सन २००२ करता ईश्वरशासित सेवा प्रशाला
१ वाचाशक्ती किती अद्भुत आहे याविषयी सहसा कोणी फारसा विचार करत नाही. पण वास्तविक पाहता, बोलण्याची क्षमता ही यहोवाची एक देणगी आहे. या क्षमतेमुळेच आपण इतरांसोबत आपल्या विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच शक्तीमुळे आपण आपल्या देवाची स्तुती करू शकतो.—स्तो. २२:२२; १ करिंथ. १:४-७.
२ ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुरुष, स्त्रिया व मुले या सर्वांना यहोवाच्या नावाची घोषणा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (स्तो. १४८:१२, १३) सन २००२ करता असलेल्या प्रशाला कार्यक्रमात बायबलचे वैविध्यपूर्ण विषय आहेत ज्यांमुळे आपल्याला व्यक्तिगत जीवनात आणि आपल्या सेवाकार्यातही फायदा होऊ शकतो. प्रशालेकरता तयारी करून त्यात सहभाग घेतल्यामुळे आपण आपल्या ज्ञानात आणि देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने आपल्या कौशल्यात भर घालू शकतो.—स्तो. ४५:१.
३ बायबल दररोज वाचा: आपण नेहमी एक बायबल जवळ बाळगल्यास, रिकामा वेळ मिळताच आपण त्याचा फायदा घेऊन बायबल वाचू शकतो. आपल्यापैकी बहुतेक जणांना दिवसातून काही मिनिटे अशी मिळतात ज्यांचा उपयोग आपण यासाठी करू शकतो. दररोज निदान एक पान वाचले तरीसुद्धा आपल्याला कितीतरी फायदा होऊ शकतो; प्रशालेच्या आराखड्यात नेमलेला बायबल वाचनाचा दर आठवड्याचा भाग पूर्ण करण्यासाठी दररोज केवळ एक पान वाचणे आवश्यक आहे!—स्तो. १:१-३.
४ बायबल चांगल्याप्रकारे वाचण्याची क्षमता विकसित केल्यास आपण ऐकणाऱ्यांच्या हृदयापर्यंत पोचू शकतो आणि त्यांना यहोवाची स्तुती करण्यासाठी प्रेरित करू शकतो. प्रशालेतील नेमणूक क्र. २ हाताळणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमलेला वाचनाचा भाग वारंवार मोठ्याने वाचला पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षक प्रशंसा करतील आणि अधिक चांगले वाचण्याकरता काही सूचना देतील.
५ व्यावहारिक महत्त्व स्पष्ट करा: नेमणूक क्र. ३ बायबल कथांचं माझं पुस्तक आणि क्र. ४ सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकावर आधारित आहे. नवीन लोकांना सबंध बायबलशी व येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी परिचित होण्यासाठी हे साहित्य निश्चितच सहायक ठरेल. शिवाय, विशिष्ट तत्त्वांचा आपल्या प्रचार कार्यात कसा उपयोग करता येईल हे दाखवण्याकरता विद्यार्थ्यांनी शक्य तोवर व्यावहारिक दृश्यांचा उपयोग करावा. विद्यार्थी कसे शिकवतात आणि वापरलेल्या शास्त्रवचनांचे व्यावहारिक महत्त्व ते कशाप्रकारे स्पष्ट करतात याकडे प्रशाला पर्यवेक्षकांनी विशेष लक्ष द्यावे.
६ ईश्वरशासित सेवा प्रशालेमुळे सर्वांना, देवाने दिलेल्या वाचाशक्तीचा उपयोग सुवार्तेची घोषणा करत राहण्यासाठी आणि आपला महान देव, यहोवा याची स्तुती करत राहण्यासाठी मदत होईल ही आशा करतो!—स्तो. ३४:१; इफिस. ६:१९.