यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्याने मिळणारे आशीर्वाद—भाग २
१ मागच्या महिन्यात, याच विषयांतर्गत आपण अशा चार मार्गांवर लक्ष दिले होते ज्यांद्वारे आपण आपल्या सेवाकार्यातून यहोवाच्या प्रीतीबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. (१ योहा. ४:९-११) या वेळी आपण आणखी पाच मार्गांची त्यांत भर घालूया. इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करण्याचा आपण मनस्वी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद लाभतात.
२ अनौपचारिक साक्षकार्य: धार्मिकतेच्या भुकेल्या व तान्हेल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांना सहायक ठरेल असे साहित्य देण्याचा हा एक परिणामकारक मार्ग आहे. यासाठी आपण सर्व प्रसंगी आणि आपल्याला भेटणाऱ्या सर्व लोकांना साक्ष देण्याकरता ‘वेळेचा सदुपयोग’ केला पाहिजे. (इफिस. ५:१६) या मार्गाने साक्ष देण्याकरता आपल्याला निश्चितच धैर्याची गरज आहे, पण जर आपल्याला देवाच्या प्रीतीची आणि लोकांच्या गरजांची जाणीव असेल तर आपण साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा करून घेऊ.—२ तीम. १:७, ८.
३ पूर्ण वेळ सेवा करणाऱ्या एका बांधवाने टॅक्सीत त्याच्यासोबत बसलेल्या एका प्रवाशासोबत संभाषण सुरू करण्यास पुढाकार घेतल्यामुळे त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. त्या मनुष्याने आस्था व्यक्त केली. त्याच्यासोबत पुनर्भेटी करण्यात आल्या आणि एक बायबल अभ्यास सुरू झाला. तो मनुष्य सत्यात आला, त्याने चांगली प्रगती केली आणि तो मंडळीत वडील म्हणून सेवा देखील करू लागला!
४ पत्र लिहिणे: शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे कदाचित आपल्याला घरोघर जाणे शक्य नसेल. अशा वेळी आपण पत्र लिहून आपल्या ओळखीच्या लोकांना, ज्यांच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशांना किंवा क्षेत्रात जे लोक घरी भेटले नाहीत अशांना थोडक्यात साक्ष देऊ शकतो. आपल्या हस्तपत्रिकांपैकी, त्या व्यक्तीला लक्षवेधक वाटेल अशा विषयावरील बायबल संदेश देणारी आणि काही प्रश्न असल्यास संपर्क साधण्याचे प्रोत्साहन देणारी एखादी उचित हस्तपत्रिका देखील आपण पत्रासोबत पाठवू शकतो. पत्र लिहिताना स्वतःचा किंवा राज्य सभागृहाचा पत्ता उपयोगात आणावा; कृपया शाखा दफ्तराचा पत्ता देऊ नये.
५ टेलिफोन साक्षकार्य: घरोघरच्या कार्यात न भेटणाऱ्या लोकांपर्यंत पोचण्याचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे. हे कार्य आपण सावधगिरी बाळगून, विचारपूर्वक, चातुर्याने आणि निपुणतेने केल्यास, आपल्याला फार चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००१ अंकातील, पृष्ठे ५-६ वर उत्तम परिणाम मिळण्याकरता काही व्यावहारिक सूचना देण्यात आल्या आहेत.
६ टेलिफोन साक्षकार्य करत असताना एका बहिणीने एका स्त्रीला विचारले, की तुमचे व तुमच्या कुटुंबाचे भविष्य कसे असेल याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का? त्या स्त्रीने या विषयावर आपण विचार केला असल्याचे सांगितले. तिने सांगितले की अतिशय दुःखी असल्यामुळे तिने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. बहिणीने व्यक्त केलेल्या मनस्वी कळकळीमुळे ही स्त्री तिला एका जवळच्या बाजारात भेटण्यास तयार झाली. या भेटीचा परिणाम असा झाला की त्या स्त्रीने आनंदाने बायबल अभ्यास स्वीकारला!
७ अनोळखी लोकांचे स्वागत करणे: आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करत असू तर आपल्या सभागृहांत येणाऱ्या नवीन लोकांकडे दुर्लक्ष न करता आपण त्यांचे स्वागत करू. (रोम. १५:७) आपल्या आध्यात्मिक कल्याणाविषयी प्रामाणिकपणे कळकळ बाळगणाऱ्यांमध्ये आपण आलो आहोत असे त्या नवीन व्यक्तीला जाणवले पाहिजे. आपली मनस्वी कळकळ आणि आपण मांडलेला वैयक्तिक बायबल अभ्यासाचा प्रस्ताव कदाचित त्या व्यक्तीला आपली मदत स्वीकारण्यास प्रेरित करेल.
८ आपले उत्तम आचरण: आपल्या उत्तम आचरणाने आपण सत्याला शोभा आणतो. (तीत २:१०) जगातले लोक आपल्याबद्दल म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांबद्दल प्रशंसोद्गार काढतात तेव्हा ते आपोआपच आपल्या देवाचे गौरव करतात. (१ पेत्र २:१२) हे देखील इतरांना जीवनाचा मार्ग स्वीकारण्यास सहायक ठरू शकते.
९ यहोवाने आपल्याप्रती दाखवलेल्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवण्याच्या या पाच मार्गांवर पुनर्विचार करून त्यांचे पालन करण्याचा आपण प्रयत्न करू या का? (१ योहा. ४:१६) असे केल्यास, तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील.