तुमची काय सवय आहे?
१ ख्रिस्ती सभा यहोवाच्या उपासनेतील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहेत. म्हणूनच प्रेषित पौल अगदी उचितपणे आपल्याला आर्जवतो, की “कित्येकांच्या चालीप्रमाणे” आपण एकत्र मिळणे सोडू नये. (तिरपे वळण आमचे).—इब्री. १०:२५.
२ ख्रिस्ती मंडळीतील बंधूभगिनींबरोबर संगती करण्याबाबत तुमचे देखील पौलाप्रमाणेच विचार आहेत का? याबाबतीत तुमची काय सवय आहे? तुम्ही सर्व सभांना, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला देखील नियमितरीत्या उपस्थित राहता का? की, सभा चुकवण्याची तुम्हाला सवय लागली आहे? तुमच्या जीवनात सभांना कोणते स्थान आहे? इतरांना सभेला नियमित उपस्थित राहण्याकरता तुम्ही उत्तेजन देता का? स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना तुम्ही सभांना नियमित उपस्थित राहण्याचे उत्तेजन देत आहात का?
३ आपला दररोजचा परिपाठ काहीही असला तरी, पौलाचा सल्ला आपण कमी लेखू नये. कधीकधी आपल्याला, आजारी पडल्यामुळे किंवा आपल्या हाताबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे एखादी सभा चुकवावी लागेल, हे अगदी समजण्याजोगे आहे. परंतु सभा चुकवण्याची आपल्याला सवय लागता कामा नये. (रोम. २:२१) आपल्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यातील बहुतेक जबाबदाऱ्या ईश्वरशासित असल्या तरी, अधिक महत्त्वाच्या कार्यांकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये. (फिलिप्पै. १:१०) सभा या ख्रिश्चनांसाठी अधिक महत्त्वाच्या असलेल्या कार्यांमध्ये मोडतात. आपल्या आध्यात्मिक आरोग्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत.
एकमेकांना उत्तेजन द्या
४ पौलाने रोमकरांना पत्र लिहिले तेव्हा त्याने म्हटले की त्यांना पाहण्याची त्याला उत्कंठा लागली होती. का? त्यांनी “स्थिर व्हावे म्हणून” तो त्यांना काही आध्यात्मिक वरदान देऊ इच्छित होता. (रोम. १:११) आध्यात्मिक बंधूभगिनींबरोबरचा सहवास महत्त्वाचा होता, नव्हे आवश्यक होता असे त्याला वाटले. कारण पुढे तो म्हणाला, की: “परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, . . . उत्तेजन प्राप्त व्हावे.” किंवा, NW रेफरन्स बायबलच्या तळटीपेत म्हटल्याप्रमाणे: “सगळ्यांना एकमेकांकडून उत्तेजन मिळावे.” (रोम. १:१२) पौल एक प्रेषित होता. तरी, ख्रिश्चनांच्या सहवासाद्वारे आपल्याला उत्तेजन मिळवण्याची आवश्यकता आहे, हे त्याने ओळखले होते.
५ तसेच, आपल्या सभांमध्ये आपण एकमेकांना प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. फक्त एका प्रेमळ स्मितहास्याने व प्रेमळ अभिवादनाने इतरांवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. उभारणीकारक उत्तरे, कार्यक्रमात चांगली तयारी केलेले भाग, इतरांची आध्यात्मिक प्रगती पाहिल्याने आणि सभेमध्ये आपल्या बांधवांबरोबरचा सहवास देखील अतिशय प्रोत्साहनदायक असू शकतो. दिवसाच्या शेवटी आपण खूप थकलेलो असलो तरी, सभांना उपस्थित राहिल्यावर आपल्याला सहसा बरे वाटते. ख्रिस्ती मैत्री आणि आपल्या बांधवांचे प्रेम आपल्याला “नेमून दिलेल्या धावेवरून धीराने” धावण्यास प्रोत्साहन देतील. (इब्री. १२:१) देवाचे वचन लक्षपूर्वक ऐकल्याने आपण न डगमगता आपल्या आशेचे जाहीर प्रकटन करण्यास तयार असू. होय, सभांना उपस्थित राहिल्याने आपल्याला बरेच आशीर्वाद मिळू शकतात.
६ पहिल्यापेक्षा आता आपल्याला, आपला विश्वास दृढ ठेवण्याची व इतरांना प्रीती व सत्कर्मे करीत राहण्याचे उत्तेजन देण्याची गरज आहे. एकमेकांबरोबर एकत्र न येण्याची सवय आपण स्वतःला लावू इच्छित नाही. इतरांना तसेच स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन देण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे व त्यांना मदतही केली पाहिजे. याद्वारे आपण इतरांबद्दल आपल्याला असलेले प्रेम आणि ख्रिस्ती सभांबद्दल आपल्याला असलेली कृतज्ञता व्यक्त करतो.