यशस्वी टेलिफोन साक्षकार्य
१ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, सुवार्तेचा प्रचार करण्यात सहभाग घेणे केवळ हा एकच आपला उद्देश नाही तर शक्य तितक्या लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहंचवणे हा देखील आहे. (प्रे. कृत्ये १०:४२; २०:२४) घरोघरच्या कार्याद्वारेच आपल्याला प्रामुख्याने सर्व लोकांपर्यंत पोहंचायचे असले तरीसुद्धा, या सुव्यवस्थित पद्धतीने आपण सर्वांनाच भेटू शकत नाही हेही आपल्याला माहीत आहे. म्हणूनच, ‘आपली सेवा पूर्ण’ करण्यासाठी आपण इतर पद्धतींचा आता अवलंब करत आहोत. या पद्धतींत, टेलिफोनवरून साक्षकार्य करणे देखील येते. या साक्षकार्याद्वारे देखील आपण मेंढरासमान लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतो.—२ तीम. ४:५.
२ अनेक लोक कडक सुरक्षा असलेल्या इमारतींमध्ये, हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये किंवा सुरक्षा फाटक असलेल्या ठिकाणी राहतात. त्यामुळे आपण आजपर्यंत ज्या पद्धतीचा वापर करत होतो, म्हणजे घरोघरी जाऊन लोकांना भेटत होतो ते वरील क्षेत्रांत शक्य होत नाही. आणि, ज्या क्षेत्रांत आपण घरोघरचे कार्य करू शकतो तेथील बरेच लोक आपल्याला घरी भेटत नाहीत. म्हणून अशा लोकांशी टेलिफोनद्वारे बोलण्यात अनेक प्रचारकांना यश आले आहे. एकदा सकाळी घरोघरचे कार्य करत असताना एका विवाहित जोडप्याला नऊ घरे बंद असल्याची आढळली. राज्य सभागृहात गेल्यावर त्यांनी या लोकांच्या पत्त्यांवरून टेलिफोन डिरेक्टरीमधून त्यांचे फोननंबर मिळवले. आणि नऊपैकी आठ लोकांना ते फोनवरून साक्ष देऊ शकले!
३ पण तुम्ही टेलिफोन साक्षकार्य करायला कचरत आहात का? एका बांधवाने कबूल केले की: “सेल्समनचे फोन आलेले मला स्वतःलाच आवडत नाहीत. म्हणून टेलिफोनवरून मीही दुसऱ्यांना साक्ष देण्याच्याबाबतीत जरा कचरतच होतो.” पण त्यांनी जेव्हा दोन कॉल केले तेव्हा ते म्हणाले: “साक्ष द्यायची ही पद्धत मला खूप आवडली! इतका चांगला परिणाम मिळेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. मला हे काम खरंच आवडू लागलं आहे. फोनवर लोक अगदी आरामात बोलतात. आणि तुम्हाला हवं ते सर्व तुमच्याजवळच असतं. खरंच मला खूप आवडू लागलं आहे हे.” एका बहिणीचा देखील असाच अनुभव आहे. ती म्हणते: “टेलिफोन साक्षकार्य करण्याची मला इतकी उत्सुकता नव्हती. तुम्हाला खरं सांगायचं तर मला ते करायचं नव्हतं. पण तरी मी प्रयत्न केला आणि त्यात मला यश मिळालं. मला टेलिफोन साक्षकार्यामुळे ३७ पुनर्भेटी मिळाल्या आणि इतके अभ्यास मिळाले आहेत, की हे सर्व अभ्यास घेणं मला जमेल असं वाटत नाही.” तुम्हीही टेलिफोन साक्षकार्य करायचा प्रयत्न तर करा आणि पाहा तुम्हालाही मिळते की नाही असे यश!
