येशूविषयीचे सत्य जाहीर करणे
१ अभिषिक्त ख्रिश्चनांना, इतर मेंढरे असलेल्या आपल्या सोबत्यांच्या साहाय्यासह “येशूविषयी साक्ष” देण्याचे काम आहे. (प्रकटी. १२:१७) ही एक महत्त्वाची कामगिरी आहे कारण केवळ त्याच्याद्वारेच तारण मिळणे शक्य आहे.—योहा. १७:३; प्रे. कृत्ये ४:१२.
२ “मार्ग, सत्य व जीवन”: येशूने म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहा. १४:६) केवळ येशूच तो “मार्ग” आहे ज्याद्वारे आपण देवाला प्रार्थना करू शकतो आणि त्याच्याबरोबर एक स्वीकृत नातेसंबंध ठेवू शकतो. (योहा. १५:१६) येशू “सत्य” आहे याचा अर्थ इब्री शास्त्रवचनांमध्ये असलेल्या भविष्यवाण्या आणि भावी गोष्टींच्या छाया त्याच्यामध्ये पूर्ण झाल्या. (योहा १:१७; कलस्सै. २:१६, १७) होय, खऱ्या भविष्यवाणीचा प्रमुख उद्देश, देवाचे उद्देश पूर्ण होण्यात येशूच्या प्रमुख भूमिकेवर प्रकाश टाकणे हा आहे. (प्रकटी. १९:१०) तसेच, येशू “जीवन” देखील आहे. सार्वकालिक जीवनाची देणगी प्राप्त करण्यासाठी सर्वांनी त्याच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवला पाहिजे.—योहा. ३:१६, ३६; इब्री २:९.
३ मस्तक आणि राज्य करणारा राजा: यहोवाने आपल्या पुत्राला सोपवलेला महान कार्यकारी अधिकार लोकांनी कबूल केला पाहिजे. देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूला नियुक्त करण्यात आले आहे—‘राष्ट्रे त्याच्या आज्ञांकित होतील.’ (उत्प. ४९:१०) याशिवाय, यहोवाने त्याला मंडळीचा मस्तक म्हणूनही नेमले आहे. (इफिस. १:२२, २३) येशू मंडळ्यांवर देखरेख कसा करतो आणि “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न देण्याकरता तो “विश्वासू व बुद्धिमान दासाला” कसा उपयोगात आणतो हे समजण्यासाठी आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे.—मत्त. २४:४५-४७.
४ दयाशील प्रमुख याजक: मानव या नात्याने येशूने परीक्षांचा व दुःखाचा अनुभव घेतल्यामुळे, “ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.” (इब्री २:१७, १८) येशूला आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटते आणि तो आपल्यासाठी दयाळुपणे मध्यस्थी करण्यास तयार आहे हे आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांना कळते तेव्हा आपले हृदय किती भरून येते! (रोम. ८:३४) येशूच्या बलिदानाच्या आणि प्रमुख याजक या नात्याने तो करत असलेल्या त्याच्या सेवेच्या आधारावर, ‘ऐनवेळी साहाय्य’ मिळावे म्हणून आपण यहोवाच्या ‘जवळ जाऊ’ शकतो.—इब्री ४:१५, १६.
५ येशूविषयीचे सत्य सांगण्याच्या आपल्या प्रयत्नांमुळे इतरजण, त्याच्या आज्ञेत राहण्यास व आपल्याबरोबर त्याची सेवा करण्यास प्रवृत्त होवोत अशी आपली सदिच्छा आहे!—योहान १४:१५, २१.