तुम्ही कशाला प्राधान्य देता?
१ पुष्कळ धार्मिक संघटना, शिक्षण किंवा वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याकरता इमारती बांधून दानधर्म करण्यावर जोर देतात. पण यहोवाचे साक्षीदार ‘चांगले करण्यास व दान करण्यास विसरत’ तर नाहीच शिवाय, लोकांना ते आध्यात्मिकरीत्याही मदत करतात.—इब्री १३:१६.
२ पहिल्या शतकातील आदर्श: पृथ्वीवर असताना येशूने अनेक सत्कर्मे केली पण त्याचे प्रमुख कार्य सत्याची साक्ष देणे हे होते. (लूक ४:४३; योहा. १८:३७; प्रे. कृत्ये १०:३८) त्याने आपल्या शिष्यांना, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, . . . त्यांस . . . शिकवा,” अशी आज्ञा दिली. (मत्त. २८:१९, २०) आणि त्याने असे सूचित केले की त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याने सुरू केलेले काम मोठ्या प्रमाणावर करतील. (योहा. १४:१२) येशूने प्रचार कार्याला महत्त्व दिले कारण या कार्यामुळे लोकांना तारणाचा मार्ग शिकण्यास मदत मिळते.—योहा. १७:३.
३ प्रेषित पौलाने प्रचार कार्याला एक “आवश्यकता,” किंवा, टाळता येत नाही अशी एक गरज समजले. (१ करिंथ. ९:१६, १७) आपली सेवा पूर्ण करण्यासाठी, तो गरज भासली तर कोणतेही त्याग करायला, कोणत्याही परीक्षांचा सामना करायला, किंवा कोणत्याही अडचणींना तोंड द्यायला तयार होता. (प्रे. कृत्ये २०:२२-२४) प्रेषित पेत्राने व त्याच्या सोबत्यांनी अशाच प्रकारची मनोवृत्ती दाखवली. तुरुंगवासात व मारहाण सहन करत असतानाही “येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रे. कृत्ये ५:४०-४२.
४ आपल्याविषयी काय? राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्याला व शिष्य बनवण्याच्या कार्याला तुम्ही प्राधान्य देता का? येशूप्रमाणे तुम्हाला ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकांबद्दल खरोखर काळजी वाटते का? (मत्त. ९:३६) सध्याच्या जागतिक घटना आणि बायबल भविष्यवाणी स्पष्टपणे सिद्ध करतात, की या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश जवळ येऊन ठेपला आहे! प्रचार कार्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केल्यास आपण आवेशाने प्रचार करीत राहण्यास प्रवृत्त होऊ.
५ तुमची परिस्थिती तोलून-मापून पाहा: व्यक्तिगत परिस्थिती नेहमी बदलत असल्यामुळे आपण प्रचार कार्यात अधिक सहभाग घेण्यासाठी आपल्या परिस्थितीत काही फेरबदल करू शकू का याचा वेळोवेळी विचार केला पाहिजे. एक भगिनी, १९५०, ६० व ७० च्या दशकात सामान्य पायनियरींग करीत होती, पण आरोग्याच्या कारणास्तव तिला तिची पायनियरींग सोडावी लागली. कालांतराने तिची तब्येत सुधारली. अलीकडेच तिने आपल्या परिस्थितीचा विचार केला आणि आपण पुन्हा पायनियरींग सुरू करू शकतो असे तिने ठरवले. वयाच्या ९० व्या वर्षी तिला पायनियर सेवा प्रशालेस उपस्थित राहायला किती आनंद झाला असेल बरे! तुमच्याविषयी काय? तुम्ही लवकरच निवृत्त किंवा पदवीधर होणार आहात का? तुमची परिस्थिती बदलल्यावर तुम्ही पायनियरींग करू शकाल का?
६ “फार काम पडल्यामुळे [मार्थेची] तारांबळ उडाली” असल्याचे येशूने पाहिले तेव्हा त्याने तिला अतिशय दयाळुपणे सांगितले, की तिने तिचे जीवन साधे ठेवल्यास तिला महान आशीर्वाद मिळतील. (लूक १०:४०-४२) तुम्ही तुमची जीवन-शैली साधी ठेवू शकता का? पती व पत्नी दोघांनाही नोकरी करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का? थोडा फेरफार केल्यास, कुटुंबाचे एकाच पगारावर भागू शकेल का? सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याकरता फेरफार केलेल्या अनेकांना पुष्कळ आध्यात्मिक लाभ प्राप्त झाले आहेत.
७ आपण सर्व येशू व प्रेषित यांच्या उदाहरणाचे अनुकरण करू या! राज्याच्या सुवार्तेच्या महत्त्वपूर्ण कार्यात पूर्ण सहभाग घेण्याकरता आपण करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.—लूक ९:५७-६२.