“अहो, यहोवाचे एकनिष्ठ जनहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा”
एप्रिल ४ रोजी येशूच्या मृत्यूचा स्मारक साजरा केला जाणार आहे
१ अनेक वर्षांपूर्वी, युक्रेनवर कम्युनिस्ट शासन होते तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांची साक्षीदारांवर करडी नजर होती; खासकरून प्रभूच्या सांजभोजनाचा विधी साजरा करण्याचा दिवस जसजसा जवळ येत तसतसे ते त्यांच्यावर करडी नजर ठेवत; या आशेने की त्यांना बांधवांच्या सभेच्या ठिकाणाचा पत्ता लागेल. ही नेहमीचीच समस्या बनली होती, कारण अधिकाऱ्यांना विधी साधारण कोणत्या तारखेला येतो हे माहीत असायचे. मग बांधवांनी काय केले? एका भगिनीच्या घराच्या तळघरात पाणी साचले होते. पाणी साचलेल्या तळघरात लोक जमतील, हे अधिकाऱ्यांनी स्वप्नातही पाहिले नसावे; त्यामुळे बांधवांनी गुडघ्या एवढ्या साचलेल्या पाण्यावर लाकडी कट्टा बांधला. सर्वांना या लाकडी कट्ट्यावर, कमी उंचीच्या जागेत वाकून बसावे लागले खरे, पण निदान कोणीही त्यांच्या सभेत व्यत्यय आणले नाहीत. संपूर्ण मंडळीने स्मारकविधी आनंदाने साजरा केला.
२ येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्याची आज्ञा पाळण्याचा आपल्या युक्रेनच्या बांधवांचा दृढनिश्चय, देवाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या प्रीतीचे अद्भुत उदाहरण आहे. (लूक २२:१९; १ योहान ५:३) आपल्या जीवनात आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा अशा उदाहरणांतून आपण उत्तेजन प्राप्त करून एप्रिल ४ रोजी साजरा केल्या जाणाऱ्या प्रभूच्या सांज भोजनाला उपस्थित राहण्याचा निश्चय करूया. असे करण्याद्वारे आपणही स्तोत्रकर्त्याच्या भावना व्यक्त करू ज्याने असे गायिले: “अहो, यहोवाचे एकनिष्ठ जनहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा.”—स्तो. ३१:२३, NW.
३ देवाबद्दल प्रेम वाढवण्यास इतरांना मदत करा: देवाबद्दलचे प्रेम आपल्याला, इतरांनाही स्मारकविधी साजरा करण्याचे आमंत्रण देण्यास प्रवृत्त करते. आमची राज्य सेवा याच्या फेब्रुवारी अंकात, स्मारकविधीसाठी आपण ज्यांना ज्यांना आमंत्रण देऊ इच्छितो अशा सर्वांच्या नावांची यादी तयार करण्याचे प्रत्येकाला उत्तेजन देण्यात आले होते. तुमच्या यादीतील प्रत्येक व्यक्तीला आमंत्रण देण्याचा तुम्ही मनःपूर्वक प्रयत्न करीत आहात का? त्यांना या प्रसंगाचे महत्त्व समजावून सांगा. स्मारकविधीच्या दिवसाची आणि वेळेची तुम्ही त्यांना प्रेमळपणे आठवण करून दिल्यास किंवा, उचित असल्यास स्मारकविधीसाठी त्यांच्याबरोबर येण्याची तयारी दाखवल्यास त्यांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन मिळेल.
४ सभेच्या ठिकाणी, आपले आमंत्रण ज्यांनी स्वीकारले आहे त्यांचे स्वागत करायचा खास प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना आपण कोणत्या तरी अनोळखी ठिकाणी आलो आहोत असे वाटणार नाही. यहोवाबद्दल प्रेम वाढवायला तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता? ते प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायला तयार राहा. उचित असेल तर त्यांना बायबल अभ्यास सादर करा. आपल्या मंडळीच्या साप्ताहिक सभांना उपस्थित राहायला त्यांना उत्तेजन द्या. वडील जन खासकरून, स्मारकविधीसाठी उपस्थित असलेल्या अक्रियाशील ख्रिश्चनांकडे लक्ष देतील. अशा लोकांना भेट देण्याची व्यवस्था करून त्यांना पुन्हा कार्यरत होण्याचे ते उत्तेजन देऊ शकतात; कदाचित स्मारकविधीच्या भाषणात सादर केलेल्या मुद्द्यांवर ते अधिक चर्चा करू शकतात.—रोम. ५:६-८.
५ यहोवाबद्दल प्रेम वाढवणे: खंडणीच्या देणगीचा गंभीरपणे विचार केल्यास, यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्याबद्दल आपले प्रेम वाढू शकते. (२ करिंथ. ५:१४, १५) अनेक वर्षांपासून स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या एका भगिनीने म्हटले: “आम्ही स्मारकविधीची आतुरतेने वाट पाहतो. दर वर्षी हा विधी आम्हाला अधिक अर्थपूर्ण वाटू लागतो. मला अजूनही आठवतं, २० वर्षांपूर्वी कब्रस्थानात बाबांच्या मृतदेहाकडे मी पाहत उभी होते तेव्हा मला खंडणीची खरी किंमत समजली होती. पूर्वी मला फक्त त्याच्याबद्दलची पुस्तकी माहिती होती. म्हणजे, खंडणीबद्दलची सर्व शास्त्रवचने माहीत होती, ती समजावून सांगता येत होती. पण, जेव्हा मृत्यूच्या निर्दयी सत्याला सामोरे जावे लागले तेव्हा कुठं मला, त्या बहुमूल्य खंडणीद्वारे काय साध्य होईल याची खरी जाणीव झाली. आणि तेव्हा माझे अंतःकरण आनंदाने भरून आले.”—योहा. ५:२८, २९.
६ या वर्षाचे स्मारक जवळ येत असता आपले अंतःकरण त्या प्रसंगासाठी तयार करा. (२ इति. १९:३) शास्त्रवचनांचे परीक्षण करणे—२००४ आणि २००४ कॅलेंडर मध्ये दिलेल्या स्मारकविधी दरम्यानच्या खास बायबल वाचनावर मनन करा. काहींना, आपल्या कौटुंबिक अभ्यासात सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातल्या ११२-१६ अध्यायांची उजळणी करायला आनंद वाटतो. इतर काहीजण, विश्वासू व बुद्धीमान दास वर्गाने दिलेल्या अभ्यासासाठी साहाय्यक प्रकाशनांतून संशोधन करतात. (मत्त. २४:४५-४७) आपण सर्व खंडणीच्या देणगीचा आपल्या मनःपूर्वक प्रार्थनांमध्ये उल्लेख करू शकतो. (स्तो. ५०:१४, २३) होय, स्मारकविधीच्या काळात आपण, यहोवाने आपल्याला दाखवलेल्या प्रेमावर मनन करीत राहू या आणि यहोवाबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग शोधू या.—मार्क १२:३०; १ योहा. ४:१०.