‘पितृहीनांना’ ममता दाखवणे
१ यहोवा “पितृहीनांचा पिता” आहे. (स्तो. ६८:५) त्यांच्या हिताची त्याला असलेली काळजी, प्राचीन इस्राएल राष्ट्राला त्याने दिलेल्या आज्ञेतून स्पष्टपणे दिसते: “कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याहि प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्हाणे अवश्य ऐकेन.” (निर्ग. २२:२२, २३) देवाच्या नियमशास्त्रात, अशा लोकांना आर्थिकरीत्या मदत करण्याची देखील तरतूद करण्यात आली होती. (अनु. २४:१९-२१) ख्रिस्ती व्यवस्थेत खऱ्या उपासकांना, “अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार” घेण्यास सांगितले आहे. (याको. १:२७) एकट्या पालक कुटुंबात किंवा धार्मिक कारणामुळे विभाजित घरात वाढणाऱ्यांना यहोवाप्रमाणे आपणही ममता कशाप्रकारे दाखवू शकतो?
२ आध्यात्मिक प्रशिक्षण: तुम्ही एकटे पालक असाल किंवा तुमचा विवाहसोबती सत्यात नसेल तर तुमच्या मुलांबरोबर नियमितरीत्या गृह बायबल अभ्यास घ्यायला तुम्हाला कठीण जात असेल. परंतु, मुलांनी संतुलित, परिपक्व प्रौढ होण्यासाठी नियमित व अर्थपूर्ण बायबल अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. (नीति. २२:६) दररोज त्यांच्याबरोबर आध्यात्मिक विषयांवर चर्चा करणे देखील महत्त्वाचे आहे. (अनु. ६:६-९) कधीकधी तुम्ही निराश व्हाल, परंतु तरीसुद्धा हार मानू नका. ‘आपल्या मुलांना . . . प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत’ असताना यहोवाकडे शक्ती व मार्गदर्शन मागा.—इफिस. ६:४.
३ तुमच्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर त्याबद्दल वडिलांना सांगा. ते तुम्हाला व्यावहारिक मार्ग सुचवू शकतील किंवा तुमच्या कुटुंबासाठी एक उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम बनवण्यास तुम्हाला मदत करू शकतील.
४ इतरही मदत करू शकतात: पहिल्या शतकात, तीमथ्याचे संगोपन धार्मिक कारणासाठी विभाजित झालेल्या घरातच झाले होते तरीसुद्धा तो यहोवाचा एक आवेशी सेवक बनला. लहानपणापासूनच त्याच्या आईने व आजीने त्याला दिलेल्या पवित्र लिखाणांच्या शिकवणीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. (प्रे. कृत्ये १६:१, २; २ तीम. १:५; ३:१५) पण, इतर ख्रिश्चनांबरोबर आणि “माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र” असे तीमथ्याला संबोधणाऱ्या पौलाबरोबर संगती केल्यामुळे देखील त्याला पुष्कळ फायदा झाला.—१ करिंथ. ४:१७.
५ तसेच आजही, आध्यात्मिक प्रौढ बंधू व भगिनी मंडळीतल्या पितृहीन मुलामुलींना ममत्व दाखवतात तेव्हा त्यांना त्याचा किती फायदा होतो! तुम्ही प्रत्येकाला नावाने ओळखता का? ख्रिस्ती सभांना एकत्र आल्यावर किंवा इतर प्रसंगी तुम्ही त्यांच्याशी बोलता का? तुमच्याबरोबर क्षेत्र सेवेत यायला तुम्ही त्यांना बोलवू शकता. कधीकधी तुम्ही त्यांना व त्यांच्या एकट्या किंवा सत्यात असलेल्या पालकाला तुमच्या कौटुंबिक अभ्यासात किंवा हितकारक मनोरंजनात सामील होण्यासाठी बोलवू शकता. हे तरुण लोक तुम्हाला त्यांचे मित्र समजू लागतात तेव्हा त्यांनी तुमच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची व तुम्ही दिलेले उत्तेजन स्वीकारण्याची अधिक शक्यता असते.—फिलिप्पै. २:४.
६ यहोवाला पितृहीन मुलामुलींची खूप काळजी आहे आणि या लोकांना सत्य आपलेसे करण्यासाठी आपण जे प्रेमळ प्रयत्न करतो त्यांवर तो आशीर्वाद देतो. एकट्या पालक कुटुंबात किंवा विभाजित घरात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांना अशाप्रकारचे प्रोत्साहन मिळाले आहे आणि आता ते पायनियर, सेवा सेवक, वडील, प्रवासी पर्यवेक्षक किंवा बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून विश्वासूपणे सेवा करत आहेत. तेव्हा आपण सर्व जण आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करून, पितृहीनांना “विशाल अंतःकरणाने” ममता दाखवण्याचे मार्ग शोधू या.—२ करिंथ. ६:११-१३.