तुमच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना साहाय्य करणे
१ मंडळीच्या पुस्तक अभ्यासातून प्रत्येकाला अनेक लाभ मिळतात. मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आपली भूमिका कशी पार पाडतात हे आपण गेल्या महिन्यात शिकलो. पण आपण असे काय करू शकतो ज्यामुळे त्यांना मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला तसेच इतरांनाही त्याचा फायदा होईल?
२ दर आठवडी उपस्थित राहा: पुस्तक अभ्यास गट लहान असल्यामुळे तुमची उपस्थिती ही महत्त्वाची असते. त्यामुळे दर आठवडी उपस्थित राहण्याचे ध्येय ठेवा. पुस्तक अभ्यासासाठी वेळेवर जाऊन तुम्ही अभ्यास पर्यवेक्षकांना मदत करू शकता कारण यामुळे त्यांना सभा वेळेवर सुरू करता येईल.—१ करिंथ. १४:४०.
३ उभारणीकारक उत्तरे: मदत देण्याचा आणखी एका मार्ग म्हणजे, चांगली तयारी करून उभारणीकारक उत्तरे देणे. एकाच मुद्द्यावर केंद्रित असलेली उत्तरे सहसा उत्तम उत्तरे असतात; शिवाय यामुळे मग इतरांनाही उत्तर देण्याचे प्रोत्साहन मिळते. परिच्छेदातील सर्व मुद्दे स्वतःच सांगायचे टाळा. अभ्यासल्या जाणाऱ्या साहित्यातील एखादा मुद्दा तुम्हाला अगदी मनापासून आवडला असेल तर उत्तराद्वारे तुमचे विचार मांडून चर्चा आणखी उत्साही बनवा.—१ पेत्र ४:१०.
४ गटाच्या वतीने तुम्हाला परिच्छेद वाचण्याचा सुहक्क मिळाला असेल तर ती नेमणूक प्रामाणिकपणे पूर्ण करा. चांगल्या वाचनामुळे अभ्यासाचा दर्जा वाढतो आणि सर्वांसाठी तो सुखद ठरतो.—१ तीमथ्य ४:१३.
५ गट मिळून साक्षकार्य: क्षेत्र सेवेसाठी असलेल्या सभा सहसा पुस्तक अभ्यासाच्या ठिकाणी होत असतात आणि या व्यवस्थेला तुम्ही सहकार्य दिल्यास अभ्यास पर्यवेक्षकांना सुवार्तिक कार्यात पुढाकार घेण्यास मदत मिळते. या व्यवस्थेमुळे तुम्हाला तुमच्या बांधवांना जवळून जाणण्यास, त्यांना प्रोत्साहन देण्यास संधी मिळते अशी मनोवृत्ती बाळगा.
६ क्षेत्र सेवेचे अहवाल: दर महिन्याच्या अखेरीस न विसरता क्षेत्र सेवेचा अहवाल देणे, हा मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना मदत करण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुम्ही तुमचा रिपोर्ट थेट त्यांच्या हातात देऊ शकता किंवा राज्य सभागृहात अहवाल टाकण्यासाठी असलेल्या पेटीत तो टाकू शकता. मंडळीचे सचिव या पेटीतून, मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी गोळा केलेले क्षेत्र सेवेचे अहवाल घेतील.
७ मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना तुम्ही देत असलेल्या सहकार्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “तुमच्या आत्म्याबरोबर” यहोवा असेल, ही खात्री बाळगा.—फिलिप्पै. ४:२३.