लोकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी चालू घटनांचा उल्लेख करा
१ तुम्हाला सेवेसाठी नेहमी नवनवीन सादरता हव्या आहेत का? बायबलच्या संदेशाबद्दल लोकांमध्ये आवड निर्माण करायची आहे का? मग, जगात आणि तुमच्या क्षेत्रात ज्या घटना घडत आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही संभाषण सुरू करू शकता. तुम्ही एखाद्या अलीकडेच घडलेल्या स्थानीय घटनेविषयी किंवा देशातील एखाद्या घटनेविषयी किंवा मग परदेशात घडलेल्या घटनेविषयी बोलू शकता. कारण दररोज काही ना काही तर नेहमी घडतच असते. पुढील उदाहरणांचा विचार करा.
२ लोकांना आर्थिक अडचणींची किंवा वाढत चाललेल्या महागाईची खरोखरच चिंता लागली आहे. तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “तुम्ही परवाच्या बातम्या ऐकल्यात का? त्यात म्हटले होते, की [अमुक-अमुक] वस्तुंचे भाव पुन्हा वाढणार आहेत.” किंवा मग तुम्ही, एखाद्या कंपनीने पुष्कळ कामगारांना कामांवरून काढले असेल तर त्याचा उल्लेख करून बेकारीविषयी बोलू शकता. चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही असे विचारू शकता, की “आजच्या जगात चरितार्थ चालवणे इतके कठीण का झाले आहे, याचा कधी तुम्ही विचार केलात का?” किंवा, “आपल्याला नेहमीच अशा प्रकारच्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे का?”
३ कुटुंबांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमधील हिंसेच्या बातम्यांवरून देखील तुम्ही चर्चा सुरू करू शकता. तुम्ही म्हणू शकता:
▪ “तुम्ही [घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करा] पेपर मधली बातमी वाचली का?” मग पुढील पैकी कोणताही प्रश्न विचारा: “जगात इतका हिंसाचार का वाढत चालला आहे?” किंवा, “असे दिवस कधी येतील का जेव्हा आपल्या सर्वांना सुरक्षित वाटेल?”
४ पूर, भूकंप किंवा जगातील विविध भागांतील दंग्यांचा देखील उल्लेख तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता:
▪ “तुम्हाला काय वाटतं, या [नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख करा] आपत्तीला देव जबाबदार आहे का?” नाहीतर, जेथे दंगल चालली आहे तिचा उल्लेख करून असे म्हणा: “शांतीसाठी सर्वजण लढत आहेत, तरीपण त्यांना शांती का आणता येत नाही?”
५ चालू घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवल्यास तुम्हाला क्षेत्र सेवेसाठी नवनवीन विषय बोलायला मिळतील. रिझनींग पुस्तकाच्या पृष्ठ १०-११ वरील “चालू घटना” या मथळ्याखाली पुष्कळ लाभदायक सुचना आहेत. पण, कोणत्याही राजकीय पक्षाची कड घेण्याचे टाळा व सामाजिक वादविवादांच्या बाबतीतही तटस्थ राहा. उलट, त्यांना शास्त्रवचनांतून हे दाखवा की मानवाच्या सर्व समस्यांवर केवळ एकच आणि कायमचा उपाय म्हणजे फक्त देवाचे राज्य आहे.