यहोवाची स्तुती करण्यास लोकांना मदत करणे
१ “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे,” या महत्त्वपूर्ण संदेशाची घोषणा संपूर्ण पृथ्वीतलावरील लोकांना केली जात आहे. (प्रकटी. १४:६, ७) या घोषणेत सहभाग घेण्याचा आपल्यालाही सुहक्क मिळाला आहे. पण यहोवाची भीती बाळगून त्याची उपासना करण्यासाठी लोकांना त्याच्याविषयी काय माहीत असले पाहिजे?
२ त्याचे नाव: आज उपासना केल्या जाणाऱ्या अनेक खोट्या दैवतांपैकी एकाच खऱ्या देवाची ओळख त्याच्या नावावरून लोकांना झाली पाहिजे. (अनु. ४:३५; १ करिंथ. ८:५, ६) खरे तर, बायबल लेखकांनी यहोवाचे लोकप्रसिद्ध नाव ७,००० पेक्षा अधिक वेळा वापरले. देवाचे नाव लोकांना केव्हा सांगायचे याचा आपण विचार केला पाहिजे हे खरे असले तरी, त्याचा उपयोग करण्यास आपल्याला लाज वाटू नये किंवा आपण टाळाटाळ करू नये. सर्व मानवजातीला आपले नाव माहीत व्हावे ही देवाची इच्छा आहे.—स्तोत्र ८३:१८.
३ त्याचे व्यक्तिमत्त्व: लोकांनी यहोवाची स्तुती करण्याकरता त्यांना तो कोणत्याप्रकारचा देव आहे हे माहीत असले पाहिजे. आपण त्यांना, त्याची करुणा, प्रेम-दया आणि इतर सुरेख गुणांसहित, त्याच्या उल्लेखनीय प्रीतीविषयी, सर्वश्रेष्ठ बुद्धीविषयी, परिपूर्ण न्यायाविषयी आणि शक्तिशाली सामर्थ्याविषयी देखील सांगितले पाहिजे. (निर्ग. ३४:६, ७) लोकांनी देवाचे हितकारक व आदरयुक्त भय बाळगण्यास शिकले पाहिजे; यहोवाची स्वीकृती मिळण्यावरच आपले जीवन निर्भर आहे हे त्यांनी जाणले पाहिजे.—स्तोत्र ८९:७.
४ देवाच्या समीप येणे: देवाकडून येणाऱ्या न्यायदंडापासून आपला जीव वाचवण्याकरता लोकांनी विश्वासाने यहोवाचा धावा केला पाहिजे. (रोम. १०:१३, १४; १ थेस्सलनी. १:८) यामध्ये, केवळ देवाचे नाव आणि त्याचे गुण माहीत असणे इतकेच पुरेसे नाही. लोकांना यहोवाबरोबर व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्यास, पूर्ण हृदयाने त्याच्यावर भरवसा ठेवण्यास आपण मदत केली पाहिजे. (नीति. ३:५, ६) शिकत असलेल्या गोष्टी ते जसजसे आपल्या जीवनात लागू करत जातील, कळकळीने प्रार्थना करण्याद्वारे देवाकडे वळतील व यहोवा त्यांना त्यांच्या जीवनात करत असलेले साहाय्य अनुभवत जातील तसतसा त्यांचा विश्वास वाढत जाईल आणि त्यांना त्याच्या आणखी जवळ येण्यास मदत होईल.—स्तो. ३४:८.
५ तेव्हा, आपण पूर्ण आवेशाने देवाच्या नावाची घोषणा करू या आणि लोकांना त्याच्यावर भरवसा ठेवण्यास, त्याचे भय बाळगण्यास मदत करू या. आपण आणखी पुष्कळ लोकांना यहोवाची ओळख करून देण्यास व “उद्धारक देव” म्हणून त्याची स्तुती करण्यास मदत करू शकू.—स्तोत्र २५:५.