चांगले शेजारी बनून साक्ष द्या
१ “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर,” असे येशूने म्हटले होते. (मत्त. २२:३९) तुम्ही सहविश्वासू बांधवांचे ‘बरे करत’ असाल यात शंका नाही; परंतु, शेजारीपाजारी राहणाऱ्या लोकांबद्दलही तुम्ही प्रेम दाखवू शकता का? (गलती. ६:१०) कोणकोणत्या मार्गांनी तुम्ही असे करू शकता?
२ स्वतःची ओळख करून देण्याद्वारे: तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे तुमच्या शेजाऱ्यांना माहीत आहे का? नसल्यास, क्षेत्र सेवेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. तुम्ही कल्पना देखील केली नसेल इतके चांगले प्रतिफळ तुम्हाला मिळू शकते. किंवा तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही त्यांना अनौपचारीक साक्ष देऊ शकता. तुम्ही बाहेर जाता तेव्हा कदाचित तुम्हाला ते त्यांच्या बागेत काही काम करत असल्याचे किंवा रस्त्यावर आरामात फिरत असल्याचे दिसतील. त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करा. तुमच्या विश्वासांबद्दल, राज्य सभागृहाच्या ठिकाणाबद्दल, तेथे काय होत असते आणि तुमच्या भागात आणखी कोणकोण या सभांना येतात यांविषयी त्यांना सांगायचा प्रयत्न करा. त्यांना सभांना येण्याचे आमंत्रण द्या. तुम्ही ओळखत असलेल्या सर्वांना सुवार्तेची साक्ष देण्याचा निश्चय करा!—प्रे. कृत्ये १०:४२; २८:२३.
३ तुमच्या चांगल्या वर्तनाद्वारे: तुमच्या मैत्रीपूर्ण वागणुकीवरून तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे लोकांना दिसून येईल. यामुळे शेजाऱ्यांना साक्ष देण्याकरता तुम्हाला संधीही मिळू शकेल. शिवाय, तुमच्या अशा चांगल्या स्वभावामुळे ‘देवाच्या शिक्षणास शोभा’ येते. (तीत २:७, १०) शेजाऱ्यांबद्दल आस्था दाखवा. सर्वांबरोबर हसतखेळत राहा, समजंस असा. त्यांना खासगी व शांत वातावरणात वेळ घालवण्याचा हक्क आहे, हे समजून घ्या. कोणी आजारी पडल्यास, त्यांना मदत हवी असेल तर समजंसपणे ती द्यायला तत्पर राहा. एखादे नवीन कुटुंब तुमच्या शेजारी राहायला आले असेल तर थोडा वेळ थांबून त्यांच्याशी बोला. या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्यांची तुमच्या शेजाऱ्यांवर छाप पडेल. आणि यामुळे यहोवालाही आनंद होतो.—इब्री. १३:१६.
४ तुमचे घर आणि आसपासचा परिसर तुम्ही ज्याप्रकारे ठेवता त्याद्वारे: चांगले शेजारी होण्यामध्ये, आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे समाविष्ट आहे. नीटनेटके घर आणि स्वच्छ अंगण पाहूनच लोकांना तुम्ही वेगळे असल्याचे समजून येईल. गबाळे घर आणि भंगार इकडेतिकडे पडल्याचे पाहून कोणालाही आपण सांगत असलेली सुवार्ता ऐकाविशी वाटणार नाही. त्यामुळे, तुमचे घर, अंगण, गाडी वगैरे सर्व स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे.
५ ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरील लोकांबद्दल चिंता दाखवल्याने, आपल्याला शेजाऱ्यांबद्दल प्रेम आहे हे स्पष्ट होते. याचा परिणाम काय होऊ शकतो? आपली “सत्कृत्ये पाहून” काही लोक “देवाचे गौरव” करतील.—१ पेत्र २:१२.