तुम्हाला ते चुकवावेसे वाटणार नाही!
ते म्हणजे काय? लवकरच होणार असलेले “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” हे यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन! बहुतेक ठिकाणी, अधिवेशनाची सुरवात शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता संगीताच्या कार्यक्रमाने होईल. “शांतीच्या आवेशी घोषकांकडून ऐकणे” या भागात, विश्वास बळकट करणाऱ्या मुलाखती ऐकल्यावर, “देव आपल्याकडून काय अपेक्षितो?” या प्रोत्साहनदायक भाषणाचा तुम्ही आस्वाद घ्याल.
“ईश्वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने आपली भूमिका” हे उत्तेजनात्मक प्रमुख भाषण शुक्रवार दुपारचे वैशिष्ट्य असेल. “इतरांना देवाच्या अपेक्षा आत्मसात करण्यास मदत करणे” हा पुढील कार्यक्रम नवोदितांना शिक्षण देताना उपयोगी पडणारे सल्ले प्रदान करील. मग, “मनोरंजनाच्या गूढ पाशांबद्दल सावध असा” हा समयोचित परिसंवाद असेल. शुक्रवारचा कार्यक्रम, “दियाबलाचा विरोध करा—कोणतीही प्रतिस्पर्धा सहन करू नका” व “देव वचनाची सचोटी निष्ठेने उंचावून धरणे” या भाषणांनी समाप्त होईल.
शनिवार सकाळच्या कार्यक्रमात, “शांतीची सुवार्ता आणणारे संदेशवाहक” या तीन भागांच्या परिसंवादात शिष्य बनविण्याच्या कार्याच्या महत्त्वावर जोर देण्यात येईल. “यहोवाच्या संघटनेत संतोषाने देणे” तसेच “समर्पण व बाप्तिस्मा यांकरवी जीवन आणि शांती” या भाषणांसह कार्यक्रमाची समाप्ती होईल व त्यानंतर नवीन शिष्यांना बाप्तिस्मा घेण्याची संधी असेल.
‘आज विभाजनाच्या कार्यात ख्रिस्ती भाग घेत आहेत का?’ आणि ‘देहान्त शिक्षेविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?’ अशा प्रश्नांची उत्तरे, “सर्व बाबींवरील यहोवाची मते विचारात घ्या” या शनिवार दुपारच्या सादरतेत दिली जातील. “शांतीचा देव तुमची काळजी घेतो” या दोन भागांच्या सुखकारक परिसंवादाचा व खासकरून “कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांती अनुसरा” या समाप्तीच्या भाषणाचा देखील तुम्ही आनंद लुटाल.
रविवार सकाळच्या कार्यक्रमात “योग्य प्रकारच्या संदेशवाहकांना ओळखणे” या तीन भागांच्या परिसंवादाचा आणि “देवाचे वचन ऐका आणि त्याचे पालन करा” या भाषणाचा समावेश असेल. सकाळच्या कार्यक्रमाची समाप्ती, खास वेशभूषा परिधान करून केलेल्या नाटकाने होईल, जे बायबलमधील शास्ता गिद्दोनाच्या अहवालातील मौल्यवान धडे दाखवून देईल.
अधिवेशनातील रविवार दुपारचा शेवटचा कार्यक्रम “अखेरीस खरी शांती!—कोणत्या उगमाकडून?” हे जाहीर भाषण प्रस्तुत करील. शेवटी, “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने पुढे जाणे” या प्रोत्साहनदायक भाषणासह अधिवेशनाचा समारोप होईल.
उपस्थित राहण्याकरता आताच योजना करा. तुम्ही राहता त्या ठिकाणापासून सर्वात जवळचे ठिकाण शोधण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहाशी संपर्क साधा अथवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा. जून ८, सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाचा अंक भारतातील सर्व अधिवेशनाच्या ठिकाणांची यादी देईल.