सुवार्ता सोपवण्यात आली आहे
१ देवाची सुवार्ता आपल्यावर सोपवण्यात आल्यामुळे आपण किती धन्य झालो आहोत! (१ थेस्सलनी. २:४) हा शक्तिशाली संदेश ऐकायला काही लोक नाकारत असले तरी, सुगंधित सुवासाकडे आकर्षित झाल्याप्रमाणे प्रांजळ लोक या संदेशाकडे आकर्षित होतात. (२ करिंथ. २:१४-१६) ही सुवार्ता स्वीकारून ती मानणाऱ्यांना तारण मिळेल. (रोम. १:१६) आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या सुवार्तेबाबत आपण काय केले पाहिजे?
२ येशू आणि त्याचे प्रेषित: येशूने सुवार्तेच्या प्रचाराला प्राधान्य दिले. (लूक ४:१८, ४३) तो थकलेला व भुकेला होता तेव्हा देखील लोकांबद्दलच्या प्रेमाने आणि संदेशाबद्दलच्या कृतज्ञतेने तो, ही सुवार्ता लोकांना सांगण्यास प्रवृत्त झाला. (मार्क ६:३०-३४) आपल्या बोलण्याद्वारे आणि कार्यांद्वारे त्याने, राज्याच्या प्रचार कार्याचे महत्त्व आपल्या शिष्यांच्या मनावर बिंबवले.—मत्त. २८:१८-२०; मार्क १३:१०.
३ येशूचे अनुकरण करून प्रेषितांनी देखील राज्याचा संदेश आवेशाने घोषित केला. त्यांना मारहाण करण्यात आली, प्रचार कार्य थांबवण्यास सांगितले तरीसुद्धा “सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४०-४२) प्रेषित पौल हे कार्य अथकपणे करीत राहिला. (१ करिंथ. १५:९, १०; कलस्सै. १:२९) सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कामाची तुलना त्याने, सहमानवाचे त्याच्यावर असलेल्या कर्जासोबत केली; ही जबाबदारी पूर्ण करण्याकरता तो व्यक्तिगत सुखसोयींचा त्याग करायलाही तयार होता.—प्रे. कृत्ये २०:२४; रोम. १:१४-१६.
४ आपला सुहक्क: आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या पवित्र कामगिरीबद्दलची गुणग्राहकता आपल्याला, प्रचार कार्यातील आपला सहभाग वाढवण्याचे मार्ग शोधून काढण्यास प्रवृत्त करील. (रोम. १५:१६) व्हिलचेअरला बंदिस्त असलेले एडवर्ड, एखाद्या हॉटेलच्या फाटकापाशी बसायचे आणि हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांना आपल्या विश्वासाबद्दल सांगायचे. परंतु त्यांना हे कार्य आणखी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी एका पिक्-अप ट्रकवर एक खास केबिन बसवली आणि या वाहनाद्वारे त्यांनी अनेक वर्षांपर्यंत पायनियरींग केली; हजारो किलोमीटरपर्यंत प्रवास केला. एडवर्ड यांच्याप्रमाणे आजही अनेकांनी, सुवार्तेच्या प्रसारात अधिकाधिक सहभाग घेता यावा म्हणून आपल्या परिस्थितीत फेरबदल केले आहेत.
५ येशू आणि त्याच्या प्रेषितांचे अनुकरण करून आपण आज प्रचार कार्याला आपल्या जीवनात प्राधान्य देऊ या. असे केल्याने आपण लोकांबद्दल आपल्याला असलेले प्रेम आणि आपल्यावर सोपवण्यात आलेल्या सुवार्तेबद्दल गुणग्राहकता प्रदर्शित करू शकू.