मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले आहे
१ सुवार्तेचा एक आवेशी प्रचारक या नात्याने पौल, अत्याधिक गरज असलेली क्षेत्रे, मोठ्या उत्सुकतेने शोधत असे आणि इफिस शहर हे त्यांपैकीच एक होते. तेथे प्रचार करण्यात त्याला इतके यश मिळाले की त्याने सहख्रिश्चनांना लिहिले: “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे.” (१ करिंथ. १६:९) पौल त्या क्षेत्रात कार्य करत राहिला आणि सत्य मानण्यास त्याने अनेक इफिसकरांना मदत केली.—प्रे. कृत्ये १९:१-२०, २६.
२ आज देखील, एक मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार आपल्यापुढे उघडे आहे. नियमित पायनियर म्हणून आपले नाव नोंदवण्याचे आणि शक्य असल्यास, स्वेच्छेने स्थलांतर करून, मोठ्या क्षेत्राचे काम पाहणाऱ्या एखाद्या लहानशा मंडळीसोबत कार्य करण्याचे निमंत्रण आपल्यातील प्रत्येकाला दिले जात आहे. आपल्या प्रयासांमुळे, विशिष्ट क्षेत्रांत असलेली गरज भागवली जाईल.—पडताळा २ करिंथकर ८:१३-१५.
३ तुम्ही नियमित पायनियर म्हणून सेवा करू शकता का? नियमित पायनियर म्हणून सेवा करण्याच्या शक्यतेचा तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? भारतातील क्षेत्र खरोखरच अफाट असून लोकांना एकत्रित करण्याचे पुष्कळसे कार्य अद्याप बाकी आहे. तर मग याविषयी, तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मंडळीतील वडिलांशी तसेच तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांशी विचारविनिमय करण्यात काय हरकत आहे. नियमित पायनियर सेवा हाती घेता यावी म्हणून तुम्हाला तुमच्या आराखड्याची फेरमांडणी कशी करता येईल याविषयी त्यांचा सल्ला घ्या. मोठ्या कुटुंबांत, एखाद्या सदस्याला पायनियर सेवा करता यावी यासाठी सबंध कुटुंब एकजुटीने सहकार्य करू शकते का? ज्या कुटुंबात केवळ पती-पत्नी आहेत व त्यांच्या आर्थिक परिस्थिती समाधानकारक असल्यामुळे दोघांनाही पूर्ण-वेळ नोकरी करणे अपरिहार्य नसल्यास, तुम्ही अपत्य होऊ देण्याचा विचार लांबणीवर टाकू शकता का, जेणेकरून पत्नी आधी, काही वर्षे नियमित पायनियर सेवा करू शकेल?
४ अलीकडील दशकांत, विश्वभरातील हजारो ख्रिस्ती कुटुंबांनी कापणीच्या कामात पूर्ण सहभाग घेण्याकरता अन्य क्षेत्रांत स्थलांतर केले आहे. त्यांपैकी एका दांपत्याने असे म्हटले: “आमच्या हातून जिथं सर्वाधिक मदत होईल अशा ठिकाणी जाऊन आम्ही यहोवाची सेवा करू इच्छित होतो.” तुम्ही राहता त्याठिकाणी मोठी मंडळी असून तुमचे क्षेत्र वारंवार उरकले जात असल्यास, जेथे राज्य उद्घोषक कमी संख्येत आहेत अशा एखाद्या क्षेत्रात स्थलांतर करण्याची सुसंधी तुम्हाला लाभल्यास, त्या ठिकाणी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास तुम्हाला आवडेल का? तुम्ही एका नवख्या क्षेत्रात नियमित पायनियर म्हणून सेवा करू शकत नसलात तरी, त्या लहान मंडळीला निव्वळ तुमच्या तेथे असण्याने सुद्धा कदाचित फायदा होईल. तुमची तशी इच्छा असल्यास, अशा शक्यतांबद्दल तुमच्या मंडळीतील वडिलांजवळ अथवा तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांजवळ बोला.
५ यहोवाचे नाव धारण करणे एक विशेषाधिकार आहे. आपण सगळेच पायनियरींग करू शकत नसलो, तरी त्याच्या शक्यतांबद्दल आपण प्रत्येकाने गांभिर्याने विचार केला पाहिजे. कार्याचे मोठे द्वार उघडे आहे त्या घटकेपर्यंत आपण काही झाले तरी यहोवाच्या सेवेत निमग्न राहू.—१ करिंथ. १५:५८.