अनौपचारिक साक्ष देऊन यहोवाची स्तुती करा
१ यहोवाचे एकनिष्ठ सेवक, दररोज त्याची स्तुती करण्यासाठी संधींच्या शोधात असतात. (स्तो. ९६:२, ३; इब्री १३:१५) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे अनौपचारिक साक्ष देणे. आज, यहोवाचे अनेक उपासक, त्यांना अनौपचारिक साक्ष देऊन कोणीतरी राज्याचा संदेश सांगितला होता म्हणून कृतज्ञ आहेत.
२ एखाद्या व्यक्तीला अनौपचारिक साक्ष दिल्याने बहुतेकदा अनेकांना राज्य संदेश ऐकायला मिळतो. जसे की, याकोबाच्या झऱ्याजवळ येशूने एका शोमरोनी स्त्रीसोबत केलेल्या संभाषणामुळे अनेक लोकांनी सुवार्तेत आस्था दाखवली. (योहान ४:६-३०, ३९, ४२) पौल आणि सीला फिलिप्पै येथील बंदिशाळेत होते तेव्हा त्यांनी तेथील नायकाला साक्ष दिली आणि याचा परिणाम असा झाला की या नायकाच्या संपूर्ण घराण्याने सत्याचा स्वीकार केला.—प्रे. कृत्ये १६:२५-३४.
३ संधी: अनौपचारिक साक्ष देण्याकरता तुमच्याजवळ कोणकोणत्या संधी आहेत? काही बंधूभगिनी, बाजारहाट करत असताना, सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करत असताना किंवा इस्पितळात/दवाखान्यात आपला नंबर लागेपर्यंत थांबलेल्यांना अनौपचारिक साक्ष देतात. इतर काहीजण, कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत मधल्या सुटीत साक्ष देऊ शकले आहेत. एखादे बायबल आधारित प्रकाशन, सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवल्याने देखील पुष्कळ लोक आपल्या विश्वासांविषयी विचारपूस करण्यास उत्सुक होऊ शकतात.—१ पेत्र ३:१५.
४ सुरवात करणे: सात वर्षांच्या एका लाजऱ्या स्वभावाच्या मुलीने, सर्वांना प्रचार करणे किती महत्त्वाचे आहे हे एका सभेत ऐकले. आपल्या आईबरोबर बाजारहाट करायला जाताना तिने आपल्या बॅगेत दोन माहितीपत्रके घेतली. तिची आई काऊंटरवर होती तेव्हा या मुलीने एका स्त्रीला एक माहितीपत्रक दिले, आणि या स्त्रीने ते आनंदाने स्वीकारले देखील. या स्त्रीशी बोलण्याचे धैर्य तिला कोठून मिळाले असे या लाजऱ्या मुलीला विचारले असता ती म्हणाली: “मी मनातल्या मनात फक्त एक, दोन, तीन असं म्हटलं आणि सरळ तिच्याशी बोलू लागले!”
५ अनौपचारिक साक्ष देण्याकरता आपल्या सर्वांकडे या लहानशा मुलीसारखी उत्सुकता असली पाहिजे. आपल्याला मदत कशी मिळू शकेल? बोलण्याचे धैर्य मिळावे म्हणून देवाला प्रार्थना करा. (१ थेस्सलनी. २:२) संभाषण सुरू करण्यासाठी एखाद्या रोचक विषयावरील एखादा प्रश्न किंवा विधान तयार ठेवा. आणि मग यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल हा भरवसा बाळगा.—लूक १२:११, १२.
६ दररोज आपण भेटत असलेल्या लोकांना अनौपचारिक साक्ष दिल्याने यहोवाची स्तुती होते आणि आपल्याला आनंद मिळतो. अनौपचारिक साक्ष दिल्यामुळे कदाचित कोणाला तरी सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत होऊ शकेल.