यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्याने मिळणारे आशीर्वाद—भाग १
१ “पहिल्याने [यहोवाने] आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो,” असे प्रेषित योहानाने लिहिले. (१ योहा. ४:१९) आतापर्यंत यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आपण त्याला मनापासून कृतज्ञता दाखवण्यास प्रवृत्त होतो. देवाचे नाव आणि त्याचे राज्य याची आज्ञाधारकपणे साक्ष देण्याद्वारे येशूने आपल्यापुढे एक उत्तम उदाहरण मांडले. (योहा. १४:३१) यहोवाचे प्रेम आणि त्यामुळे मिळणारे आशीर्वाद यांबद्दल आपण कोणकोणत्या मार्गांनी कृतज्ञता दाखवू शकतो याचा आपण आता विचार करू या.
२ घरोघरी जाणे: राज्य प्रचाराचे कार्य कसे करायचे हे येशूने आपल्या शिष्यांना दाखवून दिले. त्याच्या मार्गदर्शनांवरून हे स्पष्ट होते, की ते घरोघरी सुवार्तेचा प्रचार करीत गेले. (लूक ९:१-६; १०:१-७) देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम असेल तर आपण, लोकांची उदासीन मनोवृत्ती असली, ते आपला विरोध करत असले तरीसुद्धा घरोघरी जात राहू. असे केल्याने खरे तर आपलाच फायदा होतो; कारण आपला विश्वास मजबूत होतो, आपली खात्री वाढते आणि आपली आशा तेजोमय होते.
३ देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करत असताना आपण, सत्यासाठी भुकेलेल्या व तान्हेलेल्या अनेक लोकांना भेटलो आहोत. (प्रकटी. १४:६) काही घरमालकांनी असे म्हटल्याची उदाहरणे आहेत, की ते देवाला मदतीसाठी प्रार्थना करताना साक्षीदार त्यांच्या घरी आले. कॅरिबियन बेटावर, दोन साक्षीदार बहिणी आणि एक लहान मूल घरोघरचे कार्य करीत होते. या बहिणींनी क्षेत्र सेवा थांबवण्याचा विचार केला व त्या घरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा ते मूल स्वतःहून एका घराकडे गेले आणि त्याने दार वाजवले. एका तरुण स्त्रीने दार उघडले. आपल्या दोन बहिणींनी हे पाहिल्यावर त्या तिच्याकडे गेल्या व तिच्याशी बोलल्या. तिने त्यांना घरात बोलावले व त्यानंतर म्हणाली, की तिने नुकतीच देवाला प्रार्थना केली होती, की हे देवा मला बायबल शिकवण्यासाठी कोणा साक्षीदाराला माझ्याकडे पाठव!
४ रस्त्यांवरील साक्षकार्य करणे: काही भागात लोकांना त्यांच्या घरी भेटणे मुश्कीलीचे असल्यामुळे रस्त्यावरील साक्षकार्य, हा लोकांना साक्ष देण्याचा प्रभावी मार्ग आहे. शिवाय, पुष्कळ लोक, कडक सुरक्षा असलेल्या सोसायटींमध्ये राहत असल्यामुळे अशा ठिकाणी आपण घरोघरी जाऊ शकत नाही. परंतु, यहोवाच्या प्रेमाबद्दल आपण दाखवत असलेली कृतज्ञता आपल्याला लोकांना राज्य संदेश सांगण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास तसेच रस्त्यावरील साक्षकार्य करण्यास प्रवृत्त करते.—नीति. १:२०, २१.
५ पुनर्भेटी करणे: “आध्यात्मिक गरजांची जाणीव” असलेल्या लोकांना आपण शोधत असल्यामुळे त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करतो. (मत्त. ५:३, NW) यासाठी, सत्याचे बीज आपण जेथे जेथे पेरतो तेथे तेथे पाणी घालायला पुन्हा गेले पाहिजे. (१ करिंथ. ३:६-८) ऑस्ट्रेलियातील एका बहिणीने एका अशा स्त्रीला पत्रिका दिली, जिने सुरवातीला इतकी आस्था दाखवली नाही. तरीपण, आपल्या बहिणीने त्या स्त्रीला तिच्या घरी जाऊन तिला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला. आपली बहीण तिला भेटली तेव्हा तिला समजले, की या स्त्रीने त्यांच्या भेटीनंतर एक खूप महागडे बायबल विकत आणले होते. आपल्या बहिणीने तिच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू केला!
६ बायबल अभ्यास चालवणे: हा आपल्या सेवेचा सर्वात आनंददायक व प्रतिफलदायी पैलू असू शकतो. लोकांना यहोवाविषयी शिकवून, यहोवाला संतोषविण्याकरता ते आपल्या जीवनात करत असलेले बदल आणि मग बाप्तिस्मा घेऊन देवाला ते आपले जीवन समर्पित करताना पाहणे हा एक आशीर्वादच नव्हे का?—१ थेस्सलनी. २:२०; ३ योहा. ४.
७ पुढील अंकात आपण, यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्यामुळे आणखी कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला आशीर्वाद मिळतात ते पाहणार आहोत.