चांगले ऐकणारे असा
१ लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावून घ्यावी लागते. ऐकणाऱ्याला शिकण्याची आणि ऐकलेल्या गोष्टींमधून फायदा प्राप्त करून घेण्याची इच्छासुद्धा असली पाहिजे. म्हणूनच येशूने म्हटले: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा.” (तिरपे वळण आमचे.)—लूक ८:१८.
२ खासकरून मंडळीच्या सभा, संमेलने आणि अधिवेशनांना उपस्थित राहताना हे लक्षात ठेवले पाहिजे. या सभांमध्ये सांगितली जाणारी माहिती फार लक्ष देऊन ऐकण्याची गरज असते. (इब्री. २:१) या ख्रिस्ती सभांमध्ये चांगले ऐकणारे कसे व्हावे यासंबंधी येथे काही मुद्दे दिले आहेत.
▪ सभांचे मूल्य जाणा. ‘विश्वासू कारभाऱ्याद्वारे’ “परमेश्वरापासून शिक्षण” मिळण्याचा हा सर्वात मुख्य मार्ग आहे.—यश. ५४:१३; लूक १२:४२.
▪ आधीच तयारी करा. ज्या साहित्याची चर्चा केली जाणार आहे त्याची उजळणी करा. सोबत आपले बायबल आणि अभ्यासल्या जाणाऱ्या प्रकाशनाची व्यक्तिगत प्रत न्यायला विसरू नका.
▪ सभा चालू असताना लक्षपूर्वक ऐकण्याचा विशेष प्रयत्न करा. तुमच्याजवळ बसलेल्यांसोबत बोलण्याचे किंवा सभागृहात इतरत्र काय चालले आहे याकडे लक्ष देण्याचे टाळले पाहिजे. सभेनंतर आपण काय करणार किंवा इतर व्यक्तिगत बाबींविषयी सभा चालू असताना विचार करत बसू नका कारण यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल.
▪ जे काही सादर केले जाते त्यावर विचार करा. स्वतःला विचारा: ‘हे मला लागू होते का? मी हे कधी लागू करू शकतो?’
▪ मुख्य मुद्दे आणि शास्त्रवचनांविषयी संक्षिप्त नोंदी घ्या. यामुळे चर्चा केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यास आणि नंतर मुख्य मुद्दे आठवण्यास मदत मिळते.
३ आपल्या मुलांना लक्ष देण्यास शिकवा: मुलांना आध्यात्मिक शिक्षणाची गरज असते. (अनु. ३१:१२) प्राचीन काळी, “ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या” सर्वांना नियमशास्त्राचे वाचन होत असताना लक्षपूर्वक ऐकण्याची गरज होती. (नहे. ८:१-३) सभांमध्ये पालकांनी लक्ष देऊन ऐकले तर त्यांची मुलेही लक्ष देऊन ऐकतील. मुलांनी शांतपणे एका ठिकाणी बसावे म्हणून खेळणी किंवा चित्रे रंगवण्याची पुस्तके आणणे बरे नाही. प्रसाधनगृहाला वारंवार फेऱ्या मारल्यानेसुद्धा त्यांच्या ऐकण्यात व्यत्यय येतो. “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली” असल्यामुळे आपली मुले शांत बसून सभांमध्ये लक्ष देतील म्हणून पालकांनी जास्त प्रयत्न करावा.—नीति. २२:१५.
४ चांगले ऐकणारे बनण्याद्वारे आपण सुज्ञ आहोत आणि आपले ‘ज्ञान वाढवण्याचा’ प्रयत्न करत आहोत हे सिद्ध करतो.—नीति. १:५.