प्रचार कार्यास ते अडखळण आहे का?
१ आज बहुतेक लोक व्यस्त आहेत. यहोवाचे साक्षीदार, देवाच्या वचनाचा अभ्यास, मंडळीच्या सभा, क्षेत्र सेवा, या कार्यांमुळे इतर लोकांपेक्षा अधिक व्यस्त आहेत. याशिवाय, आपल्याला नोकरी, घरकाम, शाळा आणि इतर जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात ज्यात बराच वेळ खर्च होतो. यामुळे कुटुंब प्रमुखांची जणू तारेवरची कसरत चालू असते.
२ विविध ठिकाणी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कुटुंब प्रमुखांना आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे ओढण्याकरता पुष्कळ तास काम करावे लागते शिवाय काबाडकष्ट देखील करावे लागतात. त्यांचा बहुतेक वेळ आणि त्यांची शक्ती नोकरीत खर्च होते तेव्हा, प्रचार कार्यासाठी त्यांच्याजवळ फार कमी वेळ राहतो. आपल्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य देण्याचे त्यांचे कर्तव्य असल्यामुळे, काहींना असे वाटेल की त्यांना क्षेत्र सेवेत मर्यादित वेळच खर्च करता येतो. (१ तीम. ५:८) आज, जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते हे कबूल आहे. परंतु सुवार्तेच्या प्रचार कार्यात नोकरी हे अडखळण होता कामा नये. (मार्क १३:१०) यास्तव, आपण आपल्या परिस्थितीचे प्रामाणिकपणे परीक्षण करून पाहिले पाहिजे.
३ जगाचे दृश्य सतत बदलत असल्यामुळे, एखाद्या कुटुंब प्रमुखाला, अचानक ओढावणाऱ्या संकटात कामी येऊ शकेल म्हणून पैसा साठवण्याकरता जास्त वेळ काम करावे असे वाटू शकते. (१ करिं. ७:३१) परंतु, जास्त वेळ काम केल्यामुळे घरात भौतिक वस्तू येतील किंवा कुटुंबाला मौजमजा व मनोरंजन करायला मिळेल हे खरे असले तरी, आध्यात्मिक गोष्टींची आहुती देऊन किंवा मंडळीच्या सभा चुकवून कोणतेही कुटुंब खरोखरच आनंदी किंवा समाधानी होऊ शकेल का? आपली आध्यात्मिकता ज्यामुळे धोक्यात येऊ शकते अशी कोणतीही गोष्ट आपण निश्चितच टाळली पाहिजे. “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा” आणि “देवविषयक बाबतीत धनवान” व्हा या येशूने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्यात सुज्ञता आहे.—मत्त. ६:१९-२१; लूक १२:१५-२१.
४ राज्याला प्रथम स्थान द्या: इतर सर्व गोष्टींपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्यास येशूने आपल्या अनुयायांना शिकवले. “ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका.” त्याने असे का म्हटले? तो पुढे याचे कारण सांगतो: “तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” येशूच्या या बोलण्यावर आपला अगदी पूर्ण विश्वास असेल तरच, त्याने पुढे जे म्हटले ते करण्यास आपल्या आड काहीही येणार नाही. तो म्हणाला: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व [आवश्यक असलेल्या भौतिक] गोष्टी तुम्हाला मिळतील.” देव त्याची काळजी घेईल! (मत्त. ६:३१-३३) त्यामुळे, उदरनिर्वाहाविषयी अवास्तव चिंता करत बसण्याची किंवा लवकरच ज्याचा नाश केला जाणार आहे अशा जगात आरामदायक जीवन मिळवण्यासाठी खटाटोप करण्याची ही वेळ निश्चितच नाही.—१ पेत्र ५:७; १ योहा. २:१५-१७.
५ नोकरी करण्याचा मुख्य हेतू, आपल्या भौतिक गरजा भागवणे हाच असतो. पण आपल्याला असे किती लागते? प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” मग आपण याहूनही अधिक मिळवण्याच्या मागे लागलो आहोत का? असे असेल तर, पौलाने आपल्याला ज्याविषयी ताकीद दिली त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्याने म्हटले: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीम. ६:८, ९; मत्त. ६:२४; लूक १४:३३) भौतिक गोष्टींबद्दलची हाव आपल्यासमोर एक अडखळण बनत आहे हे आपण कसे सांगू शकतो?
६ नोकरीमुळे आपण क्षेत्र सेवेत फार कमी भाग घेत असलो किंवा सुवार्तेसाठी त्याग करण्याची आवश्यकता आहे ही गोष्ट आपण पाहत नसलो तर, आपण ज्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत त्यात आपल्याला काही फेरबदल करण्याची आवश्यकता असेल. (इब्री १३:१५, १६) बेताच्या जीवनशैलीमुळे प्रचार कार्यातील हे अडखळण दूर होईल. आपला वेळ आणि आपली शक्ती खर्च करण्याच्या बाबतीत, राज्याला नेहमी प्रथम स्थान दिले पाहिजे.
७ व्यर्थ जाणार नाहीत असे श्रम: “प्रभूमध्ये [आपले] श्रम व्यर्थ नाहीत” हे जाणून असल्यामुळे “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” हे पौलाचे शब्द आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात. (१ करिं. १५:५८) राज्याचा प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य हे ‘प्रभूच्या कामातील’ सर्वात प्रमुख कार्य आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) होता होईल तितका भाग घेण्यास शक्य व्हावे म्हणून आपण दर आठवडी क्षेत्र सेवेत जाण्याची वेळ निश्चित केली पाहिजे आणि त्या वेळेत आपण दुसरे कोणतेही काम करणार नाही हा प्रयत्न केला पाहिजे. (इफिस. ५:१५-१७) अशाप्रकारे, नोकरी किंवा इतर कोणतीही गोष्ट आपल्या सेवेत अडखळण बनणार नाही.
८ इतरांना बायबलमधील सत्य सांगण्यासाठी आपण तयारी दर्शवतो तेव्हा, देण्याने मिळणारा उत्कृष्ट प्रतीचा आनंद आपण अनुभवू शकतो. (प्रे. कृत्ये २०:३५) राज्य प्रचार कार्यात स्वतःला व्यस्त ठेवण्याद्वारे आपण भविष्याविषयी भरवसा बाळगू शकतो, कारण ‘आपले कार्य व देवावर आपण दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.’—इब्री ६:१०.