“देवाच्या वचनाचे शिक्षक” प्रांतीय अधिवेशनात शिकलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करत आहात का?
१ मागील प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना याची जाणीव झाली की यहोवाच्या लोकांचा, त्याच्या वचनाचे शिक्षक होण्याची आज्ञा पूर्ण करण्याचा दृढसंकल्प आहे. (मत्त. २८:१९, २०) अधिवेशनावरून परतल्यावर कोणत्या खास मार्गदर्शक सुचनांचे आपल्या जीवनात व क्षेत्र सेवेत पालन करण्याचे तुम्ही ठरवले होते?
२ देवप्रेरित वचने शिकवण्याकरता उपयोगी: पहिल्या दिवसाचा विषय, २ तीमथ्य ३:१६ याकडे लक्ष वेधणारा होता. त्यादिवशीच्या मुख्य भाषणातून स्पष्ट करण्यात आले की “देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे सुसज्ज” असण्याकरता आपण देवाच्या वचनाची मनापासून कदर केली पाहिजे, कोणत्याही मानवी विचारांपेक्षा किंवा रितीरिवाजापेक्षा आपण त्याला मान दिला पाहिजे आणि विश्वासूपणे त्याचा उपयोग केला पाहिजे. तसेच आपल्या सेवाकार्यात पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता दररोज प्रार्थना केली पाहिजे आणि आत्म्याचे प्रमुख फळ, प्रीती ही विकसित करण्याचा मनस्वी प्रयत्न केला पाहिजे. यासोबतच आपल्याला सेवक या नात्याने प्रशिक्षित करण्यासाठी यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेकडून मंडळीच्या सर्व सभांच्या माध्यमाने मिळणारे मार्गदर्शन देखील आपण स्वीकारले पाहिजे.
३ पहिल्या दिवसाची परिचर्चा, “इतरांना शिकवताना स्वतः शिकणे” यात समजवण्यात आले की आपण कोणकोणत्या बाबतीत आदर्श असले पाहिजे: (१) ख्रिस्ती नैतिकतेसंबंधी सर्व बाबतीत देवाच्या नियमांना जडून राहणे, (२) मेहनतीने अभ्यास करण्याची सवय कायम ठेवणे आणि (३) दियाबल ज्यांचा गैरफायदा घेऊ शकतो अशा सर्व मनोवृत्तींचा व हृदय व मनाच्या स्थितींचा त्याग करणे. यानंतर आपण अश्लील साहित्याच्या जगिक रोगापासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याच्या काही व्यावहारिक मार्गांविषयी शिकलो. लैंगिक दृश्यांकडे क्षणभरही नजर खिळवण्याचे टाळण्याद्वारे मुलांकरता उत्तम आदर्श मांडण्याचे व आपली मुले इंटरनेट किंवा टीव्हीवर काय पाहतात याकडे जातीने लक्ष देण्याचे आईवडिलांना प्रोत्साहन देण्यात आले. शुक्रवारच्या कार्यक्रमातील कोणकोणत्या मुद्द्यांचे पालन करण्यास तुम्ही सुरवात केली आहे?
४ त्या दिवशीच्या शेवटल्या भाषणाने, यहोवाच्या प्रकाशाची कदर करण्याचा, त्याच्या विश्वासू अभिषिक्त वर्गाला साथ देण्याचा आणि यहोवाच्या लोकांमधील शांतीला हातभार लावण्याचा आपला निर्धार अधिक पक्का केला. यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश २ हे नवीनच प्रकाशित झालेले पुस्तक तुम्ही वाचून काढले का?
५ इतरांना शिकवण्याकरता आवश्यक पात्रता मिळवणे: दुसऱ्या दिवसाचे मुख्य वचन २ तीमथ्य २:२ हे होते. सकाळी झालेली परिचर्चा ऐकताना, आपण कशाप्रकारे (१) सुयोग्य जनांना शोधून काढावे, (२) त्यांच्या आस्थेला खतपाणी घालावे आणि (३) ख्रिस्ताने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळण्यास शिकवावे यासंबंधी देण्यात आलेल्या सुचनांकडे तुम्ही लक्ष दिले का? या शिकलेल्या गोष्टींचे, उदाहरणार्थ घरमालकांना शास्त्रवचनांतून निदान एक मुद्दा दाखवून पुढच्या भेटीचा पाया घालण्यासंबंधी दिलेल्या सुचनांचे तुम्ही पालन करत आहात का?
