ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे
१ एखाद्या व्यक्तीला चांगली साक्ष देण्यासाठी आधी पुढाकार घेऊन त्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू करणे महत्त्वाचे आहे, नाही का? आणि हे एक आव्हान आहे. कारण आपल्या सुरवातीच्याच एकदोन वाक्यांनी त्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतले पाहिजे, त्याला बोलके केले पाहिजे. हे कसे करता येईल?
२ बऱ्याच प्रचारकांना असा अनुभव आला आहे की विचारपूर्वक तयारी करून ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे सोपे आहे. सहसा ट्रॅक्टचे विषयच लक्ष वेधून घेणारे असतात, शिवाय त्यावरची रंगबिरंगी चित्रे देखील मोहून घेणारी असतात. तसेच, पुस्तक किंवा मासिक पाहिल्यावर जसे ‘हे वाचायला खूप वेळ लागेल’ असे काही लोकांना वाटते, तसे ट्रॅक्ट पाहिल्यावर वाटत नाही. ट्रॅक्टमध्ये थोडक्यातच, पण व्यक्तीला विचार करायला लावेल अशाप्रकारे आपला संदेश मांडलेला असतो. तेव्हा ट्रॅक्टचा उपयोग करून आपण बायबल अभ्यास देखील सुरू करू शकतो.
३ एका साक्षीदार बहिणीने आपले मत सांगितले: “आजच्या जगात जीवन धकाधकीचं आहे; लोकांजवळ फार काही वाचायला वेळ नाही. पण ट्रॅक्ट दोन तीन पानांचेच असल्यामुळे लोक लगेचच ‘नको नको’ म्हणत नाहीत. त्या दोन तीन पानांत मात्र एक महत्त्वाचा संदेश सांगितलेला असतो. मी स्वतः आधी बरेच ट्रॅक्ट वाचले आणि मग अभ्यास करू लागले.” लहानशा ट्रॅक्टमध्येही एखाद्या व्यक्तीला सत्याकडे आकर्षित करण्याची शक्ती आहे; कारण त्यात देवाचे वचन आहे.—इब्री. ४:१२.
४ चार सोपे क्रम: हे चार सोपे क्रम पाळल्यामुळे अनेकांना संभाषण सुरू करणे शक्य झाले. (१) एखाद्या व्यक्तीला तीन चार ट्रॅक्ट दाखवा आणि यांतले कोणते वाचायला आवडेल ते निवडायला सांगा. (२) त्या व्यक्तीने निवडलेल्या ट्रॅक्टच्या मुख्य मुद्द्यावर आधीच तयार केलेला एक प्रश्न विचारा. (३) प्रश्नाचे उत्तर ज्या परिच्छेदात दिले आहे तो परिच्छेद किंवा शास्त्रवचन ट्रॅक्टमधून वाचून दाखवा. (४) व्यक्तीने ऐकण्याची तयारी दाखवली तर ट्रॅक्टमधील उर्वरित विषयांवर चर्चा सुरू ठेवा किंवा अपेक्षा ब्रोशर किंवा ज्ञान पुस्तकातून संबंधित विषयावरील अध्याय दाखवा. हे चार क्रम तुम्ही पाळले तर तुम्ही सरळ बायबल अभ्यास सुरू करू शकता. चार ट्रॅक्ट उदाहरणादाखल घेऊन तयार केलेल्या पुढील सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.
५ “जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?” या ट्रॅक्टचे शीर्षकच तुम्ही प्रश्नाच्या रूपात विचारू शकता:
▪ ती व्यक्ती कदाचित उत्तर देईल, “देवाचे” किंवा “माहिती नाही.” मग दुसऱ्या पानावरील पहिली दोन वाक्ये आणि तिसऱ्या पानावरचा पहिला परिच्छेद वाचून दाखवा. १ योहान ५:१९ आणि प्रकटीकरण १२:९ या वचनांकडे विशेष लक्ष द्या. कदाचित त्या व्यक्तीला सैतानाविषयी काही माहीत नसेल किंवा सैतान अस्तित्वात आहे किंवा नाही आणि तोच या जगावर राज्य करतो याविषयी कदाचित तिला शंका असेल. “जगाच्या परिस्थितीपासून एक सुगावा” या उपशीर्षकात दिलेली कारणे तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता. तिने आवडीने ऐकून घेतले तर तुम्ही दियाबल कोठून आला हे सांगू शकता. यासाठी या ट्रॅक्टच्या ३ आणि ४ पानांवरील मुद्द्यांचा तुम्ही उपयोग करू शकता.
६ “मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?” हे ट्रॅक्ट पाहिल्यावर कोणालाही ते वाचावेसे वाटेल. संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही हा प्रश्न विचारू शकता:
▪ “आपल्या मेलेल्या माणसांना पुन्हा कधी पाहता येईल असं तुम्हाला वाटतं का?” त्या व्यक्तिचे उत्तर ऐकल्यावर ४ थ्या पानावरील दुसरा परिच्छेद दाखवून योहान ५:२८, २९ वाचा. त्यांना सांगा की हे वचन वाचल्यामुळे या उपशीर्षकाखाली दिलेली माहिती समजायला मदत होईल. त्यांना चर्चा करायला आवडेल का, विचारा.
७ “कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा” हे ट्रॅक्ट जवळजवळ सर्वांना देता येईल. हे ट्रॅक्ट देताना तुम्ही असे म्हणू शकता:
▪ आज कुटुंबाकुटुंबांत समस्या आहेत हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं, कुटुंबात शांती राहावी म्हणून काय करता येण्यासारखं आहे?” त्या व्यक्तीचे उत्तर ऐकून घ्या. मग ६ व्या पानावर पहिल्या परिच्छेदातल्या मुद्द्यांकडे तिचे लक्ष वेधा. ४ थ्या व ५ व्या पानांवर दिलेल्या शास्त्रवचनांपैकी एकाचा अर्थ समजावून सांगा आणि बायबल अभ्यास करायला आवडेल का, विचारा.
८ “तुम्ही पवित्रशास्त्रावर भाव ठेवू शकता” हे ट्रॅक्ट देताना तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “बायबलच्या पहिल्या पुस्तकात काईन व हाबेल यांची गोष्ट सांगितली आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात काईनाच्या पत्नीचाही उल्लेख केला आहे. तुम्ही कधी विचार केला का की काईनाला पत्नी कुठून मिळाली? दुसऱ्या पानावरच्या शेवटल्या परिच्छेदातून उत्तर द्या. या ट्रॅक्टमध्ये मनुष्यांच्या भविष्याबद्दल बरीच महत्त्वाची माहिती दिली आहे हे देखील सांगा. ५ व्या पानावरील तिसऱ्या परिच्छेदापासून पुढे चर्चा करा आणि दिलेल्या वचनांचाही उपयोग करा.
९ ट्रॅक्टचा उपयोग करून लोकांना सुवार्ता सांगितल्यामुळे आजपर्यंत बऱ्याच बांधवांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत. ट्रॅक्ट नेहमी सोबत ठेवता येतात, आणि घरोघरच्याच नव्हे तर अनौपचारिक पद्धतीने प्रचार करताना देखील त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. आपली सेवा पूर्ण करण्यात ट्रॅक्ट एक महत्त्वाचे साधन आहे. नेहमी वेगवेगळे विषय असलेले ट्रॅक्ट सोबत ठेवा आणि त्यांचा चांगला उपयोग करा.—कलस्सै. ४:१७.