पायनियर मनोवृत्ती दाखवा
१. पायनियर मनोवृत्तीचे तुम्ही कसे वर्णन कराल?
१ पायनियर म्हणून सेवा करणे शक्य असो वा नसो, पण सर्व राज्य प्रचारक, पायनियरांची मनोवृत्ती अवश्य बाळगू शकतात. त्यांना प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या आज्ञेविषयी कळकळ वाटते. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १८:५) त्यांना लोकांबद्दल आस्था आहे आणि आपली सेवा पूर्ण करण्याकरता ते बरेच त्याग करतात. (मत्त. ९:३६; प्रे. कृत्ये २०:२४) इतरांना सत्य शिकण्यास मदत करण्याकरता जे काही आवश्यक आहे ते करण्यास यहोवाचे सेवक तयार असतात. (१ करिंथ. ९:१९-२३) अशाप्रकारची मनोवृत्ती ज्याने दाखवली त्याचे उदाहरण आता आपण पाहू या. तो होता सुवार्तिक फिलिप्प.
२. वडील व सेवा सेवक सेवाकार्यात आवेश दाखवण्याच्या बाबतीत फिलिप्पाचे अनुकरण कसे करू शकतात?
२ प्रचार करणे व शिकवणे: फिलिप्प पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळत होता. (प्रे. कृत्ये ६:१-६) तरीपण तो सुवार्तेचा आवेशी प्रचारक होता. (प्रे. कृत्ये ८:४०) तेव्हा आज देखील, वडील व सेवा सेवक आपापल्या नेमलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, सेवाकार्यातही आवेशीपणे पुढाकार घेण्याद्वारे पायनियर मनोवृत्ती असल्याचे दाखवू शकतात. यामुळे मंडळीत केवढा उत्साह संचारतो!—रोम. १२:११.
३. परीक्षांना तोंड देत असताना आपण पायनियर मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?
३ स्तेफनाच्या मृत्यूनंतर तीव्र छळाची लाट उसळली आणि यामुळे शिष्यांचे जीवन अगदी अस्ताव्यस्त झाले. पण फिलिप्पाने प्रचार करण्याचे सोडले नाही आणि शोमरोनी लोकांमध्ये प्रचार कार्य सुरू करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. (प्रे. कृत्ये ८:१, ४-६, १२, १४-१७) आपणही आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा सुवार्तेची घोषणा करत राहण्याद्वारे आणि आपल्याला जे कोणी भेटतात त्यांना निष्पक्षतेने प्रचार करण्याद्वारे फिलिप्पाचे अनुकरण करू शकतो.—योहा. ४:९.
४. शिक्षक या नात्याने फिलिप्पाने आपल्याकरता कोणता आदर्श ठेवला?
४ देवाच्या वचनाचा शिक्षक या नात्याने फिलिप्पाचे कौशल्य कूशी षंढाशी झालेल्या त्याच्या संभाषणावरून दिसून येते. (प्रे. कृत्ये ८:२६-३८) बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्यास व “शास्त्रावरून वादविवाद” करण्यास शिकणे हा पायनियर मनोवृत्ती प्रदर्शित करण्याचा आणखी एक मार्ग आहे. (प्रे. कृत्ये १७:२, ३) फिलिप्पाप्रमाणे आपण देखील जेथे कोठे लोक सापडतील तेथे आणि जेव्हाजेव्हा संधी मिळेल तेव्हातेव्हा सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो.
५. आपल्या मुलांमध्ये पायनियर मनोवृत्ती उत्पन्न करणे ख्रिस्ती पालकांना कसे शक्य होईल?
५ कुटुंब व मंडळी: फिलिप्पाच्या मनोवृत्तीमुळे व त्याच्या आदर्शामुळे त्याच्या मुलींवरही उत्तम प्रभाव पडला यात शंका नाही. (प्रे. कृत्ये २१:९) त्याचप्रकारे, ख्रिस्ती आईवडील आपल्या जीवनात राज्याच्या कार्यांना प्राधान्य देतात तेव्हा त्यांच्या मुलांना देखील असेच करण्याचे प्रोत्साहन मिळते. सबंध आठवडाभर थकल्यानंतरही आई किंवा बाबा किती उत्सुकतेने इतरांना प्रचार करतात हे मुले पाहतात तेव्हा त्यांच्या मनावर याची अमिट छाप पडते.—नीति. २२:६.
६. आपल्या मंडळीतल्या पायनियरांबद्दल आपण आपली कदर कशी व्यक्त करू शकतो?
६ फिलिप्पने यहोवाच्या सेवेकरता स्वतःला वाहून घेतलेल्या पौल व लूक यांचे आदरातिथ्य केले. (प्रे. कृत्ये २१:८, १०) आज आपण आवेशी सुवार्तिकांबद्दल आपली कदर व पाठिंबा कसा व्यक्त करू शकतो? ज्या दिवशी फार कमी बांधव सेवाकार्याला जातात त्या दिवशी सकाळी अथवा दुपारी आपण पायनियरांसोबत कार्य करण्याचे सुचवू शकतो. (फिलिप्पै. २:४) तसेच आपण उभारणीकारक सहवासाकरता त्यांना आपल्या घरी देखील निमंत्रित करू शकतो. आपली वैयक्तिक परिस्थिती कशीही असो, आपण सर्वजण पायनियर मनोवृत्ती दाखवण्याचा सदोदित प्रयत्न करू या.