संगणक तंत्रज्ञानाविषयी समतोल दृष्टिकोन बाळगणे
१ ‘काळाचा संक्षेप करण्यात आला आहे’ त्यामुळे प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना विकर्षित होऊ नये म्हणून आर्जवले. (१ करिंथ. ७:२९) या जुन्या व्यवस्थीकरणाचा अंत समीप येतो, तसे आपण ‘पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटावे’ आणि ‘वेळेचा सदुपयोग करावा’ हे किती निकडीचे आहे! वेळ मौल्यवान आहे.—मत्त. ६:३३; इफिस. ५:१५, १६.
२ तंत्रज्ञानाचे स्वागत, वेळेची बचत करणारा म्हणून करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, केवळ संगणकाचे एक बटन दाबल्याने, वापरणाऱ्याला तत्काळ पुष्कळ माहिती मिळू शकते. इतर माध्यमांनी ज्या कामास तास किंवा आठवडे लागले असते, त्यास संगणक केवळ सेकंदांमध्ये पूर्ण करू शकतात. योग्यरित्या उपयोगात आणल्यास ते एक मदतदायी साधन आहे.
३ ते खरोखरच वेळेची बचत करील का?: दुसऱ्या बाजूला पाहिल्यास, वापरणाऱ्याला असे तंत्रज्ञान पैसा किंवा वेळेच्या बाबतीतही भरमसाट खर्च न करता प्राप्त होत नाही. संगणकाकडून काही काम करवून घेण्याचे शिकण्यासाठी पुष्कळ तास लागतील. शिवाय, जी व्यक्ती तंत्रज्ञानाने जिज्ञासू बनते ती उपयुक्त कामासाठी खर्च केला जाणारा वेळ मध्ये घालवू शकते. आपण एक समतोल दृष्टिकोन बाळगण्यास हवा, तसेच “सुज्ञ व्यक्तींप्रमाणे, स्वतःसाठी संधी साधून घेण्याच्या” प्रेषित पौलाच्या आर्जवण्यात गोवलेले तत्त्व लक्षात ठेवावे.—पाहा १ करिंथ. ७:३१.
४ मंडळीचे अहवाल ठेवण्यासाठी, चांगल्या हेतूच्या अनेक व्यक्तींनी संगणकाचे कार्यक्रम निर्माण केले आहेत. अर्थात, एखादी व्यक्ती तिचा संगणक कशा प्रकारे वापरते हा एक व्यक्तिगत निर्णय आहे. तथापि, ज्या मंडळीच्या अहवालांसाठी फॉर्म पुरवण्यात आले आहेत ते संगणकांवर साठवले जाऊ नयेत कारण मुले किंवा इतर अनाधिकृत व्यक्ती त्यांना प्राप्त करू शकतात. सर्व मंडळीचे अहवाल—जमाखर्च अहवाल, मंडळीच्या प्रचारक अहवालांचे कार्ड वगैरे—संस्थेने पुरवलेल्या फॉर्मवर लिहिण्यात यावेत आणि या मंडळीच्या फॉर्मवरील माहिती संगणकात साठवण्यात येऊ नये. अशा प्रकारे, मंडळीचे गुप्त अहवाल सुरक्षित ठेवण्यात येतील.
५ ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा कार्यक्रमांसाठी नेमणुका देण्याबद्दल जबाबदार पर्यवेक्षक समजूतदार असले पाहिजेत. एका विशिष्ट भागात, पूर्ण केले जाणारे साहित्य त्यांच्या लक्षात असावयास हवे. उदाहरणार्थ, प्रशालेत, काही प्रकारचे साहित्य कोणत्याही विद्यार्थ्याला हाताळण्यासाठी उचित नसेल. सादरतेचा उद्देश तसेच व्यक्तीची पात्रता आणि साहित्याचा प्रकार या सर्वांचा विचार केला पाहिजे. ते संगणकाने ठरवले जाऊ नये.