४ टेलिफोन साक्षकार्याची व्यवस्था करणे: साक्षकार्याची व्यवस्था मंडळीतील सेवा पर्यवेक्षक पाहतात. गरज भासेल त्याप्रमाणे वडील वर्ग एखाद्या वडिलाला किंवा एखाद्या योग्य सेवा सेवकाला सेवा पर्यवेक्षकास टेलिफोन साक्षकार्याच्या योजनेच्या संदर्भात मदत करण्यासाठी नियुक्त करू शकतात. ज्या बांधवाकडे क्षेत्राचे कार्ड (टेरिटरी काड्र्स) असतात त्यालाही या व्यवस्थेत सामील करावे कारण तोच कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे ते ठरवेल आणि सगळ्यांचा अद्ययावत अहवाल ठेवेल. तसेच, विभागीय पर्यवेक्षक देखील, या व्यवस्थेची कोठवर प्रगती झाली आहे ते पाहतील.
५ तुमच्या येथेही अशी काही क्षेत्रे असतील जेथे घरोघरचे साक्षकार्य करणे शक्य नाही, तर अशा क्षेत्रांना टेलिफोन क्षेत्रे बनवता येईल. नियुक्त केलेला बांधव अशा क्षेत्रांतील सर्व पत्त्यांची काळजीपूर्वक यादी करेल. ही यादी लांबलचक नसावी. कारण या क्षेत्रात नियमितरीत्या कार्य केले जाईल. सर्व क्षेत्राच्या नकाशांवर एक खूण करावी व तेथे स्पष्टपणे याची नोंद करावी की ते विशिष्ट क्षेत्र टेलिफोन साक्षीकार्यासाठी आहे.
६ तुम्हाला टेलिफोन नंबर कोठून मिळू शकतात? कोणत्याही टेलिफोन बूथमध्ये, टेलिफोन डिरेक्टरी असते. या डिरेक्टरीत अक्षरांच्या क्रमानुसार नाव, टेलिफोन नंबर आणि संक्षिप्त पत्ता दिलेला असतो. कडक सुरक्षा असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांची स्वतःची टेलिफोन डिरेक्टरी असेल तर तुम्ही तेथून नंबर लिहून घेऊ शकता. नाहीतर, काही इमारतींच्या जिन्याच्या सुरवातीलाच इमारतींत राहणाऱ्यांच्या नावांची पाटी लावलेली असते. ती नावे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मग एखाद्या स्टॅण्डर्ड टेलिफोन पुस्तकातून त्या नावाचे टेलिफोन नंबर शोधू शकता.
७ टेलिफोन साक्षकार्यात अनुभवी असलेल्या बंधूभगिनींना, पायनियर साहाय्य कार्यक्रमाद्वारे इतरांना साहाय्य देण्याची व्यवस्था करून वडीलजन या कार्यात सक्रिय भाग घेऊ शकतात. अधूनमधून सेवा सभेतील स्थानीय गरजा यांत, साक्ष देण्याच्या या पद्धतीचा आपण आणखी प्रभावशाली उपयोग कसा करू शकतो यावर चर्चा केली जाऊ शकते.
८ घराबाहेर पडू न शकणाऱ्या किंवा आजारी बंधूभगिनींना वडीलजन मेंढपाळकत्वाच्या भेटी द्यायला जातात तेव्हा ते त्यांना टेलिफोन साक्षकार्यात भाग घेण्याचे उत्तेजन देऊ शकतात. टेलिफोन साक्षकार्य कसे करायचे हे वडील त्यांच्यासमोर दोन तीन कॉल्स करून दाखवू शकतात आणि मग प्रचारक ते करून पाहू शकतो. पुष्कळ बंधूभगिनींनी दररोज अशा प्रकारच्या साक्षकार्यात भाग घेण्यास सुरवात केली आणि त्यांना ते आवडू लागले आहे.
९ यश मिळण्याकरता सूचना: येशूने त्याच्या शिष्यांना प्रचारकार्य करायला पाठवले तेव्हा “दोघे दोघे असे” पाठवले. (लूक १०:१) दोघे का? कारण त्याला हे माहीत होते, की दोघांनी एकत्र काम केल्यास ते एकमेकांकडून शिकू शकतात आणि एकमेकांना उत्तेजनही देऊ शकतात. टेलिफोन साक्षकार्याच्या बाबतीतही असेच आहे. दोघे जण असतात तेव्हा ते एकमेकांकडून शिकू शकतात, आपल्याला मिळालेल्या परिणामांची चर्चा करू शकतात आणि पुढच्या कॉलसाठी काही सूचनाही देऊ शकतात. एक जण फोनवर बोलत असतो तेव्हा दुसरा त्याला योग्य माहिती शोधण्यास, वचन काढण्यास मदत करू शकतो.
