प्रश्न पेटी
◼ आपण प्रकाशने घेतो तेव्हा दानपेटीत दान टाकतो आणि मग क्षेत्र सेवेत मिळालेले दानसुद्धा आपण संस्थेच्या जगभरातील कार्यासाठी असलेल्या दानपेटीत टाकतो; याचा अर्थ आपण प्रकाशनांसाठी दोनदा दान टाकत नाही का?
नाही. संस्थेच्या जगभरातील कार्यासाठी असलेल्या दानपेटीत आपण जे दान टाकतो ते केवळ प्रकाशनांसाठीच नसते. प्रचारकांना व क्षेत्र सेवेत भेटणाऱ्या प्रांजळ मनाच्या आस्थेवाईक लोकांनाही किंमत न घेता प्रकाशने दिली जातात. प्रचारक देत असलेल्या दानांचा उपयोग, शाखा दफ्तरे, बेथेलगृहे, सेवा सेवक प्रशाला, प्रवासी पर्यवेक्षक, साहित्य वितरण केंद्रे चालवण्यासाठी आणि येशूने त्याच्या शिष्यांना दिलेली नेमणूक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक सेवांसाठी केला जातो. साहित्यांचे प्रकाशन हा यांतील एक लहानसा भाग आहे.
यास्तव, क्षेत्रातल्या आस्थेवाईक लोकांकडून दान मिळते तेव्हा आपण, हे दान केवळ “प्रकाशनांसाठीच” आहे असे म्हणू नये. आपण त्यांना समजावून सांगावे, की प्रकाशने वाचण्याची खरी आवड बाळगणाऱ्यांना ही प्रकाशने त्यांच्याकडून काही किंमत न घेता दिली जातात. म्हणून असे लोक देत असलेले दान संपूर्ण जगभरात चाललेल्या कार्याला लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगात आणले जाते. प्रकाशकांनी दिलेल्या दानांच्या बाबतीतही हेच आहे.