६ मंडळीच्या सभांमध्ये भाग नेमून दिलेल्या बांधवाने कोणा इतराने तयार करून दिलेल्या साहित्यावर विसंबून राहू नये. एखाद्या बांधवाकडे संगणक असल्यामुळे व तो त्याचा उपयोग संशोधन करण्यासाठी किंवा लवकर व नीटपणे साहित्य टाईप करू शकत असल्यामुळे, इतरांनी त्यांच्या स्वतःच्या नेमणुका तयार करण्यासाठी वेळेची व श्रमाची बचत होईल म्हणून सभांचे भाग त्या बांधवाला तयार करण्याची विनंती करू नये. जबाबदार ख्रिश्चनांनी, स्वतःच्या मंडळीतील किंवा इतर मंडळींतील इतरांना बायबल भाषणे किंवा सभांचे भाग तयार करून देण्याची जबाबदारी स्वीकारू नये. तथापि, संगणक आणि CD-ROM यांवर उपलब्ध असलेली संस्थेची वॉचटावर लायब्ररी उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेत प्रभावशाली संशोधन करण्यात मदत करणारी मौल्यवान साधने ठरू शकतात.—एप्रिल २२, १९९४ अवेक! च्या पृष्ठ २३ वरील पेटी पाहा.
७ बांधवांमध्ये, संगणकाचे कार्यक्रम, याद्या व संबंधित दस्तऐवज पुनर्निर्माण आणि वितरण करण्याबाबत, तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा इतर माध्यमांनी सेवा सभा आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेचे भाग तयार करून वितरण करण्याबाबत, बांधवांनी स्थानिक फायदे ध्यानात घेऊन स्वतःच्या साहित्याची तयारी करणे बहुधा उत्तम असेल. (१ तीम. ४:१३, १५) तसेच आर्थिक फायदा घेण्यासाठी मंडळीच्या साधनांचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर केला जाऊ नये.
८ टेहळणी बुरूज किंवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासामध्ये उपयोगात आणलेल्या शास्त्रवचनांना संगणकाद्वारे छापून त्याचे वितरण करण्याविषयी काय? प्रचारकांनी थेट त्यांच्या बायबलमध्ये आणि अभ्यासल्या जाणाऱ्या प्रकाशनांमध्ये व्यक्तिगत टिपणी व नोंदी करणे अधिक सोयीस्कर आहे. संगणकाद्वारे प्रकाशनात उल्लेखिलेल्या शास्त्रवचनांना छापून सभेमध्ये त्यांचा उपयोग केल्याने शास्त्रवचने काढून पाहण्यास बायबलचा उपयोग करण्यापासून परावृत्त केले जाऊ शकते. तरीही, बायबल अभ्यासादरम्यान किंवा मंडळीच्या सभेत शास्त्रवचने काढून पाहणे हे मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे ज्यामुळे क्षेत्र सेवेत बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्यास आपल्याला सज्ज केले जाते. बहुतेक प्रसंगी आणि विशेषतः मोठ्या उताऱ्यांच्या बाबतीत बायबलमधून थेटपणे वाचणे अधिक प्रभावशाली आहे, आणि श्रोत्यांना बायबल उघडावयास सांगण्यात येते तेव्हा ते खासकरून प्रभावशाली ठरते.
९ इतर गंभीर धोके: ऑगस्ट १, १९९३ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकाने पृष्ठ १७ वर असे उल्लेखिले, की संगणक, नेटवर्कला जोडल्याने गंभीर आध्यात्मिक धोक्यांसाठी मार्ग खुला होऊ शकतो. एखादी दुष्ट व्यक्ती नेटवर्कद्वारे एखादा वायरस—संगणकातील फाईल भ्रष्ट व नष्ट करणारा कार्यक्रम—पाठवू शकते त्याचप्रमाणे धर्मत्यागी, पादरी आणि नैतिकरित्या किंवा इतर प्रकारे इतरांना भ्रष्ट करू पाहणाऱ्या व्यक्ती अशा नेटवर्कद्वारे त्यांच्या विषारी कल्पना सहजगत्या पसरवू शकतात. यामुळे त्याचा वापर करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तींना ‘कुसंगतीची’ झळ लागू शकते. (१ करिंथ. १५:३३) संस्थेला असे अहवाल मिळाले आहेत, की संगणकाच्या नेटवर्कचा उपयोग केवळ आध्यात्मिक बाबींविषयी तर्क करण्यासच नव्हे, तर वाईट सल्ला देणे, चहाड्या किंवा खोटी माहिती पसरवणे, नकारात्मक कल्पना रुजवणे, काहींच्या विश्वासाचा नाश करणारे प्रश्न व शंका निर्माण करणे आणि बायबलबद्दल व्यक्तिगत प्रतिपादने फैलावण्यासही उपयोग करण्यात आला आहे. धर्मत्यागी आणि पाळक यांचे साहित्य आणि नियतकालिके हेच साध्य करण्याचा प्रयत्न करतात. काही माहिती वरून मनोवेधक आणि बोधक असल्याची भासू शकते, आणि तरीही ती विषारी घटकांनी संमिश्रित असेल. ख्रिस्ती जन, समयोचित आध्यात्मिक अन्न आणि स्पष्टीकरण यांसाठी ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ अपेक्षा करतात. (टेहळणी बुरूज, जुलै १, १९९४, पृष्ठे ९-११ पाहा.) एका ख्रिश्चनावर सर्व भ्रष्ट करणाऱ्या प्रभावांपासून स्वतःला बचावून ठेवण्याची गंभीर जबाबदारी आहे आणि याहूनही मूलभूत गोष्ट म्हणजे, तो कोणाशी सहवास ठेवतो हे त्याला नेहमीच माहीत असले पाहिजे.—मत्त. २४:४५-४७; २ योहा. १०, ११.
