‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका
“नियमशास्त्रात [तुम्हाला] ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे.”—रोम. २:१९.
पुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा:
मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या बलिदानांनी कोणत्या गोष्टीकडे निर्देशित केले?
इस्राएल लोक देत असलेली काही बलिदाने व आज आपण देत असलेली बलिदाने यांत कोणते साम्य आहे?
यहोवा कोणती बलिदाने स्वीकारतो व कोणती स्वीकारत नाही?
१. मोशेच्या नियमशास्त्राचे महत्त्व जाणून घेण्यास आपण उत्सुक का असले पाहिजे?
प्रेषित पौलाची देवप्रेरित लिखाणे नसती, तर मोशेच्या नियमशास्त्रातील अनेक पैलूंचे महत्त्व समजणे आपल्याला कठीण झाले असते. उदाहरणार्थ, त्याने इब्री लोकांना जे पत्र लिहिले होते त्यात त्याने हे स्पष्ट करून सांगितले, की कशा प्रकारे येशूने “विश्वसनीय प्रमुख याजक” या नात्याने एकदाच ‘प्रायश्चित्ताचे’ बलिदान दिले; आणि त्यावर विश्वास प्रदर्शित करणाऱ्यांना “सार्वकालिक मुक्ति” प्राप्त करणे कसे शक्य झाले हेदेखील त्याने स्पष्ट केले. (इब्री २:१७; ९:११, १२) तसेच, पौलाने या गोष्टीचाही खुलासा केला, की निवासमंडप केवळ ‘स्वर्गीय वस्तूंची छाया’ होती आणि मोशे ज्या कराराचा मध्यस्थ होता त्यापेक्षा “अधिक चांगल्या कराराचा” मध्यस्थ येशू बनला. (इब्री ७:२२; ८:१-५) नियमशास्त्राची अशी स्पष्टीकरणे पौलाच्या दिवसांतील ख्रिश्चनांसाठी अतिशय मोलाची होती आणि आज आपल्यासाठीही ती तितकीच मोलाची आहेत. ही स्पष्टीकरणे, देवाने आपल्यासाठी केलेल्या तरतुदींचे महत्त्व पूर्णपणे जाणून घेण्यास आपल्याला साहाय्य करतात.
२. यहुदीतर ख्रिश्चनांच्या तुलनेत यहुदी ख्रिश्चनांना कोणता फायदा होता?
२ पौलाने रोममधील ख्रिश्चनांना लिहिले तेव्हा त्याने काही गोष्टी मंडळीतील त्या सदस्यांना उद्देशून लिहिल्या जे यहुदी वंशाचे होते आणि ज्यांना मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षण मिळाले होते. त्याने हे मान्य केले, की हे यहुदी ख्रिश्चन देवाच्या नियमशास्त्राशी परिचित असल्यामुळे त्यांना एक विशेष फायदा होता. तो म्हणजे, त्यांच्याजवळ यहोवाविषयीच्या व त्याच्या नीतिमान तत्त्वांविषयीच्या “ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप” होते. सत्याचे ते ‘स्वरूप’ जाणून घेतल्याने आणि त्याचा मनस्वी आदर केल्याने पूर्वीच्या विश्वासू यहुद्यांप्रमाणे या यहुदी ख्रिश्चनांना, नियमशास्त्राचे ज्ञान नसलेल्या लोकांचे मार्गदर्शन करणे, त्यांना शिकवणे आणि त्यांना नियमशास्त्राची अचूक समज देणे शक्य झाले.—रोमकर २:१७-२० वाचा.
येशूच्या बलिदानाच्या छाया
३. प्राचीन इस्राएलमध्ये दिल्या जाणाऱ्या बलिदानांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कसा लाभ होऊ शकतो?