६ दुपारच्या कार्यक्रमात महान शिक्षक येशू याचे अनुकरण करणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर देण्यात आला. तुम्ही कोणकोणत्या प्रकारे त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करत आहात? त्या दिवशीच्या दुसऱ्या परिचर्चेनुसार तुमच्या मते “ईश्वरशासित शिक्षणापासून अधिक फायदा मिळवणे” कसे शक्य आहे? वैयक्तिक अभ्यास करताना आणि मंडळीतल्या सभांमध्ये लक्ष एकाग्र करण्याचा अवधी वाढवण्याकरता देण्यात आलेल्या कोणकोणत्या सहायक सुचनांचे तुम्ही पालन केले आहे?
७ ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घ्या या नवीन प्रकाशनामुळे आपल्याला उत्तम आणि अधिक निपुण वक्ते आणि देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याकरता मदत मिळेल यात शंका नाही. बायबल काळातील देवाच्या विश्वासू सेवकांच्या खास वक्तृत्व वैशिष्ट्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल. या नवीन मार्गदर्शक पुस्तकातील प्रत्येक पाठात बॉक्स आहेत ज्यात आपण काय करावे, ते करणे का महत्त्वाचे आहे आणि ते कसे करता येईल हे संक्षिप्त रूपात सांगितले आहे. सोबत सरावासाठी काही अभ्यास देखील देण्यात आले आहेत. बहिणींना नेमण्यात आलेले भाग हाताळताना त्यांना वापरण्याजोगी २९ संभाव्य दृश्ये सुचवण्यात आली आहेत. कालांतराने, प्रशालेत काही बदल केले जातील. अर्थात याविषयी आधी घोषणा केली जाईल. दर आठवड्याच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेतून पुरेपूर फायदा घेण्याकरता तुम्ही अभ्यास व तयारीची नियमित वेळ ठरवली आहे का?
८ काळ लक्षात घेऊन शिक्षक व्हा: इब्री लोकांस ५:१२ या वचनाने अधिवेशनाच्या शेवटल्या सबंध दिवसाच्या कार्यक्रमाकरता एक पार्श्वभूमी तयार केली. “मलाखीची भविष्यवाणी आपल्याला यहोवाच्या दिवसाकरता तयार करते” या सकाळच्या परिसंवादात, आपल्याजवळ असलेले जे उत्तम ते यहोवाला देण्याचे आणि यहोवाच्या महान व भयप्रेरक दिवसातून आपला बचाव व्हावा म्हणून सर्व प्रकारच्या फसवणुकीचा द्वेष करण्याचे आपल्याला प्रोत्साहन देण्यात आले. “यहोवाच्या अधिकाराला मान द्या” या नाटकाने अतिशय प्रभावशाली रितीने हे दाखवले की प्राचीन काळातील कोरह आणि त्याच्या साथीदारांचा गर्विष्ठपणा, महत्त्वाकांक्षी वृत्ती, मत्सर आणि अयोग्य निष्ठेमुळे त्यांनी खुद्द यहोवाच्या विरोधात बंड केले. नाटकाचे स्पष्टीकरण करणाऱ्या यानंतरच्या भाषणात या आधुनिक काळात, कुटुंबात व मंडळीत देवाने नेमलेल्या अधिकाराला अधीन राहणे किती गरजेचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. “सर्व राष्ट्रांना सत्य कोण शिकवत आहेत?” या जाहीर भाषणात, हे कार्य, बायबलचे सत्य शिकवण्याचा केवळ दावा करणारे ख्रिस्ती धर्मजगत नव्हे, तर यहोवाचे साक्षीदार करत आहेत हे सिद्ध करण्याकरता पुरावे देण्यात आले.
९ यहोवा आपल्याला त्याच्या वचनाचे अधिक परिणामकारक शिक्षक होण्याकरता प्रशिक्षित करत आहे यात शंकाच नाही. आपण शिकलेल्या गोष्टींचे पालन करण्याद्वारे ‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवू; त्यातच टिकून राहू; कारण असे केल्याने आपण स्वतःचे व आपले ऐकणाऱ्यांचेहि तारण साधू.’—१ तीम. ४:१६.