“मी नवीन ठिकाणी स्थलांतर करावे का?”
१ यहोवाचे अनेक समर्पित सेवक, जेथे सुवार्ता सांगणाऱ्यांची अधिक आवश्यकता आहे तेथे राहायला गेले आहेत. याद्वारे त्यांनी, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा” या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन केले आहे. (मत्त. २८:१९) त्यांनी पौलाचेही अनुकरण केले आहे. पौलाने, “मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर,” या हाकेला प्रतिसाद दिला होता. (प्रे. कृत्ये १६:९) आपण काय करू शकतो?
२ एका वेळी एक पायरी चढणे: तुमच्या स्वतःच्या मंडळीला नेमण्यात आलेल्या सेवा क्षेत्रात असे कोणते क्षेत्र आहे का जेथे सहसा प्रचार केला जात नाही? असल्यास, तुम्ही अशा क्षेत्रांकडे जास्त लक्ष देऊ शकता. सेवा वाढवण्याकरता दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायची तुमची इच्छा असल्यास, आधी याबाबतीत तुमच्या मंडळीतील वडिलांशी बोलणे योग्य ठरेल. या क्षेत्रात स्थलांतर करणे तुम्हाला जमेल किंवा नाही याची चर्चा आधी त्यांच्याशी करा. जवळपासच्या कोणत्या मंडळीकडे असे क्षेत्र आहे जेथे तुम्ही जाऊन सेवा करू शकता याविषयी तुम्ही तुमच्या सर्किट ओव्हरसियरला देखील विचारू शकता. सर्व गोष्टींचा विचार केल्यावर कदाचित देशाच्या दुसऱ्या भागात जाऊन तुम्हाला सेवा करता येईल. असे करण्याची तुमची इच्छा असल्यास, जाण्याआधी, तुम्ही आणि तुमच्या मंडळीतील वडिलांनी याबाबत संस्थेला पत्र लिहावे. यात तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊ इच्छिता याविषयी, आणि तुमच्या आध्यात्मिक स्थितीविषयी थोडक्यात लिहावे. मंडळीत तुम्ही पायनियर आहात, प्रचारक आहात, सेवा सेवक आहात की वडील आहात हे त्या पत्रात नमूद करावे. तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ इच्छिता, त्या ठिकाणी कायमचे राहायला जावे किंवा कसे हे ठरवण्याआधी तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आधी त्या ठिकाणी जाऊन येणे चांगले राहील.
३ देशांतर करताना सावध राहा: बरेच बांधव, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता किंवा त्यांच्या देशातील बिकट परिस्थितीपासून सुटका मिळण्याकरता दुसऱ्या देशांत राहायला गेले आहेत. पण आपल्या काही बांधवांना काही लोकांनी फसवले आहे. त्या लोकांनी त्यांना नवीन ठिकाणी जागा देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि मग पसार झाले. कधीकधी तर हे फसवे लोक स्थलांतर केलेल्या लोकांना अनैतिक कार्ये करायला देखील बळजबरी करतात. त्यांनी नकार दिल्यास ते त्यांना या अनोळख्या देशात कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतात. मग अशावेळी या लोकांची अवस्था, त्यांच्या मायदेशी होती त्यापेक्षा अधिक बिकट होते. या नवीन ठिकाणी त्यांना ख्रिस्ती बांधवांबरोबर राहावे लागते किंवा त्यांची मदत घ्यावी लागते. पण प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या स्वतःच्या समस्या असल्यामुळे या बांधवांवर विनाकारण बोजा पडतो. नीट योजना न करता दुसऱ्या देशी स्थलांतर केल्यामुळे काही घरातील सदस्य एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. यामुळे कित्येक कुटुंबाची आध्यात्मिक स्थिती अगदी दयनीय झाली आहे.—१ तीम. ६:८-११.
४ तुम्ही व्यक्तिगत कारणासाठी नवीन ठिकाणी स्थलांतर करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवलेली बरी. ती म्हणजे, तुम्ही कोठेही राहिलात तरी तुम्हाला समस्यांना तोंड द्यावेच लागेल. पण जेव्हा भाषा व स्थानिक रितीरीवाज परिचयाचे असतात तेव्हा समस्या सोडवणे सहसा सोपे जाते.