१० त्याच टेहळणी बुरूज लेखाने ग्रंथावरील हक्काच्या नियमांचा आदर करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. संगणकाच्या कार्यक्रमांना निर्माण करून विकणाऱ्या अनेक कंपन्यांकडे याचा हक्क असतो आणि या कार्यक्रमांना वैधरित्या कसे वापरले जाऊ शकते हे दाखवणारा एक परवाना ते देतात. त्या परवान्यात सामान्यतः असे म्हटलेले असते, की मालकाला त्या कार्यक्रमाच्या प्रती इतरांना देता येत नाही; खरे म्हणजे आंतरराष्ट्रीय हक्काच्या नियमानुसार तसे करणे अवैध आहे. अनेक लोभी लोक नियमाचा भंग करण्यात काचकूच करत नाहीत. तथापि, ख्रिश्चनांनी वैध बाबींमध्ये दक्ष असले पाहिजे, जे कैसराचे ते कैसराला दिले पाहिजे.—मत्त. २२:२१; रोम. १३:१.
११ तंत्रज्ञानाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे मूल्य, त्याचा उपयोग करण्यात आधीपासूनच समाविष्ट असलेल्या संभाव्य धोक्यांवरून ठरवण्यात आले पाहिजे. दूरचित्रवाणी चांगल्या फायद्यास्तव उपयोगात आणता येते त्याचप्रमाणे आज मानवजातीवरील त्याच्या अहितकारक परिणामामुळे जगीक उगमांनी देखील याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संगणकाचे नेटवर्क जगभरात फैलावलेले असल्यामुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी यामुळे अमर्यादित मौल्यवान माहिती मिळू शकते. हे नेटवर्क व्यापार आणि संघटनांना तसेच आपण राहत असलेल्या गतिशील समाजात, व्यक्तिगत किंवा व्यापारी विषयांच्या बरोबरीने राहण्याची गरज असणाऱ्या व्यक्तींना अत्यावश्यक सेवा सादर करतात. त्याचवेळी, बीभत्स चित्रे किंवा वाङ्मय, विभाजक द्वेष प्रचार आणि वाईट किंवा दुष्ट कृत्ये कशी करावीत याबद्दल तपशीलवार माहिती यासारख्या समस्यांनी संगणकाचे नेटवर्क ग्रस्त असतात.
१२ यास्तव, एका ख्रिश्चनाने संगणकाच्या तंत्रज्ञानाविषयी समतोल दृष्टिकोन का बाळगावा याची अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत. संस्थेने संगणकाच्या डिस्केटवर उपलब्ध करून दिलेले नवीन जगाचे भाषांतर (इंग्रजी), सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) यांचे खंड आणि गेटवर्स कार्यक्रम यांचा अनेक व्यक्ती आनंद लुटत आहेत. त्याचे वितरण अद्याप भारतामध्ये होत नसले, तरी अनेकांनी परदेशातून CD-ROM वर वॉचटावर लायब्ररी व्यक्तिगतरित्या प्राप्त केली आहे ज्यामध्ये अधिक संशोधनाची क्षमता आहे. विशिष्ट तंत्रज्ञानाचे मूल्य ओळखताना फायदेकारक उद्देशांसाठी जी व्यक्ती अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करते तिने सुद्धा स्वतःला तसेच इतरांना नकारात्मक बाजूंपासून सुरक्षित ठेवण्याविषयी सावध असले पाहिजे. तंत्रज्ञानाचा निरुपद्रवी उपयोग देखील आपल्या समर्पित समयाचे अमर्यादित प्रमाण घेणार नाही किंवा आपले प्राथमिक कार्य व ध्येय यांपासून विकर्षित करणार नाही म्हणून आपण समतोल बाळगावा.—मत्त. ६:२२; २८:१९, २०.