भविष्याची योजना करणे—पण कशासाठी?
१ आपण सर्वच भविष्याच्या थोड्याफार तरी योजना करतोच. पृथ्वीवर जीवनाची आशा बाळगणारे, देवाच्या धार्मिक नव्या जगात अनंतकाळ जीवनाची आशा बाळगून आहेत. पण आपल्या मनातून या आशा नाहीशा करू शकणारे अनेक प्रभाव आहेत ज्यांपासून आपल्याला सावध राहिले पाहिजे. देवाच्या राज्यावरच आपले लक्ष केंद्रित राहावे व शरीराच्या अभिलाषांचा मोह होऊन देवाच्या मार्गापासून दूर जाऊ नये म्हणून आपल्याला कसोशीने प्रयत्न करावे लागतील.—१ योहा. २:१५-१७.
२ आध्यात्मिक लोकांचे ध्येय जगिक लोकांना कळत नाही. (१ करिंथ. २:१४) जगिक लोक नावलौकिक, अधिकार किंवा धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागले आहेत. पण आपण आध्यात्मिक धन मिळवण्याचा प्रयत्न करतोय. (मत्त. ६:१९-२१) भविष्याविषयी जगाचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपण आत्मसात केला तर आपण आपले आध्यात्मिक ध्येय कधी पूर्ण करू शकू का? उलट, प्रापंचिक गोष्टींनीच आपले मन भरून जाईल. तेव्हा, आपण हे कसे टाळू शकतो?
३ “प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा”: आपले लक्ष भविष्यातील राज्यावरच केंद्रित आहे की नाही याचे परीक्षण करण्याचा एक मार्ग म्हणजे आपले दररोजचे संभाषण कोणत्या विषयावर असते हे पाहणे. आपण नेहमीच भौतिक गोष्टींची व प्रापंचिक गोष्टींची चर्चा करत असतो का? असल्यास, आध्यात्मिक मूल्यांवरचे आपले लक्ष कमी तर होत नाही हे आपण पाहिले पाहिजे. ‘देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूदी’ करण्यात वेळ घालवण्याऐवजी ‘प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करण्याकडे’ आपण विशेष लक्ष दिले पाहिजे.—रोम. १३:१४.
४ तरुण जन, पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण करण्याच्या दिवसासाठी योजना करून “ख्रिस्ताला परिधान” करू शकतात. सामान्य पायनियर बनण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाचे संगोपन अशा एका समाजात झाले होते जेथे, आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न होण्याची तरुणांकडून सहसा अपेक्षा केली जाते. त्यामुळे, तो त्याच्या व्यवसायात इतका बुडाला, की केवळ नावासाठी तो सभांना व क्षेत्र सेवेला जाऊ लागला. पण मग त्याने मत्तय ६:३३ येथील येशूच्या शब्दांवर भरोसा ठेवायला सुरवात केली आणि पैशामागे धावणे थांबवून पूर्ण वेळची सेवा सुरू केली. आता, शुद्ध विवेकाने तो यहोवाची सेवा करत आहे; त्याच्या शब्दांत सांगायचे तर, ‘त्याच्या पूर्ण शक्तिनिशी’ तो यहोवाची सेवा करत आहे.
५ आपण भविष्याचा विचार केला पाहिजे असे बायबल आपल्याला सांगते. (नीति. २१:५) पण असे करताना देवाची काय इच्छा आहे ही गोष्ट प्रथम आपल्या मनात ठेवून आपण भविष्याचा विचार करू या.—इफिस. ५:१५-१७.