३ पौलाने सत्याच्या ज्या स्वरूपाचा उल्लेख केला ते स्वरूप यहोवाचे उद्देश समजून घेण्याकरता आजही महत्त्वाचे आहे. नियमशास्त्र देण्यामागे जी तत्त्वे होती त्यांचे महत्त्व किंवा मोल कोणत्याही अर्थी कमी झालेले नाही. हे लक्षात ठेवून, आपण नियमशास्त्रातील केवळ एका पैलूचा विचार करू या. तो म्हणजे, निरनिराळ्या बलिदानांनी व अर्पणांनी कशा प्रकारे नम्र यहुद्यांना ख्रिस्ताकडे निरवले व त्यांच्याबद्दल असलेल्या देवाच्या अपेक्षा समजण्यास त्यांना कसे साहाय्य केले. आपल्या सेवकांसंबंधी असलेल्या यहोवाच्या मूलभूत अपेक्षा कधीही बदलत नसल्यामुळे बलिदाने व अर्पणे देण्यासंबंधी देवाने इस्राएल लोकांना जे नियम दिले होते ते नियम आपल्याला आपल्या पवित्र सेवेची गुणवत्ता पारखण्यास कसे साहाय्य करू शकतात हेदेखील आपण पाहू.—मला. ३:६.
४, ५. (क) नियमशास्त्राने देवाच्या लोकांना कशाची आठवण करून दिली? (ख) बलिदाने अर्पण करण्यासंबंधी देवाच्या नियमाने यहुद्यांचे लक्ष कोणत्या गोष्टीकडे निर्देशित केले?
४ नियमशास्त्राच्या अनेक पैलूंनी प्राचीन यहुद्यांना त्यांच्या पापपूर्ण प्रवृत्तीची वेळोवेळी जाणीव करून दिली असेल यात शंका नाही. उदाहरणार्थ, मानवी शवाला शिवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपले शुद्धीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी, तांबड्या रंगाच्या एका निर्दोष गाईचा वध केला जायचा व तिला जाळले जायचे. त्या गाईची राख, “अशौचक्षालनाचे पाणी” किंवा शुद्धीकरणाचे पाणी तयार करण्यासाठी जमा करून ठेवली जायची. शुद्धीकरणाचे हे पाणी, अशुद्ध झालेल्या व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी वापरले जायचे. एक व्यक्ती अशुद्ध झाल्यानंतर तिसऱ्या व सातव्या दिवशी हे पाणी तिच्यावर शिंपडले जायचे. (गण. १९:१-१३) तसेच, मानवी प्रजोत्पादनाद्वारे पुढच्या पिढीला अपरिपूर्णता व पाप वारशाने मिळते याची यहुदी लोकांना आठवण करून देण्यासाठी स्त्रियांना प्रसूतीनंतर अशुद्धतेचा काळ पाळावा लागायचा आणि त्यानंतर, प्रायश्चित्त करण्यासाठी बलिदान द्यावे लागायचे.—लेवी. १२:१-८.
५ यहुदी लोकांना दैनंदिन जीवनात इतर अनेक प्रसंगी आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी पशूंची बलिदाने द्यावी लागायची. एका यहुदी उपासकाला याची जाणीव असो अथवा नसो, ही बलिदाने व पुढे यहोवाच्या मंदिरात अर्पण केलेली बलिदाने येशूच्या परिपूर्ण बलिदानाची “छाया” होती.—इब्री १०:१-१०.
बलिदान देण्यामागील भावना
६, ७. (क) बलिदाने अर्पण करण्यासंबंधी इस्राएल लोकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे जरुरीचे होते, आणि ती बलिदाने कशाची छाया होती? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
६ पशूंचे बलिदान देण्यासंबंधी एक मूलभूत अपेक्षा ही होती की अर्पण केला जाणारा पशू “दोषहीन” असावा; तो अंधळा, जखमी, कुरूप किंवा आजारी नसावा. (लेवी. २२:२०-२२) इस्राएल लोक यहोवाला फळांचे किंवा धान्यांचे अर्पण करायचे तेव्हा ते “प्रथम उपज” असणे व पिकाच्या ‘उत्तम भागातील’ असणे गरजेचे होते. (गण. १८:१२, २९) यहोवाला दुय्यम दर्जाचे अर्पण स्वीकृत नव्हते. पशू बलिदानांसंबंधी असलेल्या महत्त्वपूर्ण अपेक्षेने हे चित्रित केले, की येशूचे बलिदान निर्दोष व निष्कलंक असणार होते; तसेच, मानवजातीची सुटका करण्यासाठी यहोवा जे बलिदान देणार होता ते सगळ्यात उत्तम व त्याला परमप्रिय होते.—१ पेत्र १:१८, १९.
७ बलिदान देणाऱ्या व्यक्तीला यहोवाच्या चांगुलपणाबद्दल खरोखर कदर वाटत असल्यास, तिच्याजवळ जे सगळ्यात उत्तम होते त्याचे बलिदान देण्यात तिला नक्कीच आनंद झाला असता. अर्थात, सगळ्यात उत्तम द्यायचे की नाही हे ती व्यक्तीच ठरवू शकत होती. पण, आपण जर देवाला एखादे सदोष बलिदान दिले, तर तो नक्कीच संतुष्ट होणार नाही याची त्या व्यक्तीला जाणीव होती; कारण त्यावरून हे सूचित झाले असते, की बलिदान देणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने केवळ एक विधी अथवा ओझे आहे. (मलाखी १:६-८, १३ वाचा.) या गोष्टीने आपल्याला आपल्या पवित्र सेवेचा विचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘मी कोणत्या भावनेने यहोवाची सेवा करत आहे? मी ज्या प्रकारे त्याची सेवा करत आहे त्यात मला सुधारणा करण्याची गरज आहे का आणि त्याची सेवा करण्यामागील माझे हेतू काय आहेत?’
८, ९. इस्राएल लोक ज्या भावनेने देवाला बलिदाने द्यायचे त्याचा आपण विचार का केला पाहिजे?
८ एक इस्राएली व्यक्ती, यहोवाबद्दल तिला वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वेच्छेने बलिदान देऊ शकत होती. किंवा यहोवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी ती स्वेच्छेने होमार्पण करू शकत होती. अशा वेळी, बलिदान करण्यासाठी सगळ्यात उत्तम पशूची निवड करणे बहुधा तिला सोपे होते. आणि यहोवाला सगळ्यात उत्तम प्रतीचे बलिदान अर्पण करण्यात तिला आनंद व्हायचा. आज आपण नियमशास्त्रात सांगितलेली बलिदाने अर्पण करत नसलो, तरी यहोवाची सेवा करण्यासाठी आपण आपला वेळ, शक्ती व साधने खर्च करतो; त्यामुळे एका अर्थी आपण देवाला बलिदान अर्पण करतो. प्रेषित पौलाने, ख्रिस्ती आशेची जाहीर घोषणा करण्याचा, ‘चांगले करण्याचा’ व ‘दान करण्याचा’ उल्लेख करून म्हटले, की हे ‘यज्ञ’ किंवा बलिदाने आहेत व या बलिदानांनी देव संतुष्ट होतो. (इब्री १३:१५, १६) यहोवाचे लोक ज्या भावनेने अशा कार्यांत सहभाग घेतात त्यावरून देवाने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याची ते किती कदर करतात व त्याविषयी त्यांना किती कृतज्ञता वाटते हे दिसून येते. होय, प्राचीन काळी देवाला स्वेच्छेने बलिदाने अर्पण करणाऱ्यांच्या व आज ख्रिस्ती सेवेत सहभाग घेणाऱ्यांच्या मनोवृत्तीत व हेतूंत नक्कीच साम्यता आहे.