१० विचारपूर्वक व एकाग्रतेने बोलता यावे म्हणून तुम्ही फोन करताना जेथे बसणार आहात तेथे बायबल, रिझनिंग पुस्तक, अपेक्षा माहितीपत्रक, मासिके आणि तुम्हाला लागतील असे इतर साहित्य तुमच्या समोर ठेवा. तुम्ही दोन तीन सादरता कागदावर लिहू शकता आणि फोन करताना स्पष्ट दिसतील अशाप्रकारे त्या तुमच्यासमोर ठेवा. केलेल्या फोनचा अचूक आणि पूर्ण रेकॉर्ड ठेवा. कोणत्या दिवशी आणि किती वाजता तुम्ही फोन केला होता हेही त्यात स्पष्ट लिहा. यामुळे आस्थेवाईक लोकांना तुम्ही पुन्हा एकदा फोन करू शकता.
११ फोनवर लोक जेव्हा अनोळखी आवाज ऐकतात तेव्हा ते जरा साशंकपणे व सावधगिरीनेच बोलत असतात. त्यामुळे तुम्ही बोलताना प्रेमळ, मैत्रीपूर्ण व सावधगिरीने बोला. घरमालकाला तुम्ही दिसत नसल्यामुळे तुमच्या आवाजावरून तो, तुम्ही खरोखरच प्रामाणिक आहात का हे ठरवेल. बोलताना घाई करू नका, तर निवांत बोला आणि अंतःकरणापासून बोला. स्पष्ट आणि घरमालकाला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात बोला. घरमालकालाही बोलू द्या. तुमचे पूर्ण नाव व तुम्ही कोठे राहता हेही स्पष्ट सांगा. आपण टेलिमार्केट्र्स म्हणजे टेलिफोनवरून सामानाची विक्री करणारे लोक आहोत असे आपल्या बोलण्यावरून लोकांना वाटता कामा नये. तुम्ही अमूक बिल्डिंगमधल्या किंवा कॉम्प्लेक्समधल्या सर्वांना फोनवर सुवार्ता सांगत आहात असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणू शकता की मी खास तुम्हालाच फोन करतोय.
१२ टेलिफोनवर सादरता: रिझनिंग पुस्तकाची पृष्ठे ९-१५ वर अनेक सादरता दिल्या आहेत. त्यापैकी कोणतीही सादरता आपण टेलिफोन साक्षकार्यासाठी वापरू शकतो. तुम्ही म्हणू शकता: “मी तुम्हाला व्यक्तिशः भेटू शकत नसल्यामुळे तुम्हाला फोन केला. मला तुमच्याकडून एका प्रश्नाचे उत्तर हवे होते.” आणि मग त्यांना प्रश्न विचारा.
१३ “गुन्हेगारी/सुरक्षा” या मथळ्याखालील सादरता अशाप्रकारे वापरता येते: “हॅलो. माझं नाव — आहे. मी — राहतो. माझं बोलणं सुरु करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोणीही विक्रेता किंवा सर्व्हे घेणारा नाही. मला तुमच्याशी व्यक्तिगत सुरक्षेच्या विषयावर बोलायचे आहे. आपण अक्षरशः रोजच गुन्हेगारीविषयी ऐकतो. त्याचा आपल्या जीवनावर थोडाबहुत का होईना परिणाम होतोच. परंतु आपण रात्रीच्या वेळी रस्त्यावर अगदी बिनधास्तपणे चालू शकू किंवा सुरक्षित राहू शकू असा काळ कधी येईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून मग पुढे बोला.] यासंदर्भात, देवाने काय करण्याचे वचन दिले आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो.”
