यहोवा परमस्तुत्य आहे
एप्रिल १६ रोजी प्रभूचे सांज भोजन साजरे केले जाईल
१ एप्रिल १६, २००३ हा दिवस जसजसा जवळ येतो तसतशा आपल्या अपेक्षा वाढत राहतात. त्या रात्री आपण, संपूर्ण जगभरातील आपल्या सहउपासकांसह यहोवाच्या नावाचे गौरव करून येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करणार आहोत. यहोवाने केलेल्या खंडणीच्या अद्भुत तरतुदीबद्दल आपण दाखवत असलेल्या गौरवास केवळ यहोवा पात्र आहे. खंडणीद्वारे तो सर्व आज्ञाधारक मानवजातीवर आश्चर्यकारक आशीर्वादांचा वर्षाव करील. तेव्हा, स्तोत्रकर्त्याबरोबर आपणही “परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे,” असे म्हणतो.—स्तो. १४५:३.
२ स्मारकविधीचा काळ, देवाच्या चांगुलपणावर मनन करण्याचा तसेच, ‘आपल्याला जीवन प्राप्त व्हावे म्हणून यहोवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविल्याबद्दल’ कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम समय आहे. (१ योहा. ४:९, १०) प्रभूच्या सांज भोजनाचे आज्ञाधारकपणे पालन केल्याने, “परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे; . . . व अतिदयाळू आहे,” ही गोष्ट आपल्या हृदयावर बिंबवली जाते. (स्तो. १४५:८) होय, खंडणी ही मानवजातीबद्दल यहोवाला असलेल्या प्रेमाची सर्वात महान अभिव्यक्ती आहे. (योहा. ३:१६) आपण देवाच्या प्रीतीवर मनन करतो आणि येशूच्या एकनिष्ठ जीवनक्रमाचा विचार करतो तेव्हा यहोवाची स्तुती करण्यास आपण प्रवृत्त होतो. सार्वकालिक जीवन आपल्यासाठी शक्य करून स्वतःचे अमर्याद प्रेम व्यक्त केल्याबद्दल आपण चिरकाल त्याची स्तुती करू.—स्तो. १४५:१, २.
३ यहोवाची स्तुती करण्यास इतरांना मदत करा: देवाने दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी अर्थात खंडणी याबद्दलची गुणग्राहकता बाळगल्यामुळे आपण, यहोवाची स्तुती करण्यास इतरांनाही आमंत्रण देण्यास प्रेरित होतो. “ते तुझ्या परमदयेची आठवण काढितील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करितील,” असे लिहिण्यास स्तोत्रकर्ता प्रेरित झाला. (स्तो. १४५:७) गेल्या केवळ एक वर्षातच, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांनी शंभर कोटीपेक्षा अधिक तास प्रचार कार्यात खर्च केले. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम काय झाला? दर आठवडी, सरासरी ५,१०० पेक्षा अधिक लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. स्मारकविधीला एकूण १,५५,९७,७४६ जण उपस्थित होते; यामधील ९० लाखांपेक्षा अधिक लोकांनी अद्याप सुवार्तेचे प्रचारक यानात्याने यहोवाची स्तुती करण्यास सुरवात केलेली नाही. यावरून दिसते की, पुढे वाढ होण्याची बरीच शक्यता आहे! राज्य उद्घोषक यानात्याने आपण, सुवार्तेची घोषणा करण्याचा तसेच इतरांना यहोवा, त्याचा पुत्र आणि राज्य यांकडे आणण्याचा सुहक्क बहुमोल समजतो.
४ यहोवाचा सन्मान करण्यास इतरांना उत्तेजन देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपल्याबरोबर प्रभूचे सांज भोजन साजरे करण्याचे निमंत्रण देणे. तुम्ही ज्यांना आमंत्रित करू इच्छिता त्यांची त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवसाची आणि वेळेची आठवण करून देण्याची गरज आहे अशा इतरांचीही तुम्ही यादी तयार केली आहे का? मग, यादीतील सर्वांना तुम्ही आमंत्रण दिले का? नसल्यास, वेळ आहे तोपर्यंत जरूर द्या. स्मारकविधी साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे ते समजण्यास त्यांना मदत करा. स्मारकविधीच्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करण्यास तयार राहा. ते आल्याबद्दल तुम्हाला आनंद झाला आहे हे व्यक्त करा, इतरांशी त्यांची ओळख करून द्या आणि या सोहळ्यासाठी आल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.
५ स्मारकविधीला नवीन लोक उपस्थित राहिल्यास त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळू शकेल. एक बायबल विद्यार्थी ज्याला एक प्रकारच्या तणाव विकृतीमुळे सार्वजनिक ठिकाणी जाता येत नव्हते, तो स्मारकविधीसाठी आला. सभेविषयी त्याला काय वाटले, असे त्याला विचारल्यावर तो म्हणाला: “मला ही सर्वात पवित्र रात्र वाटली, आणि मला उपस्थित राहता आले याचा मला आनंद वाटतो.” तेव्हापासून तो सभांना उपस्थित राहू लागला आहे.
६ स्मारकविधीनंतर: यहोवाची स्तुती करणारे होण्यासाठी या आस्थेवाईक लोकांना आपण मदत कशी करू शकतो? वडील जन, स्मारकविधीसाठी उपस्थित राहिलेल्या या नवीन लोकांकडे लक्ष देतील आणि लवकरात लवकर त्यांची भेट घेण्यासाठी योग्य प्रचारकांची योजना करतील जेणेकरून त्यांनी शिकलेल्या व पाहिलेल्या तजेलादायक गोष्टींची उजळणी करता येईल. काहींना गृह बायबल अभ्यास हवा असेल. शिवाय, दर आठवडी होणाऱ्या मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्यासही त्यांना आमंत्रण दिले पाहिजे कारण सभांना नियमित उपस्थित राहिल्याने बायबलबद्दल त्यांना अधिक ज्ञान मिळत राहील.
७ अनियमित व निष्क्रिय झालेल्यांना पुन्हा एकदा मंडळीच्या सभांना नियमितरीत्या उपस्थित राहण्याचे उत्तेजन देण्याची व्यवस्था केली जात आहे. क्षेत्र सेवेत पुन्हा एकदा भाग घेण्यास एखाद्या निष्क्रिय बंधूभगिनीला मदत करण्यास वडीलजन तुम्हाला सांगतात तेव्हा तत्परतेने तयारी दाखवा. आपल्या बंधूभगिनींबद्दल अशाप्रकारची प्रेमळ काळजी दाखवणे हे प्रेषित पौलाने केलेल्या या आर्जवाच्या एकवाक्यतेत आहे: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलती. ६:१०.
८ एप्रिल १६ तारखेला होणाऱ्या स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा आपण सर्वजण विशेष प्रयत्न करू या. यहोवाची स्तुती करण्याचा हा पवित्र प्रसंग आपल्यापैकी कोणालाही चुकवावासा वाटणार नाही. होय, आता आणि चिरकाल आपण यहोवाची त्याच्या महत्कृत्यांबद्दल स्तुती करीत राहू या!—स्तो. १४५:२१.