यशयाच्या भविष्यवाणीचा अभ्यास करण्यासाठी तयार व्हा!
१ “यहोवा देव न्यायाची पूर्ती करील तेव्हा सैतानाच्या जगाला अस्तित्वात राहण्याची तो एक दिवसही जास्त मुभा देणार नाही . . . याची विश्वासू उपासक खात्री बाळगतात.” किती प्रोत्साहनदायक विधान! कोणत्या पुस्तकातले हे विधान आहे? यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश १ (इंग्रजी), या पुस्तकातले हे विधान आहे. पण यशयाच्या भविष्यवाणीच्या आधारावर आपण हा उत्तेजनात्मक निष्कर्ष काढू शकतो का? होय, काढू शकतो. बायबलमधील यशया नावाच्या पुस्तकात तारणाचा विषय अगदी ठामपणे व स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. (यश. २५:९) म्हणूनच, मंडळीच्या पुस्तक अभ्यासात देवाच्या वचनातील या भागाचा अभ्यास केल्याने आपल्याला खूप उत्तेजन मिळू शकते. हे उत्तेजन प्राप्त करण्यासाठी आपण दर आठवडी पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहणार का? पण आपण उपस्थित का राहिले पाहिजे?
२ यशया ३०:२० [NW] येथे यहोवाला “महान शिक्षक” असे म्हटले आहे. यहोवा बायबलच्या आधारे आपल्याबरोबर बोलतो तेव्हा आपण त्याच्या बोलण्याकडे आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडून’ मिळणाऱ्या बायबल आधारित प्रकाशनांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. (मत्त. २४:४५; यश. ४८:१७, १८) यशयाची भविष्यवाणी १ या पुस्तकाच्या बाबतीतही हे खरे आहे. या पुस्तकाच्या अभ्यासातून तुम्ही पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकता?
३ टिपणी करण्यासाठी तयारी करा: पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी दर आठवडी भरपूर वेळ काढा. नेमलेल्या भागातील प्रत्येक परिच्छेद वाचा. प्रत्येक छापील प्रश्नावर विचार करा. परिच्छेदातील उत्तरे अधोरेखीत करा. यशयाच्या पुस्तकातून उद्धृत केलेली वचने ठळक अक्षरांमध्ये छापण्यात आली आहेत. ती काळजीपूर्वक वाचा. परिच्छेदात उल्लेख करण्यात आलेली इतर वचने बायबलमधून पाहा आणि परिच्छेदाशी त्यांचा काय संबंध आहे ते पाहा. तुम्ही जे काही शिकता त्यावर मनन करा. आणि मग तुम्ही केलेल्या तयारीचा फायदा तुमच्या टिपणीद्वारे पुस्तक अभ्यास गटातील इतरांनाही होऊ द्या.
४ पुस्तक अभ्यास संचालकाने उपस्थित असलेल्या सर्वांना बायबलचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्यास व पुस्तकातील माहितीचे व्यावहारिक मूल्य समजण्यास मदत केली पाहिजे. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर विचारले जाते तेव्हा पहिल्यांदा त्याचे थेट व साध्या शब्दांत उत्तर द्या. जर त्या प्रश्नाचे उत्तर आधीच कोणीतरी थेट दिले असेल तर तुम्ही चर्चा होत असलेल्या मुद्यावर आणखी सविस्तरपणे बोलू शकता. एखादे प्रमुख वचन त्या विषयाशी कसे संबंधित आहे ते कदाचित तुम्ही सांगू शकता. स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि प्रश्नोत्तराच्या चर्चेत भाग घेतल्याने मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या.
५ यशयाच्या पुस्तकातील बहुमूल्य संदेशाचे आपण सर्व जण मिळून परीक्षण करू या. यामुळे यहोवाकडील तारणाच्या दिवसाची आनंदाने वाट पाहत राहण्यास आपल्याला उत्तेजन मिळेल!—यश. ३०:१८.