९ एखाद्या इस्राएली व्यक्तीने केलेल्या एखाद्या चुकीबद्दल तिला नियमशास्त्रानुसार पापार्पण करणे किंवा दोषार्पण करणे आवश्यक होते. नियमशास्त्रानुसार ही अर्पणे देणे आवश्यक असल्यामुळे एका इस्राएली व्यक्तीला स्वखुशीने ही अर्पणे देणे कठीण होते असे तुम्हाला वाटते का? तिने ही बलिदाने अनिच्छेने दिली असावीत का? (लेवी. ४:२७, २८) नाही, चूक करणाऱ्या व्यक्तीला यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध राखण्याची मनस्वी इच्छा असली असेल, तर तिने मुळीच या भावनेने बलिदाने दिली नसावीत.
१०. बिघडलेले नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी ख्रिश्चनांना कोणते ‘यज्ञ’ अर्पण करावे लागू शकतात?
१० त्याचप्रमाणे आज, कदाचित तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही अविचारीपणे किंवा निष्काळजीपणे नकळत एखाद्या बंधू किंवा भगिनीचे मन दुखावले आहे. किंवा मग, तुमचा विवेक तुम्हाला सांगत असेल, की तुमच्या हातून एखादे पाप झाले आहे. यहोवाची सेवा गांभीर्याने करू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आपली चूक सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार नाही का? नक्कीच उचलेल. याचा अर्थ, तुम्ही ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे तिची मनापासून माफी मागणे, किंवा तुमच्या हातून एखादा गंभीर अपराध झाला असेल, तर मंडळीतील प्रेमळ ख्रिस्ती वडिलांची आध्यात्मिक मदत घेणे असा होतो. (मत्त. ५:२३, २४; याको. ५:१४, १५) होय, एखाद्या बंधू किंवा भगिनीविरुद्ध अथवा देवाविरुद्ध केलेले पाप सुधारण्यासाठी आपण कृती केली पाहिजे. अशा प्रकारचे ‘यज्ञ’ अर्पण करण्याद्वारे आपण यहोवासोबत व आपल्या बंधुभगिनींसोबत शांतीचा नातेसंबंध प्रस्थापित करतो व शुद्ध विवेक बाळगतो. आणि यामुळे, यहोवाचा मार्ग सगळ्यात उत्तम मार्ग आहे याची आपल्याला खातरी पटते.
११, १२. (क) शांत्यर्पणे काय होती? (ख) शांत्यर्पणांपासून आपण काय शिकू शकतो?
११ नियमशास्त्रात सांगितलेल्या काही बलिदानांना शांत्यर्पणे म्हटले जायचे. या बलिदानांद्वारे, एका व्यक्तीचा यहोवासोबत शांतीचा नातेसंबंध असल्याचे दिसून यायचे. अशा प्रकारचे बलिदान अर्पण करणारी व्यक्ती व तिचे कुटुंब बलिदान केलेल्या पशूचे मांस कदाचित मंदिरातील एखाद्या जेवणाच्या खोलीत खायचे. मांसाचा काही भाग त्या व्यक्तीच्या वतीने बलिदान करणाऱ्या याजकाला व मंदिरात सेवा करणाऱ्या इतर याजकांना मिळायचा. (लेवी. ३:१; ७:३१-३३) शांत्यर्पण करणारा उपासक, देवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्याच्या एकमेव इच्छेने देवाला हे बलिदान द्यायचा. जणू तो उपासक, त्याचे कुटुंब, याजकगण व खुद्द यहोवा हे सर्व एकत्र शांतीपूर्ण वातावरणात जेवणाचा आस्वाद घ्यायचे.
