आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग करतो त्यावर कडक नजर ठेवा
१. आज लोकांना सर्वत्र काय कठीण वाटत आहे?
१ वेळेची बचत करणाऱ्या व कमी मजूर लागणाऱ्या उपकरणांच्या या युगात अनेक लोकांकडे अनेक कामे आहेत परंतु वेळ कमी आहे. तुम्हाला एक उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवण्यास कठीण जात आहे का? सेवेसाठी अधिक वेळ असता तर बरे झाले असते असे तुम्हाला वाटते का? तुमच्याजवळ असलेल्या वेळेचा तुम्ही होता होईल तितका चांगला उपयोग कसा करू शकाल?—स्तो. ९०:१२; फिलिप्पै. १:९-११.
२, ३. माहिती तंत्रज्ञानामुळे कोणते धोके सामोरे येतात आणि प्रत्येक जण आत्म-परीक्षण कसा करू शकतो?
२ वेळखाऊ गोष्टी ओळखणे: प्रत्येकाने, आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा करत आहोत याचे अधूनमधून परीक्षण केले पाहिजे. बायबल आर्जवते: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार [“कडक,” NW ] नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिस. ५:१५, १६) माहिती तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे येणाऱ्या समस्यांचा विचार करा. कंप्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे अतिशय उपयोगी असली तरीसुद्धा, आपण आपल्या वेळेकडे लक्ष दिले नाही तर या गोष्टी एक पाश ठरू शकतात.—१ करिंथ. ७:२९, ३१.
३ प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे: ‘निव्वळ वेळखाऊ असलेले ई-मेल मेसेजेज वाचण्यात आणि त्यांना उत्तरे देण्यात मी दररोज वेळ घालवतो का? लहानसहान गोष्टींवर टेलिफोन कॉल करण्यात किंवा टेक्स्ट मेसेजेज पाठवण्यात माझा बहुतेक वेळ जातो का? (१ तीम. ५:१३) मी विनाकारण, इंटरनेट ब्राऊजिंग करण्यात किंवा टीव्हीच्या एका चॅनलनंतर दुसऱ्या चॅनलवरील कार्यक्रम पाहण्यात गुंग असतो का? मी इलेक्ट्रॉनिक गेम्स खेळण्यात इतका व्यस्त होत आहे का, की मला देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही?’ या गोष्टींमुळे आपले आध्यात्मिक स्वास्थ्य आपल्या नकळत कमजोर होऊ शकते.—नीति. १२:११.
४. एका तरुणाने कोणते फेरबदल केले व का?
४ वेळेचा सुज्ञपणे उपयोग करा: इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपला वेळ आणि आपले लक्ष दोन्ही काबीज करतात. कंप्युटर गेम्स खेळण्यात बुडालेल्या एका तरुणाने कबूल केले: “कधीकधी, क्षेत्र सेवेला किंवा ख्रिस्ती सभांना जाण्याआधी मी गेम्स खेळायचो तेव्हा माझं लक्ष लागायचं नाही. घरी गेल्यावर मी अमुक गेम कसा सोडवू शकतो याचाच मी सतत विचार करत राहायचो. यामुळे माझा व्यक्तिगत अभ्यास आणि नियमित बायबल वाचन बारगळू लागले. देवाची सेवा करण्यात माझा आनंद कमी कमी होऊ लागला.” आपल्याला बदलले पाहिजे हे त्याने ओळखले आणि सर्व कंप्युटर गेम्स डिलिट करून टाकल्या. तो आठवून सांगतो: “गेम्स डिलिट करायला माझं मन होतच नव्हतं. मी इतक्या त्यांच्या आहारी गेलो होतो, हे माझं मला समजत नव्हतं. पण नंतर मात्र मला विजय मिळवल्याचा आनंद वाटू लागला कारण, मला माहीत होतं, की मी जे काही केलं ते माझ्याच भल्यासाठी होतं.”—मत्त. ५:२९, ३०.
५. आध्यात्मिक गोष्टींसाठी आपण वेळ कसा काढू शकतो आणि असे केल्याने आपलाच फायदा कसा होतो?
५ काही बाबतीत तुम्हाला फेरफार करण्याची गरज असेल तर तुम्हाला तशी पावले उचलावी लागतील. महत्त्वाच्या नसलेल्या कार्यांतून तुम्ही दिवसांतून अर्धा तास काढू शकता का? रोज इतका वेळ काढल्यास एक वर्षभरात तुम्ही संपूर्ण बायबल वाचून पूर्ण करू शकाल. आणि हे किती प्रतिफलदायी ठरू शकेल! (स्तो. १९:७-११; ११९:९७-१००) बायबल वाचन, सभांची तयारी आणि क्षेत्र सेवा यांसाठी निश्चित वेळ ठरवा. (१ करिंथ. १५:५८) असे केल्याने तुम्हाला वेळखाऊ गोष्टींवर ताबा ठेवता येईल आणि “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घेत राहण्यास मदत होईल.—इफिस. ५:१७.