येशूच्या चित्तवृत्तीचे अनुकरण करा
१. येशूने कोणत्या प्रकारची चित्तवृत्ती प्रगट केली?
१ आपण देवाचा पुत्र येशू याला प्रत्यक्षात पाहिलेले नसले तरी, त्याचे जीवन आणि त्याची सेवा यांविषयीच्या लिखित अहवालावरून आपण त्याच्यावर खरोखरच प्रेम करू लागलो आहोत. (१ पेत्र १:८) आपल्या पित्याच्या इच्छेच्या अधीनतेत त्याने स्वर्गातील आपला सर्वोच्च हुद्दा सोडला आणि तो पृथ्वीवर आला. मानव यानात्याने त्याने इतरांची निःस्वार्थ सेवा केली आणि मग मानवजातीसाठी आपला प्राण अर्पण केला. (मत्त. २०:२८) देवाचे वचन आपल्याला आर्जवते: “जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो.” आपण येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचे अनुकरण कसे करू शकतो?—फिलिप्पै. २:५-८.
२. आज अनेक ख्रिश्चनांना कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागते, पण कोणत्या गोष्टीमुळे त्यांना या समस्येवर मात करायला मदत मिळू शकते?
२ थकलेला असताना: येशू परिपूर्ण होता तरीदेखील तो थकत असे. एके प्रसंगी, तो ‘चालून चालून दमला’ होता तरी त्याने एका शोमरोनी स्त्रीला पक्की साक्ष दिली. (योहा. ४:६) अनेक ख्रिश्चनांना आज अशाचप्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागते. संपूर्ण आठवडाभर काम करून थकल्यावर, प्रचार कार्यात भाग घेण्यासाठी शक्ती मिळणे कठीण असू शकते. परंतु प्रचार कार्यात आपण नियमित सहभाग घेतल्यास ख्रिस्ती सेवा आपल्याला आध्यात्मिकरीत्या तजेला देत असल्याचे जाणवेल.—योहा. ४:३२-३४.
३. येशूने लोकांना शिकवण्याची जी स्वेच्छा दाखवली तिचे अनुकरण आपण कसे करू शकतो?
३ आणखी एका प्रसंगी, येशू व त्याचे शिष्य जरा वेळ आराम करण्यासाठी एकान्त ठिकाणी चालले होते. परंतु एका मोठ्या लोकसमुदायाने त्यांना जाताना पाहिले आणि ते त्यांना भेटायला पुढे पळत आले. त्यांच्यावर खेकसण्याऐवजी येशूला “त्यांचा कळवळा आला” आणि तो “त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३०-३४) बायबल अभ्यास सुरू करून संचालित करण्यासाठी अशाचप्रकारच्या मनोवृत्तीची गरज आहे. यासाठी चिकाटीची आणि लोकांबद्दल प्रेमाची आवश्यकता आहे. सध्या तुम्ही एकही बायबल अभ्यास संचालित करत नसाल तर, निदान एक बायबल अभ्यास शोधण्याचा हार न मानता प्रयत्न करा.
४. सहायक पायनियरींग आपल्याला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीचे अनुकरण करण्यास कशाप्रकारे मदत करू शकेल?
४ आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान द्या: सहायक पायनियरींग आपल्याला आध्यात्मिक कार्यांवर आपले लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करू शकेल. एका तरुण भगिनीने लिहिले: “माझ्या मैत्रिणीच्या आईने आम्हा दोघींना तिच्याबरोबर एक महिन्यासाठी सहायक पायनियरींग करण्याचं उत्तेजन दिलं. आम्ही तिच्याबरोबर पायनियरींग सुरू केली हे खरंच खूप बरं झालं. यामुळे मी बंधूभगिनींना चांगल्याप्रकारे ओळखू लागले; लवकरच मला ते माझ्याच कुटुंबासारखे वाटू लागले. शिवाय मला यहोवाविषयी इतरांना सांगण्याची आणि राज्याच्या अद्भुत सत्यांविषयी त्यांना शिकवण्याची अधिक संधी मिळू लागल्याबद्दलही आनंद वाटू लागला. यामुळे मला यहोवाच्या आणि त्याच्या संघटनेच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटू लागलं.”—स्तो. ३४:८.
५. येशूच्या चित्तवृत्तीचे अनुकरण करण्याचा आपण सतत प्रयत्न का केला पाहिजे?
५ आपले अपरिपूर्ण शरीर आणि यहोवाला खूष करण्याची आपली इच्छा यांच्यात सतत संघर्ष चाललेला असतो. (रोम. ७:२१-२३) जोराचा यत्न न करण्याची जगीक वृत्ती आपण टाळली पाहिजे. (मत्त. १६:२२, २३) याबाबतीत यहोवा आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मदत देऊन यशस्वी होण्यास मदत करू शकतो. (गलती. ५:१६, १७) देवाच्या धार्मिक नव्या जगात आपण बचावून जाण्याची वाट पाहत असताना, राज्य हितांना आणि इतरांच्या हितांना प्रथम स्थान देऊन आपण येशूच्या चित्तवृत्तीचे अनुकरण करू या.—मत्त. ६:३३; रोम. १५:१-३.