१४ आम्ही लोकांना बायबलचा अभ्यास करण्याचे उत्तेजन देत आहोत असे फोनवर थेटपणे बोलल्याने देखील चांगले परिणाम मिळाले आहेत. काही मिनिटांत तुम्ही, अभ्यास कसा करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवू शकता. मग त्या व्यक्तीच्या घरी येऊन बायबल अभ्यास पुढे चालू ठेवण्याचे उत्तेजन तुम्ही देऊ शकता. तिने तुम्हाला घरी येण्यास नकार दिला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी फोनवर अभ्यास करण्याचे उत्तेजन देऊ शकता.
१५ फोनवर बोलणे समाप्त करण्याआधी शेवटी काही तरी असे बोला जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीच्या घरी जाण्याची किंवा मग पोस्टाने तिच्या घरी एखादे साहित्य पाठवण्याची संधी मिळेल. ती व्यक्ती तुम्हाला तिचा पत्ता देत नसेल तर तुम्ही तिला पुन्हा फोन कराल असे सांगा. तुम्हाला आपल्या घरी बोलवण्याइतपत त्याचा किंवा तिचा विश्वास बसेपर्यंत तुम्हाला अनेकदा त्यांना फोन करावा लागेल.
१६ पुढाकार घ्या: एका १५ वर्षीय बहिणीने फोन कॉल करून तिची सकाळची सेवा सुरू केली. फोनवर ती एका स्त्रीशी बोलली. या स्त्रीने ज्ञान पुस्तक स्वीकारण्याची तयारी दाखवली. बहीण जेव्हा तिला हे पुस्तक द्यायला तिच्या घरी गेली तेव्हा, आपला नंबर तर यादीत नसताना या बहिणीला तो कसा काय मिळाला हे तिला तिच्याकडून माहीत करून घ्यायचे होते. तिने चुकीने हा नंबर फिरवला होता. त्या स्त्रीने अभ्यास करण्याची तयारी दर्शवली आणि आता ती बाप्तिस्माप्राप्त प्रचारक आहे.
१७ एका बहिणीला टेलिफोन क्षेत्र मिळाले खरे, पण भीतीपोटी तिने तीन आठवड्यांपर्यंत कोणालाच फोन केला नव्हता. तिला धैर्य कसे मिळाले? तिला सावध राहा! मासिकाच्या जानेवारी २२, १९९७ (इंग्रजी) अंकातील एक लेख आठवला. त्या लेखाचे शीर्षक होते: “मी दुर्बळ असतो तेव्हा, मी शक्तिमान असतो.” या लेखात एका साक्षीदार बहिणीचा अनुभव आहे. तिला संधिवाताचा त्रास असताना देखील ती टेलिफोनद्वारे साक्षकार्य करते. ती म्हणते: “मी यहोवाला प्रार्थना करून त्याच्याजवळ शक्ती मागितली. योग्यप्रकारे सादरता करावी म्हणून मला शब्द सुचवण्यास मी त्याला प्रार्थना केली.” टेलिफोन साक्षकार्याच्या पहिल्याच दिवशी तिला कोणता अनुभव मिळाला? ती म्हणते: “यहोवाने माझी प्रार्थना ऐकली. लोकांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मी पुनर्भेटीसाठी व्यवस्था केली.” या पुनर्भेटीचे बायबल अभ्यासात रुपांतर झाले. ती शेवटी म्हणाली: “स्वतःवर नव्हे तर यहोवावर भरवसा ठेवण्यास त्याने मला पुन्हा एकवार शिकवले.”—नीति. ३:५.
१८ टेलिफोनद्वारे लोकांना सत्य सांगण्याची ही पद्धत सुवार्तेचा प्रचार करण्याची प्रभावशाली पद्धत ठरली आहे. चांगली तयारी करा आणि उत्साहाने सहभाग घ्या. पहिल्या काही कॉल्समध्ये लोकांनी तुमचे ऐकून घेतले नाही तर निराश होऊ नका. यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. टेलिफोनद्वारे प्रचार कार्य करणाऱ्यांच्या अनुभवांतून काही शिकता येते का ते पाहा. आपल्या क्षेत्रातील एकही व्यक्ती ज्याने सुवार्ता ऐकली नाही असे होणार नाही, या दृढनिश्चयाने व निकडीच्या भावनेने आपण आपली सेवा पुढे चालू ठेवू या.—रोम. १०:१३, १४.