प्रचार करीत राहा
१ कठीण दिवस चालले आहेत. मुलकी संघर्ष, वांशिक युद्धे, नैसर्गिक आपत्ती आणि इतर भयानक घटना रोजच्याच बनल्या आहेत. पूर्वी कधी नव्हे इतकी आज मानवजातीला सुवार्तेची गरज आहे. परंतु, आध्यात्मिक गोष्टींबद्दल उदासीन मनोवृत्ती देखील वाढत चालली आहे. काही क्षेत्रात, लोक घरी सापडणे मुश्किल झाले आहे, आणि आपला संदेश ऐकून घेणारे व बायबलचा अभ्यास करू इच्छिणारे लोक भेटणे आणखी मुश्किल झाले आहे. तरीसुद्धा, आपण देवाच्या स्थापित राज्याच्या सुवार्तेचा प्रचार नेटाने करीत राहणे महत्त्वाचे आहे.—मत्त. २४:१४.
२ लोकांबद्दल प्रेम: यहोवाचे लोकांवर प्रेम आहे ही वस्तुस्थिती, त्याने सुवार्ता ऐकवण्याची जी योजना केली आहे त्यावरून सिद्ध होते. “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९; यहे. ३३:११) म्हणूनच त्याने दिलेल्या आज्ञेविषयी येशू म्हणाला: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) माझ्याकडे या आणि सैतानी जगावर येणाऱ्या न्यायदंडापासून स्वतःला वाचवा, अशी विनवणी देव लोकांना करतो. (योए. २:२८, २९, ३२; सफ. २:२, ३) यहोवाने आपल्याला ही संधी दिल्याबद्दल आपण त्याचे आभारी नाही का?—१ तीम. १:१२, १३.
३ जगभराचा अहवाल दाखवतो, की २००४ सेवा वर्षात दर महिन्याला सरासरी ६०,८५,३८७ बायबल अभ्यास संचालित करण्यात आले, आणि दर आठवडी अंदाजे ५,००० नवीन शिष्यांचा बाप्तिस्मा झाला! या नव्याने समर्पण केलेल्यांपैकी काही जण, प्रचारकांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांवर यहोवाच्या आशीर्वादामुळे सापडले होते. या प्रचारकांनी त्यांच्या नेमलेल्या क्षेत्रात सर्वांना सुवार्ता सांगण्याचा अथक प्रयत्न केला होता. यामुळे मंडळीत खूप आनंद झाला शिवाय, या जीवन वाचवण्याच्या कार्यात देवाचे सहकारी म्हणून सेवा करण्याचा आपल्याला किती मोठा सुहक्क देखील मिळाला आहे.—१ करिंथ. ३:५, ६, ९.
४ देवाच्या नावाची स्तुती: यहोवाची जाहीररीत्या स्तुती करण्यासाठी आणि सर्व मानवजातीसमोर त्याचे नाव पवित्र करण्यासाठी आपण नेटाने प्रचार कार्यात भाग घेतो. (इब्री १३:१५) सैतान, ‘सर्व जगाला ठकवून’ लोकांना असा विचार करायला लावतो, की मानवजातीच्या समस्या सोडवण्यास देव असमर्थ आहे, तो पाषाणहृदयी आहे म्हणूनच मानवाचे दुःख पाहून त्याला काही वाटत नाही किंवा देव अस्तित्वातच नाही. (प्रकटी. १२:९) पण आपल्या प्रचार कार्याद्वारे आपण आपल्या सर्वथोर स्वर्गीय पित्याविषयीच्या सत्याचे समर्थन करू शकतो. तेव्हा, आपण आता आणि सदासर्वकाळ त्याच्या नावाची स्तुती करीत राहू या.—स्तो. १४५:१, २.