यहोवाला आपले सर्वोत्तम अर्पण करणे
१ इस्राएल राष्ट्राला यहोवाने दिलेल्या नियमशास्त्रात स्पष्टपणे असे सांगण्यात आले होते, की यहोवाला अर्पण करण्यात येणारे पशू “दोषहीन” असावेत. सदोष असलेला प्राणी स्वीकारला जात नसे. (लेवी. २२:१८-२०; मला. १:६-९) शिवाय, अर्पण करतेवेळी, सर्व चरबी—जी सर्वात उत्तम आहे ती—यहोवाची होती. (लेवी. ३:१४-१६) इस्राएलचा पिता आणि महान धनी यहोवा, सर्वोत्तम मिळण्यास पात्र होता.
२ प्राचीन काळाप्रमाणे आजही आपल्या अर्पणांच्या बाबतीत देव अशीच अपेक्षा करतो. आपल्या सेवेतून, यहोवाबद्दल उचित आदर प्रतिबिंबित झाला पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, हे कबूल आहे. तरीपण, आपण आपले सर्वोत्तम त्याला देत आहोत की नाही याची खात्री करण्याकरता आत्मपरीक्षणासाठी आपल्याकडे उचित कारण आहे.—इफिस. ५:१०
३ संपूर्ण मनाने केलेली सेवा: आपल्या सेवेद्वारे, यहोवाचा आदर व्हायचा असेल व आपण सांगत असलेला संदेश लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचायचा असेल तर ती सेवा वरवरची असू नये. देव आणि त्याच्या महान उद्देशांबद्दलचे आपले मनोगत, कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणातून आले पाहिजे. (स्तो. १४५:७) यासाठी, व्यक्तिगत बायबल वाचन आणि अभ्यासाचा उत्तम कार्यक्रम असणे किती महत्त्वाचे आहे हे समजून येते.—नीति. १५:२८.
४ यहोवाला आपले सर्वोत्तम देण्यात, लोकांबद्दल त्याच्यासारखी प्रीती असणे समाविष्ट आहे. (इफिस. ५:१, २) लोकांबद्दलचे प्रेम आपल्याला, होता होईल तितक्या लोकांना सत्याचा जीवन-रक्षक संदेश पोहंचवण्यास प्रेरित करेल. (मार्क ६:३४) या प्रेमामुळे आपण ज्यांच्याबरोबर बोलतो त्यांच्यामध्ये व्यक्तिगत आवड दाखवण्यास प्रेरित होऊ. पहिल्या भेटीनंतर आपण त्यांच्याविषयी विचार करत राहतो आणि त्यांना पुन्हा भेटण्यास प्रवृत्त होतो. या प्रेमामुळे आपल्याला, त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करण्याची प्रेरणा मिळते.—प्रे. कृत्ये २०:२४; २६:२८, २९.
५ “स्तुतीचा यज्ञ”: यहोवाला आपले उत्तम देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चिकाटीने सेवा करणे. आपण सुसंघटित असतो आणि सेवेवर आपले लक्ष केंद्रित असते तेव्हा, आपल्याजवळ असलेल्या वेळेत आपण होता होईल तितके साध्य करू शकतो. (१ तीम. ४:१०) चांगली तयारी केल्यास आपण स्पष्ट व खात्रीने बोलू आणि यामुळे अनुकूल प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढेल. (नीति. १६:२१) इतरांना आपण आपल्या अंतःकरणापासून सुवार्ता सांगतो तेव्हा याला उचितपणे “स्तुतीचा यज्ञ” म्हणता येईल.”—इब्री १३:१५.