१२ लाक्षणिक अर्थाने, यहोवाला अशा जेवणाचे आमंत्रण देणे व त्याने ते स्वीकारणे यापेक्षा मोठा विशेषाधिकार आणखी कोणता असू शकतो? साहजिकच, अशा सन्माननीय पाहुण्याला यजमान सगळ्यात उत्तम मेजवानी द्यायचा. शांत्यर्पणांची ही तरतूद, नियमशास्त्रातील सत्याच्या स्वरूपाचा एक भाग असून या बलिदानांनी एका विशिष्ट गोष्टीकडे निर्देशित केले. ती म्हणजे, आपल्या निर्माणकर्त्यासोबत एक घनिष्ठ, शांतीपूर्ण नातेसंबंध जोडण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व मानवांना येशूच्या महान बलिदानाद्वारे असा नातेसंबंध जोडणे शक्य आहे. आज, आपण यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या साधनांचा व शक्तीचा उपयोग करून स्वेच्छेने बलिदाने देतो तेव्हा आपण यहोवाच्या मैत्रीचा व सहवासाचा आनंद घेऊ शकतो.
बलिदानांसंबंधी बाळगण्याची सावधगिरी
१३, १४. शौल राजा यहोवाला जे बलिदान देऊ इच्छित होता ते यहोवाला स्वीकृत का नव्हते?
१३ साहजिकच, नियमशास्त्रात सांगितलेली बलिदाने यहोवाने स्वीकारावीत म्हणून ती उचित भावनेने व योग्य मनोवृत्तीने अर्पण करणे आवश्यक होते. पण, बायबलमध्ये अशा काही बलिदानांविषयी सांगितले आहे जी देवाने स्वीकारली नाही. देवाने ती बलिदाने का नाकारली? या संदर्भात, आपण दोन प्रसंगांचा विचार करू या.
१४ अमालेकी लोकांवर न्यायदंड बजावण्याची यहोवाची वेळ आली आहे असे शमुवेल संदेष्ट्याने शौल राजाला सांगितले. शौलाने या शत्रू राष्ट्राचा व त्याच्या सर्व गुराढोरांचा समूळ नाश करायचा होता. पण, त्या राष्ट्रावर विजय मिळवल्यानंतर शौलाने आपल्या सैनिकांना सांगून अमालेक्यांचा राजा अगाग यास जिवंत ठेवले. तसेच, त्यांच्यातील सगळ्यात उत्तम गुरेढोरेदेखील त्याने यहोवाला बलिदान देण्यासाठी राखून ठेवली. (१ शमु. १५:२, ३, २१) यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती? शौलाने यहोवाची अवज्ञा केल्यामुळे यहोवाने त्याला नाकारले. (१ शमुवेल १५:२२, २३ वाचा.) यावरून आपण काय शिकतो? हेच, की आपली बलिदाने देवाला स्वीकृत असण्यासाठी बलिदाने अर्पण करण्यासोबतच देवाच्या आज्ञांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.
१५. यशयाच्या दिवसांत, देवाला बलिदाने अर्पण करणाऱ्या काही इस्राएल लोकांच्या वाईट वर्तनावरून काय दिसून आले?
१५ असेच एक उदाहरण यशयाच्या पुस्तकातही आढळते. यशयाच्या काळात, इस्राएल लोक यांत्रिकपणे यहोवाला बलिदाने अर्पण करत होते. आणि त्याच वेळी ते अनेक वाईट गोष्टीही करत होते. यामुळे त्यांची बलिदाने व्यर्थ ठरली. यहोवाने त्यांना विचारले: “तुमचे बहुत यज्ञबलि माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची वपा यांनी माझी अति तृप्ति झाली आहे; बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.” त्याने पुढे त्यांना म्हटले: “निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धुपाचा मला वीट आहे.” नेमकी समस्या काय होती? देवाने त्यांना सांगितले: “तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणास धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या.”—यश. १:११-१६.
१६. देव कोणती बलिदाने स्वीकारतो?
१६ जे जाणूनबुजून दुष्ट कामे करत होते त्यांची बलिदाने यहोवाने स्वीकारली नाही. पण, जे देवाच्या आज्ञांच्या एकवाक्यतेत जीवन जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रार्थना व अर्पणे देवाला स्वीकृत होती. या लोकांना नियमशास्त्राच्या स्वरूपाने हे शिकवले, की ते पापपूर्ण आहेत व त्यांना क्षमेची गरज आहे. (गलती. ३:१९) आपण पापी आहोत व आपल्याला क्षमेची गरज आहे या जाणिवेमुळे एक इस्राएली व्यक्ती आपल्या पापांबद्दल मनापासून पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त व्हायची. त्याचप्रमाणे आज, आपणसुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे, की केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारेच यहोवा आपल्या पापांची क्षमा करू शकतो. आपण ख्रिस्ताच्या बलिदानाचे महत्त्व जाणून घेतले व त्याबद्दल कृतज्ञता बाळगली, तर यहोवाच्या सेवेत आपण जे काही अर्पण करू ते यहोवाला ‘आवडेल.’—स्तोत्र ५१:१७, १९ वाचा.
येशूच्या बलिदानावर विश्वास प्रदर्शित करा!
१७-१९. (क) आपण येशूच्या खंडणी बलिदानाबद्दल यहोवाला उचितपणे कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (ख) पुढच्या लेखात कशाची चर्चा केली जाईल?
१७ ख्रिस्तपूर्व काळातील लोकांप्रमाणे आज आपल्याला देवाच्या उद्देशांची केवळ “छाया” पाहण्यात समाधान मानण्याची गरज नाही. (इब्री १०:१) बलिदानांसंबंधी असलेल्या नियमांमुळे इस्राएल लोकांना देवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यास आवश्यक असलेली उचित मनोवृत्ती—देवाबद्दल मनस्वी कृतज्ञता, देवाला सर्वोत्तम अर्पण करण्याची इच्छा व सुटकेच्या गरजेची जाणीव—यासारखी मनोवृत्ती विकसित करण्याचे उत्तेजन मिळाले. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत दिलेल्या स्पष्टीकरणांमुळेच, आज आपण हे समजू शकतो, की यहोवा खंडणीद्वारे पापाचे परिणाम कायमचे मिटवून टाकेल. तसेच, आजदेखील तो आपल्याला एक शुद्ध विवेक बाळगण्यास मदत करतो. होय, येशूचे खंडणी बलिदान खरोखरच एक अद्भुत तरतूद आहे!—गलती. ३:१३; इब्री ९:९, १४.
१८ अर्थात, खंडणी बलिदानाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी त्याबद्दल केवळ वरवर माहिती असणे पुरेसे नाही. प्रेषित पौलाने म्हटले: “आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक होते.” (गलती. ३:२४) अशा विश्वासाला कार्यांची जोड असणे आवश्यक आहे. (याको. २:२६) म्हणूनच, मोशेच्या नियमशास्त्रातील ज्ञानाचे स्वरूप बाळगणाऱ्या पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना पौलाने प्रोत्साहन दिले, की त्यांनी त्या ज्ञानानुसार कार्य केले पाहिजे. असे केल्याने, त्यांचे वर्तन ते शिकवत असलेल्या देवाच्या तत्त्वांच्या एकवाक्यतेत असणार होते.—रोमकर २:२१-२३ वाचा.
१९ आज ख्रिश्चनांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज नसली, तरी आजसुद्धा त्यांना यहोवाला स्वीकृत असलेली बलिदाने अर्पण करावी लागतात. आपण देवाला स्वीकृत अशी बलिदाने कशी अर्पण करू शकतो हे आपण पुढील लेखात पाहू या.
[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]
आपल्या सेवकांसंबंधी असलेल्या यहोवाच्या मूलभूत अपेक्षा कधीही बदलत नाहीत
[१८ पानांवरील चित्र]
तुम्ही यहोवाला कोणता पशू अर्पण केला असता?
[१९ पानांवरील चित्र]
जे यहोवाला स्वीकृत बलिदाने अर्पण करतात त्यांना त्याची कृपापसंती प्